श्रीगुरुचरित्र अध्याय 41 भाग – 4
जो कोणी काशीवासी । असेल नर परियेसीं ।
करावी यात्रा आहे ऐसी । नाहींतरी विघ्नें घडतीं ॥ ३३१ ॥
शुक्लपक्षीं येणेंपरी । यात्रा करावी मनोहरी ।
कृष्णपक्ष आलियावरी । यात्रा करावी सांगेन ॥ ३३२ ॥
चतुर्दशी धरुनि । यात्रा करा प्रतिदिनीं ।
एकेक पृथक् करुनि । सांगेन ऐका एकचित्तें ॥ ३३३ ॥
वरुणानदी करा स्नान । करा शैल्येश्र्वर दर्शन ।
संगमेश्र्वर पूजोन । संगमी स्नान तये दिनीं ॥ ३३४ ॥
स्वलीनतीर्थस्नानासी । स्वलीनेश्र्वर पूजा हर्षी ।
मंदाकिनी येरे दिवशीं । पूजा करीं मध्यमेश्र्वरा ॥ ३३५ ॥
मणिकर्णिका स्नानेंसीं । पूजा ईशानेश्र्वरासी ।
हिरण्यगर्भ परियेसीं । लिंग दोनी पूजिजे ॥ ३३६ ॥
स्नान धर्मकूपेसी । करीं पूजा गोप्रेक्षेश्र्वरासी ।
पूजा करी तया दिवसीं । ऐक बाळा ब्रह्मचारी ॥ ३३७ ॥
कपिलधारा तीर्थासी । स्नान करावें भक्तींसीं ।
वृषभध्वज लिंगासी । पूजा सप्तमी दिनीं ॥ ३३८ ॥
उपशांतकूपेसी । स्नान करावें भक्तींसीं ।
उपशांतेश्र्वरासी । पूजा करीं गा तया दिनीं ॥ ३३९ ॥
पंचचूडाडोहांत । स्नान करावें शिव ध्यात ।
ज्येष्ठेश्र्वरलिंग त्वरित । पूजावें तया दिवशीं ॥ ३४० ॥
कूप-चतुःसमुद्रेंसी । स्नान करीं गा भावेंसीं ।
समुद्रेश्र्वर हर्षी । पूजा करीं तया दिनीं ॥ ३४१ ॥
देवापुढें कूप असे । स्नान करावें संतोषें ।
शुक्रेश्र्वरा पूजा हर्षे । तया दिनीं परियेसा ॥ ३४२ ॥
दंडखात तीर्थेसी । स्नान करा तुम्ही हर्षी ।
व्याघ्रेश्र्वरपूजेसी । तुवां जावे तया दिनीं ॥ ३४३ ॥
शौनकेश्र्वरतीर्थेसी । स्नान करुनि देवासी ।
तीर्थनामें लिंगासी । पूजा करा मनोहर ॥ ३४४ ॥
जंबुकतीर्थ मनोहर । स्नान करावें शुभाचार ।
पूजा करीं गा जंबुकेश्र्वर । चतुर्दश लिंग असे ॥ ३४५ ॥
शुक्लकृष्णपक्षेंसी । अष्टमी तिथी विशेषीं ।
पूजावें तुम्हीं लिंगासी । सांगेन ऐका महापुण्य ॥ ३४६ ॥
दक्षेश्र्वर पार्वतीश्र्वर । तिसरा पशुपतीश्र्वर ।
गंगेश्र्वर नर्मदेश्र्वर । पूजा करीं गा मनोभावें ॥ ३४७ ॥
गभस्तेश्र्वर सतीश्र्वर । मध्यमेश्र्वर असे थोर ।
तारकेश्र्वर निर्धार । नव लिंगे पूजावीं ॥ ३४८ ॥
आणिक लिंगे एकादश । नित्ययात्रा विशेष ।
आग्नीघ्रेश परियेस । यात्रा तुम्हीं करावी ॥ ३४९ ॥
दुसरा असे उर्वशीश्र्वर । नकुलेश्र्वर मनोहर ।
चौथा आषाढेश्र्वर । भारभूतेश्र्वर जाणावा ॥ ३५० ॥
लांगलीश्र्वरीं पूजा । करा त्रिपुरांतका वोजा ।
मनःप्रकामेश्र्बरकाजा । तुम्हीं जावें पूजेसी ॥ ३५१ ॥
प्रीतिकेश्र्वर देखा । मदालसेश्र्वर ऐका ।
तिलपर्णेश्र्वर निका । पूजा करीं भावेंसीं ॥ ३५२ ॥
आतां शक्तियात्रा करावयासी । सांगेन ऐका विधीसी ।
शुक्लपक्ष-तृतीयेसी । आठ यात्रा कराव्या ॥ ३५३ ॥
गोप्रेक्षतीर्थ देखा । स्नान करुनि ऐका ।
पूजा मुखनिर्माळिका । भक्तिभावें करोनि ॥ ३५४ ॥
ज्येष्ठवापीं स्नानेसीं । ज्येष्ठगौरी पूजा हर्षीं ।
स्नान करा ज्ञानवापीसी । शृंगार-सौभाग्यगौरी पूजावी ॥ ३५५ ॥
स्नान करा विशाळगंगेसी । पूजा विशाळगौरीसी ।
ललितातीर्थस्नानेंसी । ललिता देवी पूजावीं ॥ ३५६ ॥
स्नान भवानीतीर्थेंसीं । पूजा करा भवानींसी ।
बिंदुतीर्थ स्नानासी । मंगळागौरी पूजावी ॥ ३५७ ॥
पूजा इतुके शक्तींसी । मग पूजिजे लक्ष्मीसी ।
येणें विधीं भक्तींसी । यात्रा करावी मनोहर ॥ ३५८ ॥
यात्रा तिथी-चतुर्थीसी । पूजा सर्वगणेशासी ।
मोदक द्यावे विप्रांसी । विघ्न न करी तीर्थवासियांते ॥ ३५९ ॥
मंगळ-रविवारेसी । यात्रा करीं भैरवांसी ।
षष्ठी तिथी प्रीतींसीं । जावें तुम्हीं मनोहर ॥ ३६० ॥
रविवार सप्तमीसी । यात्रा करावी रविदेवासी ।
नवमी अष्टमी चंडीसी । यात्रा तुम्हीं करावी ॥ ३६१ ॥
अंतर्गृहयात्रेसी । करावी तुम्हीं प्रतिदिवसीं ।
विस्तार काशीखंडासी । असे ऐक ब्रह्मचारी ॥ ३६२ ॥
ऐसी विश्र्वेश्र्वर यात्रा । करावी तुवां पवित्रा ।
आपुले नाभीं सोमसूत्रा । लिंगप्रतिष्ठा करावी ॥ ३६३ ॥
इतुकें ब्रह्मचारियासी । यात्रा सांगे तो तापसी ।
आचरे येणें विधींसीं । तुझी वासना पुरेल ॥ ३६४ ॥
तुजवरी कृपा असे गुरु । प्रसन्न होईल शंकरु ।
मनीं धरीं गा निर्धारु । गुरुस्मरण करीत असे ॥ ३६५ ॥
इतकें सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं ।
ब्रह्मचारी म्हणे हर्षी । हाचि माझा गुरु सत्य ॥ ३६६ ॥
अथवा होईल ईश्र्वरु । मजवरी कृपा केली श्रीगुरु ।
कार्य साधलें निर्धारु । म्हणोनि मनीं विचारी तो ॥ ३६७ ॥
नाराधितां आपण देखा । भेटला मज पिनाका ।
गुरुकृपा होय जों कां । सकळाभीष्ट पावीजे ॥ ३६८ ॥
समस्त देवीं ऐसी गति । दिलियावांचून न देती ।
ईश्र्वर भोळाचक्रवर्ती । गुरुप्रसादें भेटला ॥ ३६९ ॥
दान यज्ञ तपस । कांहीं न करतां सायास ।
भेटी जाहली विश्र्वेशास । गुरुकृपेंकरोनि ॥ ३७० ॥
ऐसें श्रीगुरुस्मरण करीत । ब्रह्मचारी जाय त्वरित ।
विधिपूर्वक आचरीत । यात्रा केली भक्तीनें ॥ ३७१ ॥
पूजा करितां भक्तींसीं । प्रसन्न झाला व्योमकेशी ।
निजस्वरुपें सन्मुखेसीं । उभा राहिला शंकर ॥ ३७२ ॥
प्रसन्न होऊनि शंकर । म्हणे दिधला माग वर ।
संतोषोनि त्वष्ट्टकुमार । विनविता जाहला वृत्तांत ॥ ३७३ ॥
जें जें मागितलें श्रीगुरु । आणिक त्याचे कन्याकुमरु ।
सांगता जाहला विस्तारु । तया शंकराजवळी देखा ॥ ३७४ ॥
संतोषोनि ईश्र्वर । देता जाहला अखिल वर ।
म्हणे बाळा माझा कुमर । सकळ विद्याकुशळ होसी ॥ ३७५ ॥
तुवां केली गुरुभक्ति । तेणें जाहलों आपण तृप्ति ।
अखिल विद्या तुझे हातीं । ‘ विश्र्वकर्मा ‘ तूंचि होसी ॥ ३७६ ॥
चतुर्विध पुरुषार्थ । लाधेल तुज परमार्थ ।
सृष्टी रचावया तूं समर्थ । होसी जाण त्वष्ट्टपुत्रा ॥ ३७७ ॥
ऐसा वर लाधोन । त्वष्टापुत्र आनंदोन ।
केलें लिंग स्थापन । आपुलें नामीं तेथे देखा ॥ ३७८ ॥
मग निघाला तेथोनि । केली आइती तत्क्षणीं ।
प्रसन्न होतां शूलपाणि । काय नोहे परियेसा ॥ ३७९ ॥
जें जें मागितलें गुरु । सकळ वस्तु केल्या चतुरु ।
घेऊनि गेला वेगवक्त्रु । तया गुरुसन्मुखेंसी ॥ ३८० ॥
सकळ वस्तु देऊनि । लागतसे श्रीगुरुचरणीं ।
अनुक्रमें गुरुरमणी । पुत्र कन्येसी वंदिले ॥ ३८१ ॥
उल्हास जाहला श्रीगुरुसी । आलिंगतसे महाहर्षी ।
म्हणे शिष्य ताता ज्ञानराशि । तुष्टलों तुझे भक्तीतें ॥ ३८२ ॥
सकळ विद्याकुशळ होसी । अष्टैश्र्वर्ये नांदसी ।
त्रैमूर्ति होतील तुज वशी । ऐक शिष्यशिखामणि ॥ ३८३ ॥
घर केलें तुवां आम्हांसी । आणिक वस्तु विचित्रेंसी ।
चिरंजीव तूंचि होसी । आचंद्रार्क तुझें नाम ॥ ३८४ ॥
स्वर्गमृत्युपाताळासी । तुझे पसरवीं चातुर्यासी ।
रचना तुझी सृष्टीसी । चौदा चौसष्टी तूंचि ज्ञाता ॥ ३८५ ॥
तुज वश्य अष्ट सिद्धि । होतील जाण नव निधि ।
चिंता कष्ट तुज न होती कधीं । म्हणोनि वर देता जाहला ॥ ३८६ ॥
ऐसा वर लाधोनि । गेला शिष्य महाज्ञानी ।
येणेंपरी विस्तारुनि । सांगे ईश्र्वर पार्वतीसी ॥ ३८७ ॥
ईश्र्वर म्हणे गिरिजेसी । गुरुभक्ति आहे ऐसी ।
एकभाव असे ज्यासी । सकळाभीष्ट तो पावे ॥ ३८८ ॥
भव म्हणिजे सागरु । उतरावया पैल पारु ।
समर्थ असे एक गुरु । त्रैमूर्ति त्याच्या आधीन ॥ ३८९ ॥
याकारणें त्रैमूर्ति । गुरुचि होय सिद्धांती ।
वेदशास्त्रें बोलती । गुरुविणें पार नाहीं ॥ ३९० ॥
(श्र्लोक) यस्य देवे परा भक्तिर्ययथा देवे तथा गुरौ ।
तस्यै ते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ॥ ३९१ ॥
(ओंव्या) ऐसें ईश्र्वर पार्वतीसी । सांगता जाहला विस्तारेंसी ।
म्हणोनि श्रीगुरु प्रीतीसीं । निरोपिलें सायंदेव-द्विजातें ॥ ३९२ ॥
इतुकें होतां रजनीसी । उदय जाहला दिनकरासी ।
चिंता म्हणिजे अंधकारासी । गुरुकृपा ज्योति जाणा ॥ ३९३ ॥
संतोषोनि द्विजवरु । करिता जाहला नमस्कारु ।
ऐसी बुद्धि देणार गुरु । तूंचि स्वामी कृपानिधि ॥ ३९४ ॥
नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे भावेंसी ।
स्वामी कथा निरोपिलीसी । अपूर्व मातें वाटलें ॥ ३९५ ॥
काशीयात्राविधान । निरोपिलें मज विस्तारुन ।
ते वेळीं तेथेंचि होतों आपण । तुम्हांसहित स्वामिया ॥ ३९६ ॥
पाहे आपुले दृष्टांतीं । स्वामी काशीपुरीं असती ।
जागृतीं अथवा सुषुप्तीं । नकळे मातें स्वामिया ॥ ३९७ ॥
म्हणोनि विप्र तये वेळीं । वंदी श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे करुणाबहाळी । भावभक्तीकरोनियां ॥ ३९८ ॥
जय जया परमपुरुषा । परात्परा परमहंसा ।
भक्तजनहृदयनिवासा । श्रीनृसिंहसरस्वती ॥ ३९९ ॥
ऐसें तया अवसरीं । पूर्वज तुझा स्तोत्र करी ।
सांगेन तुज अवधारीं । एकचित्तें परियेसीं ॥ ४०० ॥
स्तोत्र अष्टक (गुरुचरित्र)
आदौ ब्रह्म त्वमेव सर्व जगतां, वेदात्ममूर्तिं विभुं ।
पश्र्चात् क्षोणिजडा विनाश-दितिजां, कृताऽवतारं प्रभो ।
हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं, भूत्वाऽत्मजोऽत्रेर्गृहे ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ १ ॥
भूदेवाखिलमानुष विदुजना, बाधायमानं कलिं ।
वेदादुष्यमनेकवर्णमनुजा भेदादि भूतोन्नतम् ।
छेदःकर्मतमान्धकारहरणं श्रीपाद-सूर्योदये ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ २ ॥
धातस्त्वं हरि शंकर प्रति गुरो, जाताग्रजन्मं विभो ।
हेतुः सर्वविदोजनाय तरणं ज्योतिःस्वरुपं जगत् ।
चातुर्थाश्रमस्थापितं क्षितितले, पातुः सदा सेव्ययं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ ३ ॥
चरितं चित्रमनेकीर्तिमतुले, परिभूतभूमंडले ।
मूकं वाक्य दिवाधंकस्य नयनं, वंध्या च पुत्रं ददौ ।
सौभाग्यं विधवा च दायक श्रियं, दत्वा च भक्तं जनं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ ४ ॥
दुरितं घोरदरिद्रदावतिमिरं, —-हरणं जगज्ज्योतिषं ।
स्वर्धेनुं सुरपादपूजितजना, करुणाब्धिं भक्तार्तितः ।
नरसिंहेद्र-सरस्वतीश्र्वर विभो, शरणागतं रक्षकं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ ५ ॥
गुरुमूर्तिश्र्चरणारविंदयुगलं, —स्मरणं कृतं नित्यसौ ।
चरितं क्षेत्रमनेकतीर्थसफलं, सरितादि भागीरथी ।
तुरगामेध-सहस्त्रगोविदुजनाः, सम्यक ददन् तत्फलं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ ६ ॥
नो शक्यं तव नाममंगल स्तुवं, वेदागमागोचरं ।
पादद्वं हृदयाब्जमंतरदलं, निर्धार मीमांसतं ।
भूयोभूयः स्मरन् नमामि मनसा, श्रीमदगुरुं पाहि मां ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ ७ ॥
भक्तानां तरणार्थ सर्वजगतां, दीक्षा ददन् योगिनां ।
सुक्षेत्रं पुरगाणगस्थित प्रभो, दत्वा चतुष्कामदं ।
स्तुत्वा भक्तसरस्वती गुरुपदं, जित्वाद्यदोषादिकं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ ८ ॥
एवं श्रीगुरुनाथमष्टकमिदं स्तोत्रं पठेन्नित्यसौ ।
तेजोवर्चबलोन्नतं श्रियकरं आनंदवर्धं वपुः ।
पुत्रापत्यमनेकसंपदशुभा, दीर्घायुमारोग्यतां ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम् ॥ ९ ॥
येणेंपरी स्तोत्र करीत । मागुती करी दंडवत ।
सद्गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठियेले ॥ ४१० ॥
म्हणे त्रैमूर्तीचा अवतारु । तूंचि देवा जगद्गुरु ।
आम्हां दिसतोसी नरु । कृपानिधि स्वामिया ॥ ४११ ॥
मज दाविला परमार्थ । लभ्य चारी पुरुषार्थ ।
तूंचि सत्य विश्र्वनाथ । काशीपूर तुजपाशीं ॥ ४१२ ॥
ऐसेंपरी श्रीगुरुसी । विनवी विप्र परियेंसीं ।
संतोषोनि महाहर्षी । निरोप देती तये वेळीं ॥ ४१३ ॥
श्रीगुरु म्हणती सायंदेवासी । दाखविली तुज काशी ।
पुढें वंश एकविसी । यात्राफळ तुम्हां असे ॥ ४१४ ॥
तूंचि आमुचा निजभक्त । दाविला तुज दृष्टांत ।
आम्हांपाशीं सेवा करीत । राहें भक्ता म्हणितलें ॥ ४१५ ॥
जरी राहसी आम्हांपाशीं । नको वंदूं म्लेंच्छासी ।
आणोनियां स्त्रीपुत्रांसी । भेटी करवीं म्हणितले ॥ ४१६ ॥
निरोप देऊनि द्विजासी । गेले श्रीगुरु मठासी ।
सदानंद जैसी तैसी । होतो श्रीगुरुभक्तजनां ॥ ४१७ ॥
आज्ञा घेवोनि सहज । गेला तुमचा पूर्वज ।
कलत्रपुत्रांसहित द्विज । आला श्रीगुरुदर्शना ॥ ४१८ ॥
भाद्रपद चतुर्दशी । शुक्लपक्ष परियेसीं ।
आले शिष्य भेटीसी । एकोभावेंकरोनि ॥ ४१९ ॥
येती शिष्य लोटांगणी । एकोभावें तनुमनीं ।
येऊनि लागती चरणीं । सद्गदित कंठ जाहले ॥ ४२० ॥
कर जोडूनि तये वेळीं । स्तोत्र करिती तेही सकळीं ।
” ॐ नमो जी चंद्रमौळी । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥ ४२१ ॥
त्रैमूर्तीचा अवतारु । जाहलासी स्वामी जगद्गुरु ।
नकळे पार हरिहरु- । ब्रह्मादिका गुरुनाथा ॥ ४२२ ॥
तुझा महिमा वर्णावयासी । शक्ती कैंची आम्हांसी ।
आदिपुरुष भेटलासी । कृपानिधि स्वामिया ॥ ४२३ ॥
जैसा चंद्र चकोरासी । उदय होय सुधारसीं ।
तैसे आम्ही संतोषी । तुझे चरण देखतां ॥ ४२४ ॥
पूर्वजन्मीं पापराशि । केल्या होत्या बहुवसीं ।
स्वामी तुझे दर्शनेंसी । पुनीत झालों म्हणतसे ॥ ४२५ ॥
जैसा चिंतामणि स्पर्श होतां । लोह कांचन होय तत्त्वता ।
मृत्तिका जंबुनदींत पडतां । तत्काळीं होय सुवर्ण ॥ ४२६ ॥
जैसा मानस-सरोवरासी । कावळा जाय स्वभावेंसी ।
तत्काळ होय राजहंसी । तैसें तुझे दर्शनेंसीं पुनीत जाहलों ॥ ४२७ ॥
(श्र्लोक) गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा ।
पापं तापं दैन्यं च हरेच्छ्रीगुरुदर्शनम् ॥ ४२८ ॥
(टिका) गंगास्नान पाप नाशी । ताप हरतो शशी ।
कल्पवृक्षछायेसीं । कल्पिलें फळ पाविजे ॥ ४२९ ॥
एकेकाचे एकेक गुण । ऐसे असती लक्षण ।
दर्शन होतां श्रीगुरुचरण । तिन्ही फळ पाविजे ॥ ४३० ॥
पाप हरतें तात्काळीं । ताप चिंता जाय सकळीं ।
दैन्यकानना जाळी । श्रीगुरुचरणदर्शन ॥ ४३१ ॥
चतुर्विध पुरुषार्थ । देता होय श्रीगुरुनाथ ।
ऐसा वेदसिद्धांत । देखिले तूंते आजि आम्हीं ॥ ४३२ ॥
म्हणोनियां आनंदेंसीं । गायन करी संतोषी ।
अनेक रागें परियेसीं । कर्नाटक भाषेंकरुनियां ॥ ४३३ ॥
कंडेनिंदु भक्तजनर भाग्यनिधिया, भू— ।
मंडलोळगे नारसिंह सरस्वतीया ॥ ध्रू. ॥
कंडेनिंदु दृष्टीयिंद वारिजळपादवन्नु ।
हृदयकमलदल्लि भजिसे सुखवनीव जगत्पतीया ।
कंडेनिंदु भक्तजनर भाग्यनिधिया, भू— ।
मंडलोळगे नारसिंह सरस्वतीया ॥
भोगिजनरि–गेल्ल काम्य–फलगळित्तु सलहुतिरुव ।
योगिनीय-रोडेय नार-सिंहसरस्वतिय पाद ॥
कंडेनिंदु भक्तजनर भाग्यनिधिया, भू— ।
मंडलोळगे नारसिंह सरस्वतीया ॥ १ ॥
वाक्यकारण नागि जगदि-हिडिदु दंडकमंडलवनु ।
सगुणनेनिसि वलिद श्रीगुरु यतिवरन्न ।
कंडेनिंदु भक्तजनर भाग्यनिधिया, भू— ।
मंडलोळगे नारसिंह सरस्वतीया ॥ २ ॥
धरेगे गाणगपुर कैला- स हरिदासरोडेय नेनिसि ।
करुणदीवरवित्तु पोरेव अनुदिन गुरुचरणवन्नु ।
कंडेनिंदु भक्तजनर भाग्यनिधिया, भू— ।
मंडलोळगे नारसिंह सरस्वतीया ॥ ३ ॥ ४३४ ॥
(पद दुसरें) कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ।
मंडलदोळगे यतिवरराय चंद्रमन्ना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा । ध्रु. ॥
तत्वबोधेय उपनिषत् तत्वचरितना ।
व्यक्तवाद परब्रह्म मूर्तियनिसुवना ॥
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ।
मंडलदोळगे यतिवरराय चंद्रमन्ना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ॥ १ ॥
शेषशयन परवेषकायकना ।
लेसुकृपेय निमेषनेंच भाषापालकना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ।
मंडलदोळगे यतिवरराय चंद्रमन्ना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ॥ २ ॥
गंधपरिमळदिंद शोभितानंदसागरना ।
छंदबुळ्ळ योगींद्रगोपी-वृदंवल्लभना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ।
मंडलदोळगे यतिवरराय चंद्रमन्ना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ॥ ३ ॥
मंत्रकूटादि मेरेदुस्वा-तंत्रनादवना ।
इंतु निगमागमद सकलकातियुळ्ळवना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ।
मंडलदोळगे यतिवरराय चंद्रमन्ना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ॥ ४ ॥
करियराय नेनिपेगे वरद गुरुरायना ।
नरसिंहसरस्वत्यंब नारी-पुरुषनामकना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ।
मंडलदोळगे यतिवरराय चंद्रमन्ना ।
कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ॥ ५ ॥ ४३५ ॥
येणेंपरी श्रीगुरुसी । स्तुति केली बहुवसीं ।
संतोषोनि महाहर्षी । आश्र्वासिती तये वेळीं ॥ ४३६ ॥
प्रेमभावें समस्तांसी । बैसा म्हणती समीपेसी ।
जैसा लोभ मातेसी । बाळकावरी परियेसा ॥ ४३७ ॥
सिद्ध म्हणे नामकरणी । काय सांगूं तया दिनीं ।
कैशी कृपा अंतःकरणीं । तया श्रीगुरु यतीच्या ॥ ४३८ ॥
आपुले कलत्र-पुत्रेसीं । जैसा लोभ परियेसीं ।
तैसें तुमचे पूर्वजांसी । प्रेमभावें पुसताति ॥ ४३९ ॥
गृहवार्ता कुसरी । क्षेम पुत्रकलत्रीं ।
द्विज सांगे मनोहरी । सविस्तारीं परियेसा ॥ ४४० ॥
कलत्रेंसीं नमोन । सांगे क्षेम समाधान ।
होते पुत्र दोघेजण । चरणावरी घातले ॥ ४४१ ॥
ज्येष्ठसुत नागनाथ । तयावरी कृपा बहुत ।
कृपानिधि श्रीगुरुनाथ । माथां हात ठेविती ॥ ४४२ ॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । तुझ्या ज्येष्ठसुतासी ।
आयुष्य होईल पूर्णायुषी । संतति याची बहुवस ॥ ४४३ ॥
हाचि भक्त आम्हांसी । असेल श्रियायुक्तेंसी ।
तुवां आतां म्लेंच्छासी । सेवा वंदन न करावें ॥ ४४४ ॥
आणिक तूंतें असे नारी । पुत्र होतील तीतें चारी ।
नांदतील श्रियाकरीं । तुवां सुखें असावें ॥ ४४५ ॥
जया दिवसीं म्लेंच्छासी । तुवां जाऊनि वंदिसी ।
हानि असे जीवासी । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥ ४४६ ॥
तुझा असे वडील सुत । तोचि आमुचा निज भक्त ।
त्याची कीर्ति वाढेल बहुत । म्हणती श्रीगुरु तये वेळीं ॥ ४४७ ॥
मग म्हणती द्विजासी । जावें त्वरित संगमासी ।
स्नान करोनि त्वरितेंसी । यावें म्हणती तये वेळीं ॥ ४४८ ॥
ग्रामलोक तया दिवसीं । पूजा करिती अनंतासी ।
येऊनियां श्रीगुरुसी । पूजा करिती परियेसा ॥ ४४९ ॥
पुत्रमित्रकलत्रेंसी । गेला स्नाना संगमासी ।
विधिपूर्वक अश्र्वत्थासी । पूजूनि आलें मठांत ॥ ४५० ॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । आजि व्रतचतुर्दशी ।
पूजा करीं अनंतासी । समस्त द्विज मिळोनि ॥ ४५१ ॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करिता होय नमस्कारु ।
आमुचा अनंत तूंचि गुरु । व्रतसेवा तुमचे चरण ॥ ४५२ ॥
तये वेळीं श्रीगुरु । सांगता होय विचारु ।
पूर्वी कौंडिण्य ऋषेश्र्वरु । केलें व्रत प्रख्यात ॥ ४५३ ॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करिता जाहला नमस्कारु ।
कैसें व्रत आचरुं । पूर्वीं कवणें केलें असे ॥ ४५४ ॥
ऐसें व्रत प्रख्यात । स्वामी निरोपितां बहुत ।
तयाचा आदि अंत । मज कथा निरोपिजे ॥ ४५५ ॥
त्याणें पुण्य काय घडे । काय लाभे रोकडें ।
ऐसें मनींचें सांकडें । फेडावें माझें स्वामिया ॥ ४५६ ॥
ऐसें विनवितां द्विजवरु । संतोषी जाहले श्रीगुरु ।
सांगताति विस्तारु । सिद्ध म्हणे नामधारका ॥ ४५७ ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां तुटे भवसागर । निःसंदेह परियेसा ॥ ४५८ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
काशीयात्रा-त्वष्टपुत्रआख्यान-सायंदेववरलाभो
नाम एकचत्वारिंशोऽध्यायः ॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 40
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 42
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.