श्री गुरु चरित्र परयाण का यह चवालीसवाँ अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है .
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 43
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 45
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धामुनि । श्रीगुरुचरित्र तुम्हीं देखिलें नयनीं ।
तुमचें भाग्य काय वानूं वदनीं । परब्रह्म देखिलें असे ॥ १ ॥
तुमचेनि प्रसादेंसीं । अमृतपान झालें आम्हांसी ।
आतां कष्ट आम्हां कायसी । सकळभीष्ट लाधलों ॥ २ ॥
तुम्ही भेटलेति मज तारक । दैन्य गेलें सकळ दुःख ।
सर्वाभीष्ट लाधलों सुख । गुरुचरित्र ऐकतां ॥ ३ ॥
मागें कथानक सांगितलें । श्रीगुरु संगमीं राहिले ।
पुढे काय अपूर्व वर्तलें । निरोपावें दातारा ॥ ४ ॥
सिद्ध सांगे नामधारकासी । ऐक वत्सा विस्तारेंसी ।
विचित्र झालें येरे दिवसीं । एक चित्तें परियेसा ॥ ५ ॥
‘ नंदी ‘ नाम एक ब्राह्मण । सर्वांगीं कुष्ट श्र्वेतवर्ण ।
तुळजापुरा जाऊन । वर्षें तीन आराधिलें ॥ ६ ॥
तीन संवत्सर उपवास । द्विज कष्टला बहुवस ।
निरोप झाला सायासें । चंदलापरमेश्र्वरी जवळी जाणें ॥ ७ ॥
जगदंबेचा निरोप घेऊनि । आला चंदलापरमेश्र्वरीस्थानीं ।
मास सात पुरश्र्चरणीं । पुनरपि केले उपवास ॥ ८ ॥
नानापरी कष्टतां । स्वप्न जाहलें अवचिता ।
तुवां जावें त्वरिता । गाणगग्रामस्थानासी ॥ ९ ॥
तेथें असती श्रीगुरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
वेष धरिला असे नरु । तेथें होसील उत्तमांगी ॥ १० ॥
ऐसे निरोप त्यासी जाहले । विप्र म्हणे भलें केले ।
मास सात कां चुकर केलें । जरी तुझे हातीं नोहेचि ॥ ११ ॥
जगन्माता तुळजाभवानी । तिचा निरोप घेऊनि ।
आलों तुजपाशीं ठाकोनि । तूं दैवत म्हणोनियां ॥ १२ ॥
दैवतपण ठाउकें जाहलें । आम्हांसी निरोप दिधलें ।
मनुष्यापाशीं जा म्हणितलें । तुझे हातीं नोहेचि कांहीं ॥ १३ ॥
तूं जगद्दैवत जगदंबा म्हणविसी । आम्हां मनुष्यापाशीं पाठविसी ।
नांव जाहलें दैवतपणासी । भाग्य माझें म्हणतसे ॥ १४ ॥
मनुष्यापाशीं जा म्हणावयासी । लाज न ये कैसी तुम्हांसी ।
ओळख जाहली दैवतपणासी । उपवासी सात महिने ॥ १५ ॥
पहिलेंचि जरी निरोप देत । इतुके कष्ट आम्हां न होत ।
दुराशा केली मी परदैवत । म्हणोनि; दुःख करी नानापरी ॥ १६ ॥
ऐसें अनेकपरीनें । दुःख करीतसे तो ब्राह्मण ।
पुन्हा मागुती पुरश्र्चरण । करीन म्हणे तो द्विज ॥ १७ ॥
म्हणे मज बरवें होणें । अथवा आपुला प्राण देणें ।
ऐसें बोलोनि निर्वाणें । विप्र धरणें बैसला ॥ १८ ॥
पुनरपि स्वप्न तयासी । तैसेंचि होय परियेसीं ।
आणिक समस्त भोपियांसी । तेणेंचिपरी स्वप्न होय ॥ १९ ॥
सकळ भोपे म्हणती तयासी । आजि स्वप्न झालें आम्हांसी ।
छळण न करीं गा देवीसी । निरोपासरसा जाईं वेगीं ॥ २० ॥
तूं तरी आतां नव जासी । आम्हां निरोप झाला ऐसी ।
बाहेर घालूं तुम्हांसी । देवळांत येऊं नेदूं ॥ २१ ॥
इतुकें जाहलियावरी । पारणें केलें द्विजवरीं ।
पूजा करी नानापरी । निरोप घेऊनि निघाला ॥ २२ ॥
गाणगाग्रामासी आला । मठीं जाऊनि पुसों लागला ।
भक्तजन सांगती त्याला । संगमीं आहेत गुरुमूर्ति ॥ २३ ॥
भक्त म्हणती तयासी । श्रीगुरु येतील पारणेसी ।
काल शिवरात्री-उपवासी । आतां येतील परियेसीं ॥ २४ ॥
इतुकिया अवसरीं । श्रीगुरु आले साक्षात्कारी ।
ग्रामलोक द्विजातें वारी । राहें दूरी नको सन्मुख ॥ २५ ॥
श्रीगुरु आले मठांत । द्विज उभा होता चिंतीत ।
भक्तजन सांगती मात । विप्र एक आला असे ॥ २६ ॥
सर्वांगी असे श्र्वेत । स्वामीदर्शना आलों म्हणत ।
श्रीगुरु म्हणती आपण जाणत । संदेहरुपें आला असे ॥ २७ ॥
म्हणती बोलवा मठांत । भक्त गेले धांवत ।
तया द्विजातें पाचारीत । आला विप्र आंगणा ॥ २८ ॥
दुरोनि देखिलें श्रीगुरुसी । नमन करीत लोळे भूमीसी ।
श्रीगुरु म्हणती तयासी । संदेहरुपें आलासि कां ॥ २९ ॥
देवीपासूनि मनुष्यापाशीं । येणें झालें काय कार्येंसी ।
संदेह करोनि मानसीं । कैसा आलासी द्विजवरा ॥ ३० ॥
ऐसें वचन ऐकोनि । आपुले मनीचें जाणिलें म्हणोनि ।
क्षमा करीं गा स्वामी म्हणोनि । लोटांगणीं येतसे ॥ ३१ ॥
म्हणे स्वामी आपण तमांध । तुझे दर्शनें झालों सुबुद्ध ।
अज्ञानें वेष्टिलों होतों मंद । नेणें सोय परब्रह्मा ॥ ३२ ॥
तूं साक्षात् वस्तु म्हणोनि । नेणों आपंण तमोगुणी ।
आजि माझा सुदिन । दर्शनें झालो पुनीत ॥ ३३ ॥
पापकर्मी पापी आपण । पापात्मा नेणें निज खूण ।
पापें संभवलों पूर्ण । आलों शरण तुजपाशीं ॥ ३४ ॥
तूं भक्तजना आधार । शरणगता वज्रपंजर ।
ब्रीद वानिती सचरसचर । श्रीगुरु नृसिंहसरस्वतीचें ॥ ३५ ॥
आजि माझे कुकर्म गेलें । परब्रह्मचरण देखिलें ।
मनोरथ माझे पुरले । कृपासागरा यतिराया ॥ ३६ ॥
तूं भक्तजनाची कामधेनु । मनुष्यवेषीं आलासि अवतरोनु ।
तुझा पार जाणे कवणु । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥ ३७ ॥
जैसी सगरांवरी गंगा । पावन करावया आली जगा ।
तैसा तूं भक्तसेवकवर्गा । तारावया अवतरलासी ॥ ३८ ॥
का अहिल्या झाली पाषाण । दिव्यदेही झाली लागता चरण ।
तैसे मज आजि निर्गुण । झालें स्वामी गुरुनाथा ॥ ३९ ॥
व्रतबंध विवाह झालियावरी । व्याधि उद्भवली आपुले शरीरीं ।
स्त्री राहिली माहेरीं । स्पर्शों नये शरीर म्हणे ॥ ४० ॥
आपुले असती मातापिता । सकळ म्हणती जाईं परता ।
दुःख जाहलें अपरिमिता । संसार त्यजूनि निघालों ॥ ४१ ॥
गेलों होतों तुळजापुरा । उपवास केले अपारा ।
मज म्हणती तूं पापभारा । नव्हे तुज बरवें आतां ॥ ४२ ॥
निरोप दे जा सन्नतीं । जेथें चंदलापरमेश्र्वरी वसती ।
तेथें होईल निवृत्ति । पाप जाईल म्हणोनि ॥ ४३ ॥
तेथेंही कष्ट केले बहुत । नव्हेचि कांहीं, देवी उबगत ।
निरोप झाला जा म्हणत । कृपामूर्ति तुजपाशीं ॥ ४४ ॥
ऐसें माझे दैव हीन । उबगताति देव आपण ।
मज देखोनि निर्वाण । बाहेर घाला म्हणताति ॥ ४५ ॥
देवता आपण उबगताति । मनुष्य कैसे मज देखती ।
निर्वाणीं आलों तुम्हांप्रती । निर्धार केला मरणाचा ॥ ४६ ॥
ऐसा पापीं असोनि आपण । काय करावें अंग हीन ।
तोंड न पाहती कुष्ठी म्हणोन । मरण बरवें यापरतें ॥ ४७ ॥
आतां असे एक विनंती । होय अथवा नव्हे निश्र्चितीं ।
शीघ्र निरोपावें यति । दैवतें चाळवितीं आशाबद्धें ॥ ४८ ॥
मज चाड नाहीं शरीराची । प्राण देईन सुखेंचि ।
तूं रक्षक माउली शरणागताची । निरोपावें दातारा ॥ ४९ ॥
ऐसें करुणावचन ऐकोन । श्रीगुरु बोलती हांसोन ।
सोमनाथ ब्राह्मण बोलावून । निरोप देती न्याया संगमासी ॥ ५० ॥
बरवा संकल्प सांगोनि । स्नान करवा षट्कूळभुवनीं ।
अश्र्वत्थप्रदक्षिणा करवूनि । वस्त्रें टाका दूर त्याचीं ॥ ५१ ॥
नवीं वस्त्रें द्या यासीं । शीघ्र आणा पारणेसी ।
ऐसा निरोप देती त्यांसी । दोघे गेले झडकरी ॥ ५२ ॥
स्नान करुनि बाहेर आला । शरीरवर्ण पालटला ।
अश्र्वत्थप्रदक्षिणा करुं लागला । सु-वर्ण जाहलें सर्वांग ॥ ५३ ॥
वस्त्रें देती ब्राह्मणासी । जीर्ण वस्त्रें टाकिती दूरेंसी ।
जेथें टाकिती ते भूमीसी । क्षार भूमि होय त्वरित ॥ ५४ ॥
सांगातें घेऊनि द्विजासी । सोमनाथ आला मठासी ।
चरणीं घातलें तयासी । लोक सर्व विस्मित ॥ ५५ ॥
नंदीनामें केला नमस्कार । संतोषें स्तोत्र करी अपार ।
हर्षें जाहला निर्भर । लोळतसे पादुकांवरी ॥ ५६ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । तुझी कामना झाली परियेसीं ।
सर्वांग आहे कैसी । अवलोकोनि पाहे म्हणती ॥ ५७ ॥
पाहतां सर्वांग बरवें जाहलें । तावन्मात्र जंघेसी राहिलें ।
पाहतां मन त्याचें भ्यालें । म्हणे स्वामी असे थोडें ॥ ५८ ॥
तुझी कृपादृष्टि झाली असतां । थोडे राहिलें म्हणे केवीं आतां ।
करीतसे दंडवता । कृपा करीं गा परमात्मा ॥ ५९ ॥
श्रीगुरुमूर्ति निरोपिती तयासी । तूं संशय करोनि आलासी ।
मनुष्य काय करील म्हणोनि मानसीं । तेणें गुणें राहिलें थोडें ॥ ६० ॥
त्यासी असे एक प्रतीकार । तुवां कवित्व सांगावें अपार ।
आमुची स्तुति करावी निरंतर । बरवें होईल तुज मग ॥ ६१ ॥
नंदीनामा म्हणे स्वामीसी । लिखित नेणें वाचावयासी ।
कैसें करुं मी कवित्वासी । मंदमति असे आपण ॥ ६२ ॥
काय जाणें कवित्वस्थिति । मज नाहीं काव्यव्युत्पत्ति ।
स्वामी ऐसा निरोप देती । म्हणोनि चरणीं लागला ॥ ६३ ॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । मुख उघडीं काढीं जिव्हेसी ।
विभुति शिंपिती तयासी । ज्ञान उपजले ब्राह्मणा ॥ ६४ ॥
चरणांवरी ठेविला माथा । उभा ठेला स्तोत्र करितां ।
म्हणे स्वामी मी नेणता । सेवेसी नव्हे अराणुक ॥ ६५ ॥
मायापाशीं वेष्टोनि । बुडत होतों संसारगहनीं ।
आठवण न करीं कधीं मनीं । तुझे चरणा विसरलों ॥ ६६ ॥
संसार-सागर मायाजाळ । योनीं जन्मोनि चौर्यांशीं लक्षकुळ ।
आठवण नव्हे तुझें नाम केवळ । मंदमति जाहली मज ॥ ६७ ॥
स्वेदज अंडज उद्भिज्जेंसी । जन्मा आलो पशुयोनीसी ।
तव ज्ञान कैंचें आम्हांसी । स्थावर जंगम जैं होतों ॥ ६८ ॥
नानायोनींत मनुष्यु विशेष । शूद्रादि याती बहुवस ।
जघीं होतों त्या जन्मास । काय जाणें तुझी सोय ॥ ६९॥
समस्त जन्मांत एक । ब्राह्मणजन्म विशेख ।
काय करावें होऊनि मूर्ख । गुरुसोय नेणे नर ॥ ७० ॥
मातेचें शोणित पित्याचें रेत । संपर्क जहाला जननीगर्भांत ।
जैसें सुवर्ण मुशीं असे कढत । दिवस पांच बुदबुदाकार ॥ ७१ ॥
पंधरा दिवसा होय स्थिर । एक रस होऊनि निर्धार ।
तधीं मीं काय जाणें गुरु । नाहीं पंचतत्वें मज ॥ ७२ ॥
मासें एक पिंड होय । द्वय मासीं शिर पाय ।
तिसरे मासीं सर्व अवयव । नवद्वारें झालीं मग ॥ ७३ ॥
पंचतत्वें होतीं एक । वायु-आप-पृथ्वी-तेज-ख ।
प्राण आला तात्काळिक । तधीं स्मरण कैंचे मज ॥ ७४ ॥
पांचवे मांसी त्वचा रोम । सहावे मासी उच्छवास आम्हां ।
सातवे मासीं श्रोत्र जिव्हा । मेद मज्जा दृढ जाहली ॥ ७५ ॥
ऐसे नव मास कष्टत । होतों जननिये-गर्भांत ।
रुधिर-विष्ठा-मूत्रांत । कष्टलों भारी स्वामिया ॥ ७६ ॥
माता भक्षी उश्ण क्षार । तेणें तीक्ष्णें कष्टलों अपार ।
पडे लोळे अनेक प्रकार । दुःख तेव्हां सांगूं कोणा ॥ ७७ ॥
मना आलें भक्षण करीं । दुःख होय मज अपारी ।
ऐसें नवमासवरी । मातागर्भी कष्टलों ॥ ७८ ॥
तधीं कैंचे तुझे स्मरण । वेष्टिलो होतों मायावरणें ।
स्मरलों नाहीं तुझे चरण । मग योनिमुखीं जन्मलों ॥ ७९ ॥
उपजतांचि अपणासी । आयुष्य लिहिलें लल्लातेसी ।
अर्ध गेलें वृथा निशीं । रात्री निद्रा मानवा ॥ ८० ॥
उरलें आयुष्यांत देखा । तीन भाग केले विशेखा ।
बाल यौवन वृद्धाप्य ऐका । निर्माण झाले तये वेळीं ॥ ८१ ॥
बाळपणीं आपणासी । कष्ट झाले असमसाहसी ।
मज घालिती पाळणेसी । मळमूत्रांत लोळतसें ॥ ८२ ॥
बाळपणींचे दुःख आठवितां । शोक होय मज अपरिमिता ।
काय सांगूं गुरुनाथा । नाना आपदा भोगिल्या ॥ ८३ ॥
शयनस्थानीं मलमूत्रांत । निरंतर असें लोळत ।
आपली विष्टा आपण खात । अज्ञानतिमिरें वेष्टिलों ॥ ८४ ॥
एकादे समयीं आपणासी । पोटशूळ उठे बहुवसीं ।
रोदन करितां परियेसीं । स्तनपान मला करविती ॥ ८५ ॥
क्षुधाक्रांत होय बहुत । मज म्हणती पोट दुखत ।
अंगुली घालूनि मुखांत । वोखद मज पाजविती ॥ ८६ ॥
ऐसें क्षुधेनें पीडिता बहुत । मज घालिती पाळण्यांत ।
हालविती पर्यंदे गात । क्षुधाक्रांत रुदन करीं ॥ ८७ ॥
म्हणती रुदन करितो बाळ । मुखीं शिंपिती कांजीतेल ।
रक्षा बांधती मंत्रे केवळ । नेणे माता भूक माझी ॥ ८८ ॥
पाळण्यांत घालिती कौतुकें । प्रावरणांत असतां वृश्र्चिके ।
मारीतसे पाठीं डंक । प्रलाप मी करीतसे ॥ ८९ ॥
आणिक पाळणा हालविती । राहें राहें उगा म्हणती ।
स्तनपान मागुती करविती । वृश्र्चिकविष नेणतां ॥ ९० ॥
तेणें दुःखें स्तनपान न करीं । मागुती घालिती पाळण्याभीतरीं ।
वृश्र्चिक मज डंक मारी । प्राणांतिक मज होय ॥ ९१ ॥
माता खाय अंबट तिखट । स्तनपानें मज अपार वोखट ।
अति मधुर क्षीर अंबट । तेणें खोकतसे सर्वकाळी ॥ ९२ ॥
नाना औषधें मज देती । तेणें माझे डोळे दुखती ।
कुंकुम लवणक्षार भरिती । डोळे आले म्हणोनियां ॥ ९३ ॥
ऐेसे कष्ट धुरंधर । बाळपणीं जाहले अपार ।
वाढलों कष्ट भोगीत फार । वर्षे बारा लोटलीं ॥ ९४ ॥
तधीं तुझे चरणस्मरणा । मज कैंचें गा देवराणा ।
कष्टलों मी याचिगुणा । पूर्वजन्म नाठवेचि ॥ ९५ ॥
दोन भाग उरले आपणासी । मदनें व्यापिलें शरीरासी ।
जैसा पतंग दीपासी । भ्रमिजेत उन्मत्त ॥ ९६ ॥
नेणें मी गुरु माता पिता । समस्तांते करी निंदा वार्ता ।
परस्त्रीवरी करीं चिंता । कुळाकुळ न विचारीं ॥ ९७ ॥
ब्राह्मणातें निंदा करी । वृद्धाच्या चेष्टा करी अपारी ।
मदें व्यापलें असे भारी । नाठवती तुझे चरण ॥ ९८ ॥
मांसाचे कवळाकारणें । मत्स्य जाय जेवीं प्राणें ।
तैसा आपण मदनबाणें । वश्य जाहलों इंद्रियांसी ॥ ९९ ॥
नानावर्ण स्त्रियां भोगिलें । परद्रव्य अपहारिलें ।
सिद्धमहंतांतें निंदिलें । दृष्टीं न दिसे माझे कांहीं ॥ १०० ॥
ऐसा मदनें व्यापूनि । मागें पुढें न पाहें नयनीं ।
पतंग जाय धांवोनि । दीपावरी पडे जैसा ॥ १०१ ॥
ऐसा वेष्टोनि मदनबाणीं । न ऐके सुबुद्धि कधीं श्रवणीं ।
सोय न धरीं तुझे चरणीं । यौवनपण गेलें ऐसें ॥ १०२ ॥
मग वृद्धाप्य आले शरीरासी । उबग होय स्त्रिपुत्रांसी ।
श्र्वासोच्छवास कफेसीं । सदा खोकला होय मज ॥ १०३ ॥
अवयव सर्वही गलित होती । केश पांढरे होती त्वरिती ।
दंतहीन, श्रवणें न ऐकिजेति । दृष्टीं न दिसे, नासिक गळतेम ॥ १०४ ॥
ऐसा नाना रोगें कष्टतां । तुमची सेवा कधी घडणें आतां ।
स्वामी तारका श्रीगुरुनाथा । संसारसागरा कडे करी ॥ १०५ ॥
ऐसा मंदमति आपण । न ओळखेचि तुझे चरण ।
तूंचि केवळ नारायण । अवतार तूं श्रीगुरुमूर्ति ॥ १०६ ॥
तूंचि विश्र्वाचा तारक । धरोनियां नरवेष ।
त्रयमूर्ति तूंचि ऐक । परब्रह्म श्रीगुरुनाथा ॥ १०७ ॥
दिवांध नेणति तुज लोक । तूंचि विश्र्वाचा पाळक ।
मी किंकर तुझा सेवक । संसार-धुरंधरीं तारीं मज ॥ १०८ ॥
ऐसें नानापरी स्तोत्र । करीतसे नंदीनामा पवित्र ।
जन पाहताति विचित्र । त्यांसी म्हणे नंदीनामा ॥ १०९ ॥
ऐका हो जन समस्त । श्रीगुरु जाणा परब्रह्मवस्तु ।
आपण पाप केलें बहुत । दर्शनमात्रें सर्व गेलें ॥ ११० ॥
जैसे तृणाचे बणवीसी । अग्नि लागतां क्षणें कैसी ।
गुरुकृपा होय ज्यासी । पाप जळे तयापरी ॥ १११ ॥
‘ चरणं पवित्रं विततं पुराणं ‘ । ऐसें बोले वेद आपण ।
सेवा सेवा हो गुरुचरण । गुरुवेगळा देव नाहीं ॥ ११२ ॥
ब्रह्मदेवें आपण देखा । दुष्टाक्षरें लिहिलीं कपाळिका ।
तैसेही होय निका । श्रीगुरुचरणीं लागतां ॥ ११३ ॥
जवळी असतां निधान । कां नोळखा हो तुम्ही जन ।
नृसिंहसरस्वती कामधेनु । भजा भजा हो सकळिक ॥ ११४ ॥
इहसौख्य ज्ञान ऐका । अंती पावे वैकुंठलोका ।
संदेह नाहीं होईल सुखा । सत्य जाणा हो बोल माझा ॥ ११५ ॥
नंदिनामा स्तोत्र करितां । श्रीगुरु संतोषी अत्यंता ।
भक्तांसी ऐसा निरोप देत । ‘ कवीश्र्वर ‘ म्हणा यासी ॥ ११६ ॥
कवि ‘ बसवरस ‘ नाम तयासी । निर्धार केला आम्हीं भरंवसीं ।
ऐसें कृपेनें बोलती त्यासी । ऐकोनि चरणीं लागला ॥ ११७ ॥
जें कां शेष होतें जंघेवरी । तें तात्काळ गेलें दूरी ।
नंदिनामा आनंद करी । राहिला सेवा करीत देखा ॥ ११८ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं ।
कथा करीत कवि बसवरसी । श्रीगुरुसेवेसी राहिला ॥ ११९ ॥
नामधारक म्हणे सिद्धमुनि । दुसरा कवि ‘ नरहरि ‘ म्हणोनि ।
तो केवीं झाला शिष्य सुगुणी । कवेश्र्वर भक्त जाहला ॥ १२० ॥
तें विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेंसी ।
वांछा असे मानसीं । गुरुचरित्र ऐकावें ॥ १२१ ॥
म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकतां होय मनोहर । नामस्मरण कामधेनु ॥ १२२ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
द्विजकुष्ठपरिहारो नाम चतु्श्र्चत्वारिंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 43
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 45
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.