श्री गुरु चरित्र परयाण का यह छियालीसवाँ अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है .
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 45
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 47
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें कथा वर्तली कैसी ।
तें विस्तारोनि सांगावें आम्हांसी । कृपा करी गा दातारा ॥ १ ॥
सिद्ध म्हणे श्रीमंता । ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा ।
तुज होतील पुत्रपौत्रा । सदा श्रियायुक्त तूं होसी ॥ २ ॥
सांगो आतां एक विचित्र । जेणें होतील पतित पवित्र ।
ऐसें असे श्रीगुरुचरित्र । तत्परेंसीं परियेसा ॥ ३ ॥
गाणगापुरीं असतां श्रीगुरु । सण आला दिपवाळी थोरु ।
शिष्य आले पाचारुं । आपुले घरी भिक्षेसी ॥ ४ ॥
सप्त शिष्य बोलाविती । एकाहूनि एक प्रीतीं ।
सातै जण पायां पडती । यावें आपुले घरासी ॥ ५ ॥
एकएक ग्राम एकेकासी । श्रीगुरु म्हणती तयांसी ।
समस्तांच्या घरीं यावें कैसी । तुम्ही आपणचि विचारा ॥ ६ ॥
तुम्हीं वांटा आपणियांत । कवणाकडे निरोप होत ।
तेथें आम्ही जाऊं म्हणत । शिष्याधीन आम्ही असों ॥ ७ ॥
आपणांत आपण पुसती । समस्त आपण नेऊं म्हणती ।
एकमेकांत झगडती । आपुला स्वामी म्हणोनियां ॥ ८ ॥
श्रीगुरु वारिती तयांसी । तुम्ही भांडतां कासयासी ।
आम्ही एक गुरु सातांसी । एका घरीं येऊं म्हणती ॥ ९ ॥
ऐसें वचन ऐकोनि । समस्त विनविती कर जोडूनि ।
स्वामी प्रपंच न पहावा नयनीं । समर्थ-दुर्बळ म्हणों नये ॥ १० ॥
समस्तांसी पहावें समान । न विचारावें न्यून पूर्ण ।
उपेक्षिसी दुर्बळ म्हणोन । गंगाप्रवेश करुं आम्ही ॥ ११ ॥
विदुराचिया घरासी । श्रीकृष्ण जाय भक्तींसीं ।
राजा-कौरवमंदिरासी । नवचे तो भक्तवत्सल ॥ १२ ॥
आम्ही समस्त तुमचे दास । कोणासी न करावें उदास ।
जो निरोप द्याल आम्हांस । तोचि आपण करुं म्हणती ॥ १३ ॥
ऐसें म्हणोनियां समस्त । करिती साष्टांग दंडवत ।
समस्त आम्हां पहावें म्हणत । विनविताति श्रीगुरुसी ॥ १४ ॥
श्रीगुरु म्हणती समस्तांसी । येऊं तुमच्या घरासी ।
चिंता न धरावी मानसीं । भाक आमुची घ्या म्हणती ॥ १५ ॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरुवचन । विनविताति सातै जण ।
समस्तां आश्र्वासितां येऊं म्हणोन । कवणें करावा भरंवसा ॥ १६ ॥
श्रीगुरु मनीं विचारिती । अज्ञानी लोक नेणती ।
तयां सांगावें एकांतीं । एकेकातें बोलावूनि ॥ १७ ॥
जवळी बोलावूनि एकासी । कानीं सांगती तयासी ।
आम्ही येतों तुझे घरासी । कोणापुढें न सांगावें ॥ १८ ॥
ऐसी भाक तयासी देती । उठोनि जाईं गांवा म्हणती ।
दुजा बोलावूनि एकांती सांगती । येऊं तुझ्या घरासी ॥ १९ ॥
ऐसें सांगोनि तयासी । पाठविलें ग्रामासी ।
बोलावूनि तिसरेयासी । तेणेंचि रीतीं सांगती ॥ २० ॥
ऐसें सातै जण देखा । समजावोनि गुरुनायका ।
पाठविले तेणेचिपरी ऐका । महदाश्र्चर्य वर्तले ॥ २१ ॥
एकमेकां न सांगत । गेले सारही भक्त ।
श्रीगुरु आले मठांत । अतिविनोद प्रवर्तला ॥ २२ ॥
ग्रामांतील भक्तजन । हे व्यवस्था ऐकोन ।
विनविताति कर जोडोन । आम्हां सांडोनि जातां स्वामी ॥ २३ ॥
त्यांसी म्हणती श्रीगुरुमूर्ति । आम्ही राहिलों जाणा चित्तीं ।
न करावी मनी खंती । आम्ही असों येथेंचि ॥ २४ ॥
ऐसें बोलतां संतोषीं । जवळीं होऊं आली निशी ।
दिवाळीची त्रयोदशी । रात्रीं मंगळस्नान करावें ॥ २५ ॥
आठरुप झाले आपण । अपार महिमा नारायण ।
सात ठायींही गेले आपण । गाणगापुरीं होतेचि ॥ २६ ॥
ऐसी दिपवाळी जाहली । समस्तां ठायीं पूजा घेतली ।
पुनः तैसेचि व्यक्त जाहले । गौप्यरुपें कोणी नेणें ॥ २७ ॥
कार्तिकमासी पौर्णिमेसी । करावया दिपाराधनेसी ।
समस्त भक्त आले दर्शनासी । गाणगाग्रामीं श्रीगुरुजवळी ॥ २८ ॥
समस्त नमस्कार करिती । भेटीं दहावे दिवसीं म्हणती ।
एकमेकांते विचारिती । म्हणती आपले घरीं गुरु होते ॥ २९ ॥
एक म्हणती सत्य मिथ्या । समस्त शिष्य खुणा दावित ।
आपण दिल्हें ऐसें वस्त्र । तें गा श्रीगुरुजवळी असे ॥ ३० ॥
समस्त जाहले तटस्थ । ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत ।
आमुचे गुरु येथेंचि होते । दिपवाळी येथेंचि केली ॥ ३१ ॥
विस्मय करिती सकळही जन । म्हणती होय हा त्रैमूर्ति आपण ।
अपार महिमा नारायण । अवतार होय श्रीहरीचा ॥ ३२ ॥
ऐसे म्हणोनि भक्त समस्त । नानापरी स्तोत्र करीत ।
न कळे महिमा तुझी म्हणत । वेदमूर्ति श्रीगुरुनाथा ॥ ३३ ॥
तूंचि विश्र्वव्यापक होसी । महिमा न कळें आम्हांसी ।
काय वर्णावें श्रीचरणासी । त्रैमूर्ति तूंचि एक ॥ ३४ ॥
ऐसी नानापरी स्तुति करिती । दीपाराधना अतिप्रीतीं ।
ब्राह्मणभोजन करविती । महानंद भक्तजना ॥ ३५ ॥
श्रीगुरुमहिमा ऐसी ख्याती । सिद्ध सांगे नामधारकाप्रती ।
भूमंडळीं झाली ख्याति । श्रीनृसिंहसरस्वतीची ॥ ३६ ॥
म्हणे सरस्वती-गंगाधरु । जवळी असतां कल्पतरु ।
नोळखिती जन अंध-बधिरु । वायां कष्टती दैन्यवृत्तीं ॥ ३७ ॥
भजा भजा हो श्रीगुरुसी । जें जें काम्य तुमचे मानसीं ।
साध्य होईल त्वरितेसीं । आम्हां प्रचीति आली असे ॥ ३८ ॥
अमृत पान करावयासी । अनुमान पडे मूर्खासी ।
ज्ञानवंत भक्तजनांसी । नामामृत श्रीगुरुचें ॥ ३९ ॥
श्रीगुरुसेवा करा हो करा । मारीतसे मी डांगोरा ।
संमत असे वेदशास्रां । गुरु तोचि त्रैमूर्ति ॥ ४० ॥
गुरुवेगळी गति नाहीं । वेदशास्रें बोलतीं पाहीं ।
जे निंदिती नरदेहीं । सूकरयोनीं जन्मती ॥ ४१ ॥
तुम्ही म्हणाल मज ऐसी । आपुले इच्छेनें लिहिलेंसी ।
वेदशास्र-संमतेसीं । असेल तरी अंगीकारा ॥ ४२ ॥
संसारसागर धुरंधर । उतरावया पैलपार ।
आणिकाचा निर्धार । नव्हे गुरुवांचोनि ॥ ४३ ॥
निर्जळ संसार-अरण्यांत । पोई घातली असे अमृत ।
सेवा सेवा तुम्ही समस्त । अमरत्व त्वरित होईल ॥ ४४ ॥
श्रीगुरु नृसिंहसरस्वती । अवतरला असे त्रयमूर्ति ।
गाणगाग्रामीं वास करिती । आतां असे प्रत्यक्ष ॥ ४५ ॥
जे जे जाती तया स्थाना । तात्काळ होय मनकामना ।
कांही न करावें अनुमाना । प्रत्यक्ष देव तेथें असे ॥ ४६ ॥
आम्हीं सांगतों तुम्हांसी हित । प्रशस्त झालिया तुमचें चित्त ।
गाणगापुरा जावें त्वरित । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥ ४७ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
अष्टस्वरुपधारणं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 45
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 47
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.