You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 41 – श्री गुरुचरित्र अध्याय 41

Shri Guru Charitra Adhyay 41 – श्री गुरुचरित्र अध्याय 41

श्रीगुरुचरित्र अध्याय 41 भाग -3

लवांकुशकुंडीं स्नान । लवकुशांचे पूजन ।
लक्ष्मीकुंडीं करीं स्नान । लक्ष्मीनारायण पूजिजे ॥ २११ ॥

सूर्यकुंडीं करीं स्नान । श्राद्धकर्म आचरोन ।
सांबादित्य पूजोन । जावें पुढें बाळका ॥ २१२ ॥

वैद्यनाथकुंड बरवें । तेथें स्नान करावें ।
वैद्यनाथासी पूजावें । एकोभावेंकरोनियां ॥ २१३ ॥

गोदावरीकुंडेसी । स्नान करा भक्तींसी ।
गौतमेश्र्वरलिंगासी । पूजावें तुवां ब्रह्मचारी ॥ २१४ ॥

अगस्त्यकुंडीं जाऊनि । स्नान करी मनापासोनि ।
अगस्त्येश्र्वरातें पूजोनि । वंदन करीं भक्तीभावें ॥ २१५ ॥

शुक्रकूपीं स्नान करोनि । शुक्रेश्र्वरातें अर्चूनि ।
मग पुढें अन्नपूर्णी । पूजा करीं गा भावेंसी ॥ २१६ ॥

धुंडिराज पूजोन । ज्ञानवापीं करी स्नान ।
ज्ञानेश्र्वर अर्चोन । दंडपाणीसी पूजीं मग ॥ २१७ ॥

आनंदभैरवासी वंदूनि । महाद्वारा जाऊनि ।
साष्टांगेसीं नमूनि । विश्र्वनाथा अर्चिजे ॥ २१८ ॥

ऐसी दक्षिणमानस । यात्रा असे विशेष ।
ब्रह्मचारी करीं गा हर्षें । योगिराज सांगतसे ॥ २१९ ॥

आतां उत्तरमानसासी । सांगेन विधि आहे कैशी ।
संकल्प करुनि मानसीं । निघावें तुवां तुवां बाळका ॥ २२० ॥

जावें पंचगंगेसी । स्नान करावें महाहर्षी ।
कोटीजन्म पाप नाशी । प्रख्यात असे पुराणांतरी ॥ २२१ ॥

‘ पंचगंगा ‘ ख्याति नामें । आहेत सांगेन उत्तमें ।
किरणा-धूतपापा नाम । तिसरें पुण्यसरस्वती ॥ २२२ ॥

गंगा यमुना मिळोन । पांच नामें विख्यात जाण ।
नामें असतीं सगुण । ऐक बाळा एकचित्तें ॥ २२३ ॥

कृतयुगीं त्या नदीसी । ‘ धर्मनदी ‘ म्हणती हर्षी ।
‘ धूतपाप ‘ नाम तिसी । त्रेतायुगीं अवधारा ॥ २२४ ॥

‘ बिंदुतीर्थ ‘ द्वापारीं । नाम जाण सविस्तारी ।
या कलियुगाभीतरीं । नाम जाणा ‘ पंचगंगा ‘ ॥ २२५ ॥

प्रयागासी माघमासीं । स्नान करितां फळें कैसीं ।
त्याहूनि पुण्य अधिकेसी । पंचगंगेसी कोटिगुण ॥ २२६ ॥

ऐशा पंचनदीसी । स्नान करितां भावेंसीं ।
एकोभावें बिंदुमाधवासी । पूजा करीं गा केशवा ॥ २२७ ॥

गोपालकृष्णासी पूजोनि । मग जावें नृसिंहभुवनीं ।
मंगळागौरीसी वंदूनि । गभस्तेश्र्वर पूजीं मग ॥ २२८ ॥

मयूखादित्यपूजेसी । तुवां जावें भक्तींसीं ।
पुनरपि जावें हर्षी । विश्र्वेश्र्वरदर्शना ॥ २२९ ॥

मागुती मुक्तिमंडपासी । जावें तुवां भक्तींसीं ।
संकल्पावें विधींसीं । निघावें उत्तरमानसा ॥ २३० ॥

मग निघावें तेथून । आदित्यातें पूजोन ।
आमोदकेश्र्वर आर्चोन । पापभक्षेश्र्वरा पूजिजे ॥ २३१ ॥

नवग्रहातें पूजोनि । काळभैरवातें पूजा ध्यानीं ।
क्षेत्रपाळा अर्चोनि । काळकूपीं स्नान करीं ॥ २३२ ॥

पूजा करुनि काळेश्र्वरा । हंसतीर्थी स्नान करा ।
श्राद्धादि पितृकर्म आचरा । ऐक बाळा एकचित्तें ॥ २३३ ॥

कृतिवासेश्र्वर देखा । पूजा करुनि बाळका ।
पुढें जाऊनि ऐका । शंखवापीं स्नान करीं ॥ २३४ ॥

तेथें आचमनें करुनि तीनी । रत्नेश्र्वरातें पूजोनि ।
सतीश्र्वरा अर्चोनि । दक्षेश्र्वर पूजीं मग ॥ २३५ ॥

चतुर्वक्त्रेश्र्वर पूजा । करीं गा बाळा तूं वोजा ।
पुढें स्नान करणें काजा । वृद्धकाळकूपा जाईं ॥ २३६ ॥

काळेश्र्वरा पूजोन । तुवां जावें भक्तीनें ।
अपमृत्येश्र्वरा पूजोन । ध्यान करीं गा बाळका ॥ २३७ ॥

मंदाकिनी स्नान करणें । मध्वमेश्र्वरातें पूजणें ।
तेथोनि मग पुढें जाणें । जंबुकेश्र्वरा पूजावया ॥ २३८ ॥

वक्रतुंडपूजेसी । तुवां जावें भक्तींसीं ।
दंडखात कूपेसी । स्नान श्राद्ध तुम्ही करा ॥ २३९ ॥

पुढें भूतभैरवासी । पूजिजे जैगेश्र्वरासी ।
जैगीषव्यगुहेसी । नमन करुनि पुढें जावें ॥ २४० ॥

घंटाकुमडीं स्नान करी । व्याघ्रेश्र्वरातें नमस्कारी ।
कुंदुकेश्र्वरातें अवधारी । पूजा करीं गा भक्तीसी ॥ २४१ ॥

ज्येष्ठवापीं स्नान करणें । ज्येष्ठेश्र्वरातें पूजणें ।
सवेंचि तुवां पुढें जाणें । स्नान करणें सप्तसागरा ॥ २४२ ॥

तेथोनियां वाल्मीकेश्र्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
भीमलोटा जाऊनि हर्षी । भीमेश्र्वर पूजावा ॥ २४३ ॥

मातृ-पितृकुंडेसी । करावें श्राद्ध विधीसीं ।
पिशाचमोचन पूजेसी । पुढें जावें अवधारा ॥ २४४ ॥

पुढें कपर्दिंकेश्र्वरासी । पूजा करी गा भक्तींसी ।
कर्कोटकवापीसी । स्नान करी गा बाळका ॥ २४५ ॥

कर्कोटक ईश्र्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
पुढें ईश्र्वरगंगेसी । स्नान दान करावें ॥ २४६ ॥

अग्नीश्र्वराचे पूजेसी । तुवां जावें भक्तीसी ।
चक्रकुंडीं स्नानासी । श्राद्धादि कर्मे करावीं ॥ २४७ ॥

उत्तरार्क पूजोन । मत्स्योदरीं करीं स्नान ।
ॐकारेश्र्वर अर्चोन । कपिलेश्र्वर पूजिजे मग ॥ २४८ ॥

ऋणमोचन तीर्थासी । श्राद्ध करा भक्तींसी ।
पापमोचनतीर्थासी । स्नान श्राद्धादि करावें ॥ २४९ ॥

कपालमोचन तीर्थी स्नान । करावें श्राद्धादितर्पण ।
कुलस्तंभा जाऊन । पूजा करीं गा भक्तींसी ॥ २५० ॥

असे तीर्थ वैतरणी । स्नान श्राद्ध करा तया स्थानीं ।
विधिपूर्वक गोदानी । देतां पुण्य बहुत असे ॥ २५१ ॥

मग जावें कपिलाधारा । स्नान श्राद्ध तुम्ही करा ।
सवत्सेंसीं द्विजवरा । गोदान द्यावें परियेसा ॥ २५२ ॥

वृषभध्वजातें पूजोन । मग निघावें तेथून ।
ज्वालानृसिंह वंदोन । वरणासंगमीं तुम्हीं जावें ॥ २५३ ॥

स्नान श्राद्ध करोनि । केशवादित्य पूजोनि ।
आदिकेशव वंदोनि । पुढें जावें परियेसा ॥ २५४ ॥

प्रल्हादतीर्थ असे बरवें । स्नान श्राद्ध करावें ।
प्रल्हादेश्र्वरातें पूजावें । एकोभावें परियेसीं ॥ २५५ ॥

पिलिपिला तीर्थ थोर । स्नान तेथें करणें मनोहर ।
पूजोनियां त्रिलोचनेश्र्वर । असंख्यातेश्र्वर पूजिजे ॥ २५६ ॥

पुढें जावें महादेवासी । पूजा करावी भक्तींसीं ।
नर्मदेश्र्वर हर्षीं । एकोभावें अर्चावा ॥ २५७ ॥

गंगा-यमुना-सरस्वतीश्र्वरासी । लिंगे तीन्ही विशेषीं ।
पूजा करी गा भक्तींसीं । कामतीर्थ मग पाहें ॥ २५८ ॥


कामेश्र्वरासी पूजोनि । गोप्रतारतीर्थ स्नानीं ।
पंचगंगेसी जाऊनि । स्नान मागुतीं करावें ॥ २५९ ॥

मणिकर्णिका स्नान करणें । जलाशायीतें पूजणें ।
हनुमंतातें नमन करणें । मोदादि पंच विनायका ॥ २६० ॥


पूजावें अन्नपूर्णेसी । ढुंढिराजा परियेसीं ।
ज्ञानवापीं स्नानेंसीं । ज्ञानेश्र्वर पूजावा ॥ २६१ ॥

पूजी दंडपाणीसी । मोक्षलक्ष्मीविलांसासी ।
पूजा पंचपांडवांसी । द्रौपदी-द्रुपदविनायका ॥ २६२ ॥

पूजा आनंदभैरवासी । अविमुक्तेश्र्वरा हर्षीं ।
पूजोनि संभ्रमेंसीं । विश्र्वनाथासन्मुख ॥ २६३ ॥

(श्र्लोक) ” उत्तरमानसयात्रेयं यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ” ॥ २६४ ॥

ऐसा मंत्र जपोनि । साष्टांगीं नमन करुनि ।
मग निघावें तेथोनि । पंचक्रोशयात्रेसी ॥ २६५ ॥

संकल्प करोनियां मनीं । जावें स्वर्गद्वारभुवनीं ।
गंगाकेशवापासोनि । हरिश्र्चंद्रमंडपा ॥ २६६ ॥

स्वर्गद्वारा असे जाण । मणिकर्णिका विस्तीर्ण ।
तुवां तेथें जावोन । संकल्पावें विधीसी ॥ २६७ ॥

हविष्यान्न पूर्व दिवसीं । करोनि असावें शुचीसीं ।
प्रातःकाळीं गंगेसी । स्नान आपण करावें ॥ २६८ ॥

धुंडिराजा प्रार्थोनि । मागावें करुणावचनीं ।
पुनर्दर्शन दे म्हणोनि । विनवावें परियेसा ॥ २६९ ॥

गंगेतें नमोनि । जावें मग विश्र्वनाथभुवनीं ।
मग निघावें तेथोनि । भवानीशंकर पूजावया ॥ २७० ॥

जावें मुक्तिमंडपासी । नमोनि निघावें संतोषीं ।
धुंडिराज-पूजेसी । पुनरपि जावें परियेसा ॥ २७१ ॥

मागुती यावें महाद्वारा । विश्र्वेश्र्वर-पूजा करा ।
मोदादि पंच विघ्नेश्र्वरां । नमन करीं दंडपाणीसी ॥ २७२ ॥

पूजा आनंदभैरवासी । मागुतीं जावें मणिकर्णिकेसी ।
पूजोनियां मणिकर्णिकेश्र्वरासी । सिद्धिविनायका पूजावें ॥ २७३ ॥

गंगाकेशव पूजोनि । ललितादेवी नमोनि ।
जरासंधेश्र्वर आणा ध्यानीं । दालभ्येश्र्वरासी मग पूजीं ॥ २७४ ॥

सोमनाथासी पूजा करीं । पुढें शूलटंकेश्र्वरीं ।
पूजा करीं वाराहेश्र्वरीं । दशाश्र्वमेधीं पूजीं मग ॥ २७५ ॥

बंदी देवीसी वंदोनि । सर्वेश्र्वराचें दर्शन करुनि ।
केदारेश्र्वरा ध्यानीं । हनुमंतेश्र्वरासी पूजावें ॥ २७६ ॥

पूजा करीं संगमेश्र्वरी । लोलार्का अवधारीं ।
अर्कविनायक पूजा करीं । दुर्गाकुंडीं स्नान मग ॥ २७७ ॥

दुर्गा देवी पूजोनि । अर्ची दुर्गागणेश्र्वर ध्यानीं ।
पुनर्दर्शन दे म्हणोनि । प्रार्थावें तेथें परियेसा ॥ २७८ ॥

विश्र्वक्सेन-ईश्र्वरासी । कर्दमतीर्थी स्नान हर्षीं ।
कर्दमेश्र्वरपूजेसी । तुवां जावें भक्तीनें ॥ २७९ ॥

मग जावें कर्दमकूपासी । पूजीं तुवां सोमनाथासी ।
विरुपाक्षलिंगासी । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥ २८० ॥

पुढें जावें नीलकंठासी । पूजा करीं गा भक्तीसीं ।
कर जोडोनि भावेसीं । कर्दमेश्र्वर स्मरावा ॥ २८१ ॥

पुन्हा दर्शन आम्हांसीं । दे म्हणावें भक्तींसी ।
मग निघावें वेगेंसी । नागनाथाते पूजेतें ॥ २८२ ॥

पुढें पूजिजे चामुंडेसी । मोक्षेश्र्वरा परियेसीं ।
कारुण्येश्र्वर भक्तींसीं । पूजा करीं गा बाळका ॥ २८३ ॥

वीरभद्रपूजेसी । जावें तेथोनि द्वितीय दुर्गेसी ।
विकटाख्य देवीसी । पूजा करीं गा मनोभावें ॥ २८४ ॥

पूजीं भैरव-उन्मत्त । काळकूटदेव ख्यात ।
विमलदुर्गा विचित्र । पूजा करीं गा बाळका ॥ २८५ ॥

पूजावें महादेवासी । नंदिकेश्र्वर पूजीं भरवसीं ।
भृंगेश्र्वर विशेषीं । पूजा करी गा मनोभावें ॥ २८६ ॥

गणप्रियांसी पूजोनि । विरुपाक्षातें नमूनि ।
यज्ञेश्र्वर अर्चोनि । विमलेश्र्वर पूजिजे मग ॥ २८७ ॥

ज्ञानेश्र्वर असे थोर । पूजा पुढें अमृतेश्र्वर ।
गंधर्वसागर मनोहर । पूजा करीं गा भक्तींसी ॥ २८८ ॥

भीमचंडी शक्तीसी । पूजी चंडीविनायकासी ।
रविरक्ताक्षगंधर्वासी । पूजा करीं गा मनोभावें ॥ २८९ ॥

नरकार्णवतारकासी । पूजीं गा भीमचंडीसी ।
विनविजे तुम्ही त्यासी । पुनर्दर्शन दे म्हणोनि ॥ २९० ॥

एकपादविनायकासी । पुढें पूजिजे भैरवासी ।
समागमें भैरवीसी । पूजा करी गा ब्रह्मचारी ॥ २९१ ॥

भूतनाथ सोमनाथ । कालनाथ असे ख्यात ।
पूजा करीं गा तूं त्वरित । कपर्देश्र्वरलिंगासी ॥ २९२ ॥

नागेश्र्वर कामेश्र्वर । पुढें पूजी गणेश्र्वर ।
पूजा करीं वीरभद्रेश्र्वर । चतुर्मुख विनायका ॥ २९३ ॥

देहलीविनायकासी । पूजीं गणेश-षोडशी ।
उद्दंडगणेशासी । पूजा करीं मनोहर ॥ २९४ ॥

उत्कलेश्र्वर महाथोर । असे लिंग मनोहर ।
पुढें एकादश रुद्र । रुद्राणीतें पूजावें ॥ २९५ ॥

तेथोनि जावें तपोभूमीसी । पूजा करीं गा भक्तींसी ।
रामेश्र्वर महाहर्षीं । पूजीं मग सोमनाथ ॥ २९६ ॥

भरतेश्र्वर असे थोर । लक्ष्मणेश्र्वर मनोहर ।
पूजीं मग शत्रुघ्नेश्र्वर । द्यावाभूमी अर्ची मग ॥ २९७ ॥

नहुषेश्र्वर पूजोन । करीं रामेश्र्वरध्यान ।
पुनर्दर्शन दे म्हणोन । विनवावें परियेसा ॥ २९८ ॥

असंख्यात तीर्थवरण । तेथें करावें तुम्ही नमन ।
असंख्यात लिंग जाण । पूजा करीं गा मननिर्मळ ॥ २९९ ॥

पुढें असे लिंग थोर । नामें जाणा देवसंधेश्र्वर ।
पूजा करीं गा मनोहर । पाशपाणि विनायका ॥ ३०० ॥

त्याची पूजा करुनि । पृथ्वीश्र्वरातें नमोनि ।
यूपसरीं स्नान करोनि । कपिलधारा स्नान करीं ॥ ३०१ ॥

वृषभध्वजासी पूजोनि । ज्वालानृसिंह वंदी चरणीं ।
वरणासंगमीं स्नान करुनि । श्राद्धादि कर्मे करावी ॥ ३०२ ॥

संगमेश्र्वर पूजावा । पुढें पूजीं तूं केशवा ।
खर्वविनायक बरवा । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥ ३०३ ॥

पूजीं प्रल्हादेश्र्वरासी । स्नान कपिलतीर्थासी ।
त्रिलोचनईश्र्वरासी । पूजा करीं गा भक्तीनें ॥ ३०४ ॥

पुढें असे महादेव । पंचगंगातीर ठाव ।
पूजा करीं गा भक्तीभावें । तया बिंदुमाधवासी ॥ ३०५ ॥

पूजिजे मंगळागौरीसी । गभस्तीश्र्वरा परियेसीं ।
वसिष्ठ-वामदेवासी । पर्वतेश्र्वरा पूजीं मग ॥ ३०६ ॥

महेश्र्वराचे पूजेसी । पुढें सिद्धिविनायकासी ।
पूजा सप्तावरणेश्र्वरासी । सर्वगणेश पूजावा ॥ ३०७ ॥

मग जावें मणिकर्णिकेसी । स्नान करावें विवेकेंसीं ।
विश्र्वेश्र्वर स्मरोनि मग हर्षी । महादेवासी पूजावें ॥ ३०८ ॥

पुनरपि जावें मुक्तिमंडपासी । नमन करावें विष्णूसी ।
पूजावें तुवां दंडपाणीसी । मग धुंडिराज अर्चावा ॥ ३०९ ॥

आनंदभैरवासी पूजोनि । आदित्येशातें नमोनि ।
पूजा करीं गा एकोमनीं । मोदादि पंचविनायकासी ॥ ३१० ॥

पूजा करीं गा विश्र्वेश्र्वरासी । मोक्षलक्ष्मीविलासासी ।
नमूनि जावें सन्मुखेंसी । मंत्र म्हणावा येणेंपरी ॥ ३११ ॥

(श्र्लोक) ” जय विश्र्वेश विश्र्वात्मन् काशीनाथ जगत्पते ।
त्वत्प्रसादान्महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा ॥ ३१२ ॥

अनेकजन्मपापानि कृतानि मम शंकर ।
गतानि पंचक्रोशात्मलिंगस्यास्य प्रदक्षिणात् ॥ ३१३ ॥

(ओव्यां) ऐसा मंत्र जपोनि । पुढें जावें शिवध्यानीं ।
मुक्तिमंडपादि करोनि । आठां ठायीं वंदावें ॥ ३१४ ॥

प्रथम मुक्तिमंडपासी । नमन करावें परियेसीं ।
वंदिजे शृंगारमंडपासी । ऐश्र्वर्यमंडपासी मग जावे ॥ ३१५ ॥

ज्ञानमंडपा नमोनि । मोक्षलक्ष्मी-विलासस्थानीं ।
सुमुक्तमंडपा वंदोनि । आनंदमंडपा तुवां जावें ॥ ३१६ ॥

पुढें वैराग्यमंडपासी । तुवां जावें भक्तिंसीं ।
येणेंपरी यात्रेसी । करी गा बाळा ब्रह्मचारी ॥ ३१७ ॥

आणिक एक प्रकार । सांगेन ऐक विचार ।
‘ नित्ययात्रा ‘ मनोहर । ऐक बाळा गुरुदासा ॥ ३१८ ॥

सचैल शुचि होऊनि । स्नान चक्रपुष्करणीं ।
देवपितर तर्पोनि । ब्राह्मण-पूजा करावी ॥ ३१९ ॥

मग निघावें तेथोनि । द्रुपदादित्येश्र्वर पूजोनि ।
द्रुपदेश्र्वर नमोनि । श्रीविष्णूतें पूजावें ॥ ३२० ॥

मग नमावें दंडपाणी । महेश्र्वरातें पूजोनि ।
पुढें जावें तेथोनि । धुंडिराज अर्चावा ॥ ३२१ ॥

ज्ञानवापीं करीं स्नान । नंदिकेश्र्वर पूजोन ।
तारकेश्र्वर अर्चोन । पुढें जावें मग तुवां ॥ ३२२ ॥

महाकाळेश्र्वर देखा । पूजा करीं भावें एका ।
दंडपाणि विशेषा । पूजा करीं गा मनोहर ॥ ३२३ ॥

मग यात्रा विश्र्वेश्र्वर । करीं गा बाळा मनोहर ।
लिंग असे ओंकारेश्र्वर । प्रतिपदेसी पूजावा ॥ ३२४ ॥

मत्स्योदरी तीर्थेसीं । स्नान करावें पाडवेंसी ।
त्रिलोचन महादेवासी । दोनी लिंगे असतीं जाण ॥ ३२५ ॥

तेथें बीजतिजेसी । जावें तुवां यात्रेंसी ।
यात्रा जाणा चतुर्थीसी । कृत्तिवास लिंग जाणा ॥ ३२६ ॥

रत्नेश्र्वर पंचमीसी । चंद्रेश्र्वर पूजेसी ।
षष्ठीसी जावें तुवां हर्षी । ऐक शिष्या एकचित्तें ॥ ३२७ ॥

सप्तमी केदारेश्र्वर । अष्टमी लिंग धर्मेश्र्वर ।
वीरीश्र्वर लिंग थोर । नवमी यात्रा महापुण्य ॥ ३२८ ॥

कामेश्र्वर दशमीसी । एकादशीं विश्र्वकर्मेश्र्वरासी ।
द्वादशी मणिकर्णिकेसी । मणिकर्णिकेश्र्वर पूजावा ॥ ३२९ ॥

त्रयोदशीं प्रदोषेसी । पूजा अविमुक्तेश्र्वरासी ।
चतुर्दशीं विशेषीं । विश्र्वेश्र्वर पूजावा ॥ ३३० ॥

Leave a Reply