श्री गुरु चरित्र परयाण का यह पांचवा अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 4
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 6
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगुरुचरित्र अध्याय पांचवा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक भक्तासी । सिद्ध सांगे विस्तारेसीं ।
अवतार झाले मानुषी । भक्तजन तारावया ॥ १ ॥
ऐक भक्ता नामधारका । अंबऋषीकारणें विष्णु ऐका ।
अंगीकारिले अवतार देखा । मानुषीं नाना रुप घेतसे ॥ २ ॥
मत्स कूर्म वराह देख । नराचें देह सिंहाचें मुख ।
वामनरुप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षत्रियकर्मी ॥ ३ ॥
दशरथकुळीं जन्म । प्रख्यात अवतार श्रीरघुराम ।
राजा होऊनि मागुती जन्म । गौळियां घरीं गुरें राखी ॥ ४ ॥
वस्त्रें फेडूनि झाला नग्न । बौद्धरुपी झाला आपण ।
होऊनि कलंकी अवतार जाण । तुरंगारुढ काय आवडी ॥ ५ ॥
नाना प्रकारें नाना वेष । अवतार हृषीकेश ।
तारावया साधु मानुष । दुष्टनिग्रह करावया ॥ ६ ॥
द्वापार जाउनी जाहला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळीं ।
आचारहीन होऊनि प्रबळीं । वर्तती, महिमा कलियुगीं ॥ ७ ॥
भक्तजनरक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ ।
सगरांकारणें भगीरथ । आणि गंगा भूमंडळीं ॥ ८ ॥
तैसी एक विप्रवनिता । आराधिलें श्रीविष्णु-दत्ता ।
तिचे उदरीं अवतार धरितां । आश्र्चर्य झालें परियेसा ॥ ९ ॥
‘ पीठापूर ‘ पूर्वदेशीं । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंब शाखेसी । नाम ‘ आपळराज ‘ जाण ॥ १० ॥
त्याची भार्या नाम ‘ सुमता ‘ । असे आचार पतिव्रता ।
अतिथी आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावें ॥ ११ ॥
ऐसें असतां वर्तमानीं । पतिसेवा एक मनीं ।
अतिथीपूजा सगुणी । करी निरंतर परियेसा ॥ १२ ॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला दत्त अतिथीवेषीं ।
श्राद्ध होतें अमावास्येसी । तया विप्राघरीं देखा ॥ १३ ॥
न जेवितां ब्राह्मण घरीं । दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळीं ॥ १४ ॥
त्रिमूर्तीचें रुप घेऊनि । स्वरुप दाविलें अतिगहनी ।
पतिव्रता धरुनि चरणीं । नमन करी मनोभावें ॥ १५ ॥
दत्तात्रेय म्हणती तियेसी । माग वो माते जें वांछिसी ।
जे जे वासना तुझे मानसीं । पावेल त्वरित म्हणितले ॥ १६ ॥
ऐकोनि स्वामीचें वचन । विप्रवनिता करी चिंतन ।
विनवीतसे कर जोडून । नानापरी स्तवोनियां ॥ १७ ॥
जय जया जगन्नाथा । तूं तारक विश्र्वकर्ता ।
माझे मनीं असे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥ १८ ॥
तूं कृपाळू सर्वां भूतीं । वेद पुराणें वाखाणिती ।
केवीं वर्णूं तुझी कीर्ति । भक्तवत्सल कृपानिधि ॥ १९ ॥
मिथ्या नव्हे तुझा बोल । जें कां ध्रुवासी दिधलें अढळ ।
बिभीषणासी स्थपियलें । राज्यीं लंकादि्वपीचे ॥ २० ॥
भक्तजनां तूं आधार । व्हावया धरिसी अवतार ।
ब्रीद असे सचराचर । चौदा भुवनांमाझारीं ॥ २१ ॥
आतां मातें वर देसी । वासना असे मानसीं ।
नव्हा अन्यथा बोलासी । कृपासिंधु देवराया ॥ २२ ॥
माझे मनींची वासना । तुवां पुरवावी जगत्रजनना ।
अनाथतारका नारायणा । म्हणोनि चरणीं लागली ॥ २३ ॥
ऐकोनि तिचें करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण ।
कर धरुन आश्र्वासोन । माग जननी म्हणतसे ॥ २४ ॥
तंव बोलिली पतिव्रता । स्वामी जें निरोपिलें आतां ।
‘ जननी ‘ नाम मज ठेवितां । कर निर्धार याचि बोलाचा ॥ २५ ॥
मज पुत्र झाले बहुत । नव्हती स्थिरजीवित ।
जे राहिले असती आतां सजीवित । अक्षहीन पादहीन ॥ २६ ॥
योग्य झाला नाहीं कोणी । काय करावे मूर्ख प्राणी ।
असोनि नसती येणे गुणीं । पुत्रावीण काय जन्म ॥ २७ ॥
व्हावा पुत्र आम्हां ऐसा । ज्ञानवंत परमपुरुषा ।
जगद्वंद्य देवसदृशा । तुम्हांसारिखा मज आतां ॥ २८ ॥
ऐकोनि तियेचें वचन । प्रसन्न झाला दत्त आपण ।
पुढें असे कार्याकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥ २९ ॥
म्हणे तापसी तियेसी । पुत्र होईल तुज तापसी ।
उद्धरील तुझ्या वंशासी । ख्यातिवंत कलियुगीं ॥ ३० ॥
असावें तुम्हीं त्याचिया बोलीं । येर्हवीं न राहे तुम्हांजवळी ।
ज्ञानमार्गें अतुर्बळी । तुमचें दैन्यहारक देखा ॥ ३१ ॥
इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं ।
विस्मय करीतसे मानसीं । विप्रवनिता तये वेळीं ॥ ३२ ॥
विस्मय करोनि घरांत । पतीसी सांगे वृत्तांत ।
दोघें हर्षनिर्भर होत । म्हणती होईल दत्तात्रेय ॥ ३३ ॥
माध्यान्हसमयीं अतिथिकाळीं । दत्तात्रेय येताति तये वेळी ।
विमुख न व्हावें तये काळीं । भिक्षा मात्र घालिजे ॥ ३४ ॥
दत्तात्रेयाचें स्थान जाण । माहूर करवीर क्षेत्र खूण ।
सदा वास याचि ग्रामा । पांचाळेश्र्वर नगरांत ॥ ३५ ॥
नाना रुपें भिक्षुकवेषें । दत्तात्रेय येताति हरुषें ।
न पुसतां माझ्या निरोपास । भिक्षा मात्र घालिजे ॥ ३६ ॥
विप्रस्त्री म्हणे पतीसी । आज अवज्ञा केली मीं तुम्हांसी ।
ब्राह्मण न जेवितां तयासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥ ३७ ॥
ऐकोनि सतीचे बोल । विप्रमन संतोषलें ।
म्हणे पतिव्रते भलें केलें । पितर जाहले माझे तृप्त ॥ ३८ ॥
करुनि कर्म पितरांचे नामीं । समर्पावें विष्णूसी आम्हीं ।
साक्षात्कारें आपण येऊनि । भिक्षा केली आम्हां घरीं ॥ ३९ ॥
कृतार्थ झाले पितृ समस्त । निर्धारें झाले स्वर्गस्थ ।
साक्षात् विष्णु भेटला दत्त । त्रयमूर्ति-अवतार ॥ ४० ॥
धन्य धन्य तुझी मातापिता । जो वर लाधलीस मुख्य आतां ।
पुत्र होईल तुज निभ्रांता । न धरीं चिंता मनासीं ॥ ४१ ॥
हर्षें निर्भर होवोनि । राहिली दोघें निश्र्चिंत मनीं ।
वर्ततां जाहली अंतर्वत्नी । विप्रस्त्री परियेसा ॥ ४२ ॥
ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं ।
विप्रें स्नान करुनि । केलें जातकर्म तये वेळीं ॥ ४३ ॥
मिळवोनि समस्त विप्रकुळीं । जातक वर्तविती तये वेळीं ।
म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्गुरु ॥ ४४ ॥
ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता ।
आम्हांसी वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविलें तया नांव ॥ ४५ ॥
‘ श्रीपाद ‘ म्हणोनि याकारणें । नाम ठेविलें तया ब्राह्मणे ।
अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥ ४६ ॥
वर्तत असतां त्याचे घरीं । झाला सात संवत्सरीं ।
मुंजीबंधन ते अवसरीं । करिता झाला दि्वजोत्तम ॥ ४७ ॥
बांधितां मुंजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी ।
मीमांसा तर्क अतिविस्तारीं । म्हणों लागला तये वेळीं ॥ ४८ ॥
ऐकोनि समस्त नगरलोक । विस्मय करिती सकळिक ।
होईल अवतार कारणिक । म्हणोनि बोलती आपणांत ॥ ४९ ॥
आचार-व्यवहार-प्रायश्र्चित्त । समस्तांसी आपण बोलत ।
वेदांतभाष्य वेदार्थ । सांगता झाला दि्वजवरांसी ॥ ५० ॥
वर्ततां ऐसें परियेसीं । झाला संवत्सर षोडशी ।
विवाह करुं म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥ ५१ ॥
विचार करिती पुत्रासवें । बा रे विवाह तुज करावें ।
श्रीपाद म्हणे ऐका भावें । माझी वांछा सांगेन ॥ ५२ ॥
कराल विवाह मज तुम्ही । सांगेन ऐका, विचारिलें आम्हीं ।
वैराग्यस्त्री असे नेमी । काम्य आमुचे तेथें असे ॥ ५३ ॥
ते स्त्रियेवांचूनि आणीक नारी । समस्त जाणा मातेसरी ।
जरी आणाल ते सुंदरी । वरुं म्हणती तये वेळीं ॥ ५४ ॥
आपण तापसी ब्रह्मचारी । योगश्रियावांचोनि नारी ।
नलगती, हा बोल धरा निर्धारीं । ‘ श्रियावल्लभ ‘ नाम माझें ॥ ५५ ॥
‘ श्रीपाद-श्रीवल्लभ ‘ ऐसे । नाम झालें त्रिमूर्ति कैसें ।
पितयातें म्हणतसे । जाऊं उत्तरपंथासी ॥ ५६ ॥
ऐकोनि पुत्राचें वचन । आठव जाहलें पूर्वील सूचन ।
भिक्षुकें सांगितलें निर्गुण । सत्य झालें म्हणतसे ॥ ५७ ॥
आतां याचिया बोलासी । मोडा घालितां परियेसीं ।
विघ्न होईल भरंवसी । म्हणोनि विचारिती तये वेळीं ॥ ५८ ॥
न म्हणावें पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी ।
जैसें याचे वसे मानसीं । तैसें करावें म्हणती मातापिता ॥ ५९ ॥
निश्र्चय करुनि आपुले मनीं । पुत्रासी म्हणती जनकजननी ।
होतों आशाबद्ध होऊनि । प्रतिपाळिसी म्हणोनियां ॥ ६० ॥
ऐसें मनीं व्याकुळित । डोळां निघती अश्रुपात ।
माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहेंकरोनियां ॥ ६१ ॥
देखोनि मातेचें दुःख । संबोखीतसे परमपुरुष ।
उठवूनि आपुल्या करकमळिकें । अश्रुपात पुसतसे ॥ ६२ ॥
अवो माते न करीं चिंता । जें जें वांछिसी तें देईन आतां ।
दृढ करुनियां चित्ता । रहा सुखें नांदत ॥ ६३ ॥
बा रे तुजकरितां आपण । दुःख विसरलें अंतःकरण ।
रक्षिसी आम्हां म्हातारपणीं । दैन्यावेगळें करिसी म्हणोनि ॥ ६४ ॥
पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन ।
त्यांतें पोसावें आतां कवणें । आमुतें कोण रक्षील ॥ ६५ ॥
ऐकोनि जननीचें वचन । अवलोकीतसे अमृतनयनें ।
पुत्र दोघे जाहले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥ ६६ ॥
जैसा चिंतामणि-स्पर्शें । लोखंड होय सुवर्णासरिसें ।
तैसें महात्मदृष्टि-वर्षे । योग्यता आली तत्काळीं ॥ ६७ ॥
वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण ।
दोघे येऊनि लागती चरणा । कृतार्थ झालों म्हणोनियां ॥ ६८ ॥
आश्र्वासून तये वेळीं । दिधला वरु तत्काळीं ।
पुत्रपौत्रादीं नांदाल प्रबळीं । श्रियायुक्त सनातन ॥ ६९ ॥
सेवा कराल जनकजननी । पावाल सुख महाज्ञानी ।
इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्र्चित ॥ ७० ॥
ऐसें बोलोनि तयांसी । संबोखीतसे मातेसी ।
पाहोनि दोघां पुत्रांसी । राहतां सौख्य पावाल ॥ ७१ ॥
पुत्र दोघे शतायुषी । निर्धार धरीं वो मानसीं ।
कन्या पुत्र होतील त्यांसी । पौत्रपुत्र पहाल नयनीं ॥ ७२ ॥
अखंड लक्ष्मी यांचे घरीं । यांचे वंशपारंपरीं ।
कीर्तिवंत सचराचरीं । संपन्न होतील वेदशास्त्रीं ॥ ७३ ॥
आमची अवज्ञा न करितां । निरोप द्यावा अवो माता ।
जाणें असे उत्तरपंथा । दीक्षा देणें साधुजनां ॥ ७४ ॥
ऐसें सांगोनि मातापित्यांसी । अदृश्य झाला परियेसीं ।
पावला त्वरित पुरी काशी । गुप्तरुपें होता तेथें ॥ ७५ ॥
निघाला तेथूनि बदरीकानना । भेटी घेउनि नारायणा ।
अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेहीं ॥ ७६ ॥
दीक्षा करावया साधुजनां । तीर्थें हिंडतसे आपण ।
मनोवेगें मार्गक्रमण । आले तीर्थ गोकर्णासी ॥ ७७ ॥
ऐकोनि सिद्धाचें वचन । विनवी नामधारक आपण ।
तें परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वती गंगाधरु ॥ ७८ ॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
दत्तात्रेय श्रीपादावतारकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥
श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 4
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 6
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.