श्री गुरु चरित्र परयाण का यह पैंतालीसवाँ अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है .
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 44
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 46
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥
नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा निरोपिलीसी ।
नंदीनामा कवि ऐसी । दुसरा आणिक आला म्हणोनि ॥ १ ॥
कवणेंपरी झाला शिष्य । तें सांगावें जी आम्हांस ।
विस्तार करुनि आदिअंतास । कृपा करुनि दातारा ॥ २ ॥
सिद्ध म्हणे नामधारका । सांगो तूंतें कथा ऐका ।
आश्र्च्रर्य झालें कवतुका । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ ३ ॥
गाणगापुरीं असतां गुरु । ख्याती झाली अपरांपरु ।
लोक येती थोरथोरु । भक्त बहुत जाहलें ॥ ४ ॥
नंदीनामा कवि होता । कवित्व केलें अपरिमिता ।
समस्त लोक शिकती अमृता । प्रकाश झाला चहूं राष्ट्रीं ॥ ५ ॥
ऐसें असतां एके दिवसीं देखा । श्रीगुरुसी नेलें भक्तें एका ।
आपुले घरी शोभनदायका । म्हणोनि नेलें आपुले ग्रामा ॥ ६ ॥
हिपरगी म्हणिजे ग्रामासी । नेलें आमुचे श्रीगुरुसी ।
पूजा केली तेथें बहुवसी । समारंभ थोर जाहला ॥ ७ ॥
तया ग्रामी शिवालय एक । नाम ‘ कल्लेश्र्वर ‘ लिंग ऐक ।
जागृत स्थान प्रख्यात निक । तेथें एक द्विजवर सेवा करी ॥ ८ ॥
तया नाम ‘ नरहरी ‘ । लिंगसेवा बहु करी ।
आपण असे कवीश्र्वरी । नित्य करी पांच कवित्वें ॥ ९ ॥
कल्लेश्र्वरावांचूनि । आणिक नाणी कदा वचनीं ।
एकचित्तें एकमनीं । शिवसेवा करीतसे ॥ १० ॥
समस्त लोक त्यासी म्हणती । तुझे कवित्वाची असे ख्याति ।
श्रीगुरुसी कवित्वावरी प्रीति । गुरुस्मरण करीं तूं कांहीं ॥ ११ ॥
त्यांसी म्हणे तो नर । कल्लेश्र्वरासी विकिलें जिव्हार ।
अन्यत्र देव अपार । नरस्तुति मी न करीं ॥ १२ ॥
ऐसें बोलोनियां आपण । गेला देवपूजेकारण ।
पूजा करितां तत्क्षण । निद्रा आली तया देखा ॥ १३ ॥
नित्य पूजा करुनि आपण । कवित्व करी पार्वतीरमणा ।
ते दिवसीं अपरिमाण । निद्रा आली तया देखा ॥ १४ ॥
निद्रा केली देवळांत । देखता झाला स्वप्नांत ।
लिंगावरी श्रीगुरु बैसत । आपण पूजा करितसे ॥ १५ ॥
लिंग न दिसे श्रीगुरु असे । आपणासी पुसती हर्षे ।
नरावरी तुझी भक्ति नसे । कां गा आमुतें पूजितोसि ॥ १६ ॥
षोडशोपचारेंसीं आपण । पूजा करी स्थिर मनीं ।
ऐसें देखोनियां स्वप्न । जागृत झाला तो द्विज ॥ १७ ॥
विस्मय करी आपुले मनीं । म्हणे नरसिंहसरस्वती शिवमुनि ।
आला असे अवतरोनि । आपण निंदा त्याची केली ॥ १८ ॥
हाचि होय सद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
भेट घ्यावी आतां निर्धारु । म्हणूनि आला श्रीगुरुपाशी ॥ १९ ॥
आला विप्र लोटांगणेंसी । येऊनि लागला चरणांसी ।
कृपा करी गा अज्ञानासी । नेणों तुझें स्वरुप आपण ॥ २० ॥
प्रपंचमाया वेष्टोनि । नोळखें आपण अज्ञानी ।
तूंचि साक्षात् शिवमुनि । निर्धार जाहला आजि मज ॥ २१ ॥
कल्लेश्र्वर कर्पूरगौरु । तूंचि होसी जगद्गुरु ।
माझें मन झालें स्थिरु । तुझे चरणीं विनटलो ॥ २२ ॥
तूंचि विश्र्वाचा आधारु । शरणागता वज्रपंजरु ।
चरणकमळ वास भ्रमर । ठाकोनि आलों अमृत घ्यावया ॥ २३ ॥
जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु ।
घरा आलिया कामधेनु । दैन्य काय आम्हांसी ॥ २४ ॥
पूर्वी समस्त ऋषि देखा । तप करिती सहस्र वर्षे निका ।
तूं न पावसी एकएका । अनेक कष्ट करिताति ॥ २५ ॥
न करितां तपानुष्ठान । आम्हां भेटलासि तूं निधान ।
झाली आमुची मनकामना । कल्लेश्र्वर लिंग प्रसन्न झालें ॥ २६ ॥
तूंचि सत्य कल्लेश्र्वरु । ऐसा माझे मनी निर्धारु ।
कृपा करी गा जगद्गुरु । म्हणोनि चरणीं लागला ॥ २७ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । नित्य आमुची निंदा करिसी ।
आजि कैसे तुझे मानसी । आलासी भक्ति उपजोनि ॥ २८ ॥
विप्र म्हणे स्वामियासी । अज्ञान अंधकार आम्हांसी ।
कैसे भेटाल परियेसीं । ज्योतिर्मय न होतां ॥ २९ ॥
म्यां कल्लेश्र्वराची पूजा केली । तेणें पुण्यें आम्हां भेटी लाधली ।
आजि आम्ही पूजेसी गेलो तें काळीं । लिंगस्थानीं तुम्हांसि देखिले ॥ ३० ॥
स्वप्नावस्थेंत देखिलें आपण । प्रत्यक्ष भेटले तुझे चरण ।
स्थिर जाहलें अंतःकरण । मिळवावें शिष्यवर्गांत ॥ ३१ ॥
ऐसें विनवोनि द्विजवर । स्तोत्र करीतसे अपार ।
स्वप्नीं पूजा षोडशोपचार । तैसें कवित्व केलें देखा ॥ ३२ ॥
मानसपूजेचे विधान । पूजा व्यक्त केली त्याणें ।
श्रीगुरु म्हणती तत्क्षण । आम्ही स्वप्नरुप लोकांसी ॥ ३३ ॥
प्रत्यक्ष आम्ही असतां देखा । स्वप्नावस्थीं कवित्व ऐका ।
येणें भक्तें केले निका । स्वप्नीं भेदूनि समस्त ॥ ३४ ॥
ऐसे म्हणोनि शिष्यांसी । वस्त्रे देती त्या कवीसी ।
लागला तो श्रीगुरुचरणासी । म्हणे आपण शिष्य होईन ॥ ३५ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । कल्लेश्र्वर श्रेष्ठ आम्हांसी ।
पूजा करी गा नित्य त्यासी । आम्ही तेथे सदा वसों ॥ ३६ ॥
विप्र म्हणे स्वामियासी । प्रत्यक्ष सांडोनि चरणासी ।
काय पूजा कल्लेश्र्वरासी । तेथेंही तुम्हांसी म्यां देखिलें ॥ ३७ ॥
तूंचि स्वामी कल्लेश्र्वरु । त्रयमूर्तींचा अवतारु ।
हाचि माझा सत्य निर्धारु । न सोडीं आतां तुझे चरण ॥ ३८ ॥
ऐेसे विनवोनि स्वामियासी । आला सवें गाणगापुरासी ।
कवित्वें केलीं बहुवसी । सेवा करीत राहिला ॥ ३९ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । कवीश्र्वर दोघे श्रीगुरुपाशीं ।
आले येणे रीतीसी । भक्ति करिती बहुवस ॥ ४० ॥
म्हणे सरस्वती-गंगाधरु । ज्यासी प्रसन्न होय श्रीगुरु ।
त्याचे घरी कल्पतरु । चिंतिले फळ पाविजे ॥ ४१ ॥
कथा कवीश्र्वराची ऐसी । सिद्ध सांगे नामधारकासी ।
पुढील कथा विस्तारेंसी । सांगेल सिद्ध नामधारका ॥ ४२ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
नरहरिकवीश्र्वर-वरप्राप्ति नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 44
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 46
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.