कृतायुगीं महाबळेश्र्वर श्र्वेत । त्रेतायुगी दिसे लोहित ।
द्वापारी रुप पीत । कलियुगी कृष्णवर्ण जाणा ॥ १०१ ॥
सप्त खोलीवेन । उभे असे लिंग आपण ।
कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्मरुपानें ॥ १०२ ॥
पश्र्चिम समुद्रतीरेसी । गोकर्ण-तीर्थ उत्तमेसी ।
ब्रह्महत्यादि पाप नाशी । काय आश्र्चर्य परियेसा ॥ १०३ ॥
ब्रह्महत्यादि पंच महापापें । परद्वारादि दुष्ट पापें ।
दुःशील दुराचारी पापें । जाती गोकर्ण-महाबळेश्र्वर दर्शने ॥ १०४ ॥
दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधिती ।
अंती होय त्यांसी गति । गोकर्णलिंगदर्शनमात्रें ॥ १०५ ॥
तया स्थानी पुण्यदिवशीं । जे अर्चिती भक्तीसी ।
तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥ १०६ ॥
एखादे समयीं गोकर्णासी । जाय भक्तीनें मानुषी ।
पूजा करितां सदाशिवासी । ब्रह्म-पद तो पावें जाणा ॥ १०७ ॥
आदित्य-सोम-बुधवारीं । अमावास्यादि पर्वांभीतरी ।
स्नान करुनि समुद्रीं । दानधर्म करावा ॥ १०८ ॥
शिवपूजा व्रत होम हवन । जप ब्राह्मणसंतर्पण ।
किंचित् करितां अनंत पुण्य । म्हणे गौतम रायासी ॥ १०९ ॥
व्यतीपातादि पर्वणीसी । सूर्यसंक्रांतीचे दिवशीं ।
महाप्रदोष त्रयोदशीसी । पूजितां पुण्य अगम्य ॥ ११० ॥
काय सांगू त्याची महिमा । वर लाधलें अखिल कामा ।
ईश्र्वर भोळा अनंत महिमा । पुन्यमार्गे तुष्टतसे ॥ १११ ॥
असितपक्ष माघामासी । शिवरात्रि चतुर्दशीं ।
बिल्वपत्र वाहिल्यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥ ११२ ॥
ऐसे अनुपम्य स्थान असतां । नवजाती मूर्ख ऐकतां ।
शिवतिर्थी असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥ ११३ ॥
उपोषणादि जागरण । लिंग संनिध गोकर्ण ।
स्वर्गासि जावया सोपान- । पद्धति असे परियेसा ॥ ११४ ॥
ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जन जाती यात्रेसी ।
चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधे लोक अवधारीं ॥ ११५ ॥
स्नान करुनि समस्त तीर्थीं । महाबळेश्र्वरलिंगार्थी ।
पूजा करावी भक्त्यर्थीं । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥ ११६ ॥
ऐशापरि गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी-गौतमा ।
राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला तये वेळीं ॥ ११७ ॥
राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान-महिमा निरोपिलासी ।
पूर्वी कवण कवणासी । साक्षी झाली असेल कीं ॥ ११८ ॥
विस्तारुनि आम्हांसी । सांगा स्वामी करुणेसीं ।
म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्तीकरुनियां ॥ ११९ ॥
म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी ।
जाणों आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥ १२० ॥
गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टांत विचित्र ।
आले होते तेथे जनमात्र । यात्रारुपे करोनियां ॥ १२१ ॥
माध्यानकाळीं आम्ही तेथे । बैसलो होतों वृक्षच्छायेते ।
दुरोनि देखिलें चांडाळीतें । वृद्ध अंध महारोगी ॥ १२२ ॥
शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरीं ।
कृमि पडले असती अघोरी । पूय शोणित दुर्गंध ॥ १२३ ॥
कुक्षरोगी गंडमाळा । कफ दाटला असे गळां ।
दंतहीन अतिविव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥ १२४ ॥
चंडसूर्य किरणाकरितां । प्राण जाय कंठगता ।
शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥ १२५ ॥
विधवा आपण केशवपनीं । दिसे जैशी मुख-मरणी ।
क्षणक्षणा पडे धरणीं । प्राणत्याग करुं पाहे ॥ १२६ ॥
ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी ।
देह टाकिला धरणीसी । त्यजूं पाहे प्राण आपुला ॥ १२७ ॥
प्राण त्यजितां तये वेळीं । विमान उतरले तत्काळीं ।
शिवदूत अतुर्बळी । त्रिशूळ खट्वांग धरुनि हाती ॥ १२८ ॥
टंकायुधें चंद्र भाळी । चंद्रासारखी कांति केवळी ।
किरीटकुंडलें मिरवे कपोलीं । चतुर्वर्ग येणेपरी ॥ १२९ ॥
विमानी सूर्यासारिखें तेज । अतिविचित्र दिसे विराज ।
आले चांडाळिये काज । अपूर्व वर्तले तये वेळीं ॥ १३० ॥
आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण कार्यासी ।
दूत म्हणती आम्हांसी । आलो चांडाळीस न्यावया ॥ १३१ ॥
ऐकोनि दूतांचे वचन । विस्मित झालें आमुचे मन ।
पुनरपि केला त्यांसी प्रश्र्न । ऐक राया एकचित्ते ॥ १३२ ॥
ऐशी चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसीं ।
नेऊनियां श्र्वानासी । सिंहासनीं काय योग्य ॥ १३३ ॥
आजन्मादारभ्य इसी । पापें पापसंग्रहासी ।
ऐशी पापीण दुर्वृत्तीसी । केवीं न्याल शिवलोका ॥ १३४ ॥
नाहीं इसी शिवज्ञान । न करी तपसाधन ।
दया सत्य कदा नेणे । इतें कैसे नेतां तुम्ही ॥ १३५ ॥
पशुमांस-आहार अहर्निशी । सदा करी जीवहिंसी ।
ऐशी कुष्ठी पापिणीसी । केवीं नेतां स्वर्गभुवना ॥ १३६ ॥
अथवा कधीं शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन ।
नाही केले शिवस्मरण । इतें कैसे नेतां तुम्ही ॥ १३७ ॥
शिवरात्रीं उपोषण । नाही केले दान आपण ।
केले नाही देखिले यज्ञ । इयेसी कैसें न्याल तुम्ही ॥ १३८ ॥
न करी स्नान सर्वकाळीं । नेणे तीर्थ कवणे वेळी ।
अथवा व्रतादि सकळीं । केले नाहीं महापापी हे ॥ १३९ ॥
सर्वांगी कुष्ठ पूय शोणित । दुर्गंधी वास असे बहुत ।
ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानीं बैसवाल ॥ १४० ॥
अर्जन जन्मांतरीचें म्हणा । कुष्ठ सर्वांग हेचि खुणा ।
कृमि निघती मुखांतून । पूर्वार्जित केवीं होईल ॥ १४१ ॥
ऐशी पापिणी दुराचारी । योग्य नव्हे सचराचरी ।
केवी नेतां कैलासपुरी । केवी विमानी बैसवाल ॥ १४२ ॥
गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिलें दूतांसी ।
त्यांणी सांगितला आम्हांसी । आद्यंत चांडाळणीचा ॥ १४३ ॥
ऐके गौतम ऋषेश्र्वरा । या चांडाळीचे पूर्वापरा ।
सांगो तुम्हां सविस्तरा । आश्र्चर्य असे परियेसा ॥ १४४ ॥
पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकुळीं जाहली कन्या ।
‘ सौमिनी ‘ नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥ १४५ ॥
अतिसुंदर रुप इसी । उपवर जाहली पितृगृहेसी ।
न मिळे वर तियेसरसी । चिंता करिती मातापिता ॥ १४६ ॥
न मिळे सुंदर वर तिसी । उन्नत जाहली दहा वरुषी ।
मिळवूनि एक द्विजासी । गृह्योक्तेसी दिधली कन्या ॥ १४७ ॥
विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी ।
क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥ १४८ ॥
वर्ततां असे पुढे देखा । तिचे पतीस झालें दुःखा ।
पंचत्व पावला तात्काळिका । विधिवशेंकरुनियां ॥ १४९ ॥
ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरी आणितां ।
पतीचे दुःखकरीं बहुता । खेद करी ते नारी ॥ १५० ॥
अतिसुंदर पूर्ववयेसी । मदें व्यापिलें प्रतिदिवसीं ।
चंचळ होय मानसीं । परपुरुषांते देखोनि ॥ १५१ ॥
गुप्तरुपें क्वचित्काळी । जारकर्म करिती जाहली ।
प्रगट जाहले केवळी । गौप्य नोहे पातकासी ॥ १५२ ॥
आपण विधवा असे नारी । विशेषरुप अतिसुंदरी ।
पूर्ववयसा प्राय भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥ १५३ ॥
ऐसे तिचे पातकासी । प्रकट जाहले सर्वांसी ।
वाळीत केले तयांसी । मातापिताबंधुवर्गादिकां ॥ १५४ ॥
माता पिता बंधुजन । त्यजिले तिसी विसर्जोन ।
प्रायश्र्चित घेऊनि आपण । शुद्ध झाले परियेसा ॥ १५५ ॥
शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी ।
प्रगटरुप अहर्निशी । रमूं लागली नगरांत ॥ १५६ ॥
तया नगरीं एक वाणी । रुपें होता अतिलावण्यी ।
पूर्ववयसी देखोनि । झाली त्याची कुलस्री ॥ १५७ ॥
तया शूद्राचे घरी । वर्तत होती ते नारी ।
ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥ १५८ ॥
स्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया ।
राजानो ब्रह्मदंडेन । यततो भोगसंग्रहांत ॥ १५९ ॥
स्रिया नासती कामत्वे । ब्राह्मण नासती हीनसेवे ।
राज्य जाय द्विजक्षोभें । यति नासे विषयसेवनें ॥ १६० ॥
शूद्रासवें अहर्निशी । रमत होती अतिहर्षी ।
पुत्र जाहला तियेसी । तया शूद्राघरीं असतां ॥ १६१ ॥
नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसीं ।
होऊनि तया शूद्रा महिषी । होती पापिणी दुराचारी ॥ १६२ ॥
वर्ततां ऐसे एके दिवसीं । उन्मत्त होवोनि परियेसीं ।
छेदिलें वांसरुं आहारासी । मेष म्हणोनि पापिणीनें ॥ १६३ ॥
छेदोनि वत्स परियेसीं । पाक केला विनयेसीं ।
शिर ठेविलें शिंकेसी । एके दिवसीं भक्षावया ॥ १६४ ॥
आपण भ्रमित मद्यपानीं । जागृत जाहली अस्तमानीं ।
वांसरुं पाहतसे भुवनीं । धेनू दोहावयालागीं ॥ १६५ ॥
वत्सस्थानीं असे मेष । अमित जाहली अतिक्लेश ।
घरांत पाहातसे शिरास । व्यक्त दिसे वांसराचे ॥ १६६ ॥
अनुतप्त होवोनि तया वेळी । ‘ शिव शिव ‘ म्हणे चंद्रमौळी ।
अज्ञाने ऐशी पापें घडलीं । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥ १६७ ॥
तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी ।
पति कोपेल म्हणोनि परियेसीं । अस्थिचर्म निक्षेपिलें ॥ १६८ ॥
जाऊनि सांगे शेजारी लोकां । व्याघ्रे भक्षिले वत्सासी ऐका ।
रोदन करी समस्तांपुढे देखा । पतीपुढे येणेपरी ॥ १६९ ॥
ऐसी कितीक दिवसवरी । नांदत होती शूद्राघरीं ।
पंचत्व पावली ती नारी । नेली दूतीं यमपुरासी ॥ १७० ॥
घातलें तिसी नरकांत । भोग भोगी अतिदुःखित ।
पुनरपि चांडाळीजात । उपजली ते नारी ऐका ॥ १७१ ॥
जाहली उपजतांचि आंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी ।
मातापिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहें ॥ १७२ ॥
उच्छिष्ट अन्न मांसपिंड । चारताति तिसी अखंड ।
बाळपणी ऐसी विघड । पोसिती तिसी अवधारा ॥ १७३ ॥
ऐसे असतां वर्तमानीं । सर्वांगी झाली कुष्वर्णी ।
पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥ १७४ ॥
सर्वांग कुष्ठव्रणे पीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात ।
याचूनि आपुले उदर भरित । रक्षण करी देह आपुला ॥ १७५ ॥
येणेपरि बहुत काळीं । वर्तत होती चांडाळी ।
क्षुधें पीडित सर्वकाळीं । आपण आंधळी कुष्ठदेही ॥ १७६ ॥
न मिळे तिसी वस्रान्न । दुःख करी आतिगहन ।
ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टें ॥ १७७ ॥
भक्षावया मागें महाजनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी ।
कधी न भरे उदर तिसी । दुःख अहर्निशी करीतसे ॥ १७८ ॥
व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी ।
दुर्गंधी ते महादोषी । सर्वागीं कुष्ठ गळतसे ॥ १७९ ॥
ऐसे वर्ततां माघमासीं । लोक निघाले यात्रेसी ।
महास्थान गोकर्णासी । कलत्रपुत्रसहित देखा ॥ १८० ॥
शिवरात्रीचे यात्रेसी । येती लोक देशोदेशीं ।
चतुर्वर्ण असमसहासी । हर्षे येती परियेसा ॥ १८१ ॥
देशोदेशींचे राजे देखा । हस्तीरथसहित ऐका ।
येती समस्त भूमंडलिका । महाबळेश्र्वरलिंगदर्शनासी ॥ १८२ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । येती यात्रेसी विनोद ।
समारंभ करिती आनंद । अमित लोक परियेसा ॥ १८३ ॥
किती हांसती गायन करिती । धांवती नृत्य करीत येती ।
शिवस्मरण गर्जती । यात्राप्रसंगे जाती देखा ॥ १८४ ॥
ऐसे महाजनांसमवेत । चांडाळी गेली याचित ।
सवे भिक्षुक बहुत । तयांसमागमें जातसे ॥ १८५ ॥
येणेपरी गोकर्णासी । चांडाळी पातली सायासी ।
करावलंबे महाजनांसी । भिक्षा मागे करुणावचनें ॥ १८६ ॥
लोक चालती मार्गांत । शयन करुनि आक्रंदत ।
करावलंबे असे मागत । महाजन लोकांसी ॥ १८७ ॥
पूर्वजन्माची पापी आपण । पीडितसें याचि कारण ।
भिक्षा घाला क्षुधानिवारण । म्हणोनि मागे सकळिकांसी ॥ १८८ ॥
नेणे कधी वस्र प्रावरण । धुळींत लोळतसे पापिण ।
क्षुधाक्रांत होतसे मरण । धर्म करा हो सकळिक ॥ १८९ ॥
सर्वांग कुष्ठरुजा गळत । वस्रावीणें बाधे शीत ।
अक्ष नाही क्षुधाक्रांत । धर्म करा सकळिक हो ॥ १९० ॥
चिरोपवासें क्षुधा बहुत । जठराग्नि असे संदीप्त ।
धर्म करा असे म्हणत । पडली असे मार्गांतु ॥ १९१ ॥
पूर्वी जन्मशतांतरी । नाही केले पुण्य येरीं ।
याचिकारणे पीडतसे भारी । धर्म करा सकळिक ॥ १९२ ॥
येणेपरी मार्गांत । चांडाळी असे याचित ।
ते दिनीं शिवरात्रि असे व्रत । कोणी न घाली भिक्षा तिसी ॥ १९३ ॥
पूजेसि जाती सकळ जन । त्यांते मागतसे आक्रंदोन ।
एक म्हणती हांसोनि । उपवास आजि अन्न कैचें ॥ १९४ ॥
हातीं होती बिल्वमंजरी । ते घातली तिचे करीं ।
हुंगोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥ १९५ ॥
कोपोन टाके ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी ।
रात्री असतां अंधकारीं । अलभ्य पूजा घडली तिसी ॥ १९६ ॥
कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी ।
पूजा पावली ते शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकीं ॥ १९७ ॥
इतुके पुण्य घडले इसी । प्रयत्न न करितां परियेसीं ।
तुष्टला तो ईश्र्वर हर्षी । भवार्णवा कडे केले ॥ १९८ ॥
येणेपरि चांडाळीसी । उपास घडला परियेसी ।
तेथूनि उठे दुसरे दिवशी । भिक्षा मागावयासी ॥ १९९ ॥
पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त जाहली उपवासे ।
चालू न शके मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥ २०० ॥
सूर्यरश्मींकरुनि तिसी । दुःख होय असमसहासीं ।
पूर्वार्जित कर्मे ऐसीं । दूत म्हणती गौतमाते ॥ २०१ ॥
ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षासमीपत ।
त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनि आलों इसी न्यावया ॥ २०२ ॥
पुण्य केले इणे आजी । उपवास शिवतिथीकाजी ।
बिल्वपत्रे ईश्र्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥ २०३ ॥
त्या पुण्येकरुनि इचे । पाप गेलें शतजन्मींचे ।
ईश्र्वरासी प्रेम इयेचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥ २०४ ॥
ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपिती अमृत ।
दिव्यदेह केले त्वरित । घेऊनि गेले शिवलोका ॥ २०५ ॥
ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारुन ।
राजयासि म्हणतसे सगुण । त्वरित जाई गोकर्णासी ॥ २०६ ॥
जातांचि तुझी पापें जाती । इह सौख्य परत्र साधती ।
संशय न धरी तूं चित्ती । म्हणोनि निरोपिलें रायासी ॥ २०७ ॥
ऐकोनि गौतमाचे वचन । राजा मनीं संतोषोन ।
पावला त्वरित गोकर्ण । पापावेगळा जाहला जाणा ॥ २०८ ॥
ऐसें पुण्यपावन स्थान । म्हणोनि श्रीपाद राहिले आपण ।
सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥ २०९ ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
श्रोते करुनि निर्धार । एकचित्तें परियेसा ॥ २१० ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
गोकर्णमहिमावर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 6
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 8
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.