श्रीगुरुचरित्र अध्याय 41 भाग -2
सदा दिसावें नूतन । वावरत असावें आपण ।
करावया पाक-यत्न । मडकीं करुनि आणीं पां ॥ १११ ॥
आणिक सांगेन मी तुज । रांधणें करावया शिकवी मज ।
पाक केलिया उष्ण सहज । असों नये अन्न जाणा ॥ ११२ ॥
पाक करितां मडकेसी । न लागे काजळ परियेसीं ।
आणोनि दे गा भांडीं ऐसीं । आणिक सांगेन मी तुज ॥ ११३ ॥
गुरुकन्या ऐसें म्हणे । अंगीकारिलें शिष्यराणें ।
नियता जाहला तत्क्षणें । महारण्य प्रवेशला ॥ ११४ ॥
मनीं चिंता बहु करी । आपण बाळ ब्रह्मचारी ।
काय जाणें याची परी । केवीं करुं म्हणतसे ॥ ११५ ॥
पत्रावळी करुं नेणें । इतुकें मातें कधीं होणे ।
स्मरत असे एकध्यानें । श्रीगुरुचे चरण देखा ॥ ११६ ॥
म्हणे आतां काय करुं । मातें कोण आधारु ।
बोल ठेवील माझा गुरु । शीघ्र इतुकें न करितां ॥ ११७ ॥
कवणापाशीं जाऊं शरण । राखील कोण माझा प्राण ।
कृपानिधि गुरुवीण । ऐसा असेल कवण आतां ॥ ११८ ॥
जरी न ऐकें गुरुचे बोल । शाप देईल तात्काळ ।
ब्रह्मचारी आपण बाळ । म्हणोनि अंगीकार केला ॥ ११९ ॥
काय गति आपणासी । शरण जाऊं कवणापाशीं ।
अशक्त बाळ या कामासी । अंगीकार कां केला ॥ १२० ॥
गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण ।
वेंचीन आतां माझा प्राण । गुरुनिरोप करीन मी ॥ १२१ ॥
ऐसा महारण्यांत । जातो बाळ चिंता करीत ।
श्रमोनियां अत्यंत । निर्वाणमानसें निघाला ॥ १२२ ॥
पुढें जातां मार्गांत । भेटला एक अवधूत ।
ब्रह्मचारीतें देखत । पुसता झाला तये वेळीं ॥ १२३ ॥
कवण बाळ कोठें जासी । चिंताव्याकुळ मानसीं ।
विस्तारुनि आम्हांसी । सांग म्हणे तये वेळीं ॥ १२४ ॥
ऐसें म्हणतां ब्रह्मचारी । जाऊनि तया नमन करी ।
म्हणें स्वामी तारीं तारीं । चिंरासागरीं बुडतसे ॥ १२५ ॥
भेटलासी तूं निधानु । जैसी वत्सालागीं धेनु ।
दुःखिष्ट जाहलों होतों आपणु । आपणा देखतां मन माझें निवालें ॥ १२६ ॥
जैसें चकोरपक्षियातें । चांदणें येता मन हर्षतें ।
तैसें तुझ्या दर्शनमात्रें । आनंद जाहला स्वामिया ॥ १२७ ॥
माझें पूर्वाजित पुण्य । कांहीं होतें म्हणोन ।
तूं भेटलासी निधान । कृपासिंधु परमपुरुषा ॥ १२८ ॥
सांगा आपुलें नाम कवण । येणें जाहले कोठून ।
निर्मुष्य महारण्य । मध्यें तुंवा भेटलासि ॥ १२९ ॥
होसील तूंचि ईश्र्वरु । मातें कृपा केली गुरु ।
तुज देखतां मनोहरु । अंतःकरण स्थिर झालें ॥ १३० ॥
कीं होसील कृपाळू । सत्य तूंचि भक्तवत्सलु ।
मीं तुझा दास बाळु । म्हणोनि चरणीं लागला ॥ १३१ ॥
नमितां तया बाळकासी । उठवीतसे तापसी ।
अलिंगोनि महाहर्षी । आश्र्वासीतसे तये वेळीं ॥ १३२ ॥
मग पुसता जाहला वृत्तांत । बाळक सांगे समस्त ।
गुरुंनीं मागितली जे जे वस्त । कवणेपरी साध्य होय ॥ १३३ ॥
आपण बाळ ब्रह्मचारी । जे न होय ते कामा अंगीकारीं ।
पडिलों चिंतासागरीं । तारावें स्वामी म्हणतसे ॥ १३४ ॥
मग म्हणे अवधूत । तया बाळकातें अभय देत ।
सांगेन एक तुज हित । जेणें तुझें कार्य साधे ॥ १३५ ॥
विश्र्वेश्र्वर-आराधन । असे एक निधान ।
काशीपुर महास्थान । सकळाभीष्टें साधतील ॥ १३६ ॥
पंचाशत्कोटी असे क्षिति । तयावेगळी विख्याति ।
विष्णुमुख प्रलापति । तेथें वर लाधले ॥ १३७ ॥
ब्रह्मा सृष्टि रचावयासी । वर लाधला परियेसीं ।
वर दिधला विष्णूसी । समस्त स्रुष्टि पोसावया ॥ १३८ ॥
काशीपूर असे महास्थान । तुवां जातांचि जाण ।
होईल तुझी मनकामना । संदेह न धरीं मनांत ॥ १३९ ॥
तुवां जावें त्वरितेंसीं । जें जें वसे मानसीं ।
समस्त विद्या लावसी । तूंचि होसी ‘ विश्र्वकर्मा ‘ ॥ १४० ॥
चतुर्विध पुरुषार्थ । साध्य होतील तेथें त्वरित ।
यापरता आणिक स्वार्थ । काय असें सांग मज ॥ १४१ ॥
तो देव असे दयाळ । विचित्र असे त्याचा खेळ ।
उपमन्यु म्हणिजे बाळ । त्यासी दिधला क्षीरसिंधु ॥ १४२ ॥
नाम ‘ आनंदकानन ‘ । विख्यात असे महास्थान ।
समस्तांची मनकामना । तये ठायीं होतसे ॥ १४३ ॥
नाम असे पुरी ‘ काशी ‘ । समस्त धर्माचिये राशी ।
सकळ जीवजंतूंसी । मोक्षस्थान परियेसा ॥ १४४ ॥
वास करिती तये स्थानीं । त्यातें देखतांचि नयनीं ।
जाती दोष पळोनि । स्थानमहिमा काय सांगूं ॥ १४५ ॥
ऐसें काशीस्थान असतां । का बा करिसी तूं चिंता ।
तेथील पुण्य वर्णितां । अशक्य माझे जिव्हेसी ॥ १४६ ॥
तया काशीनगरांत । जे जन तीर्थें हिंडत ।
एकेक पाउलीं पुण्य बहुत । अश्र्वमेध फळ असे ॥ १४७ ॥
धर्म-अर्थ-काम-मोक्ष । जे जे मनीं तुझे कांक्ष ।
जातांचि होईल साक्ष । संदेह न धरीं मनांत ॥ १४८ ॥
ऐकोनियां ब्रह्मचारी । साष्टांगीं नमन करी ।
कोठें आहे काशीपुरी । आपण असे अरण्यांत ॥ १४९ ॥
‘ आनंदकानन ‘ म्हणसी । स्वर्गीं असे कीं भूमीसी ।
अथवा जाऊं पाताळासी । कोठें असे सांग मज ॥ १५० ॥
या संसारसागरासी । तारावया तूंचि होसी ।
ज्ञान मातें उपदेशीं । तारीं मातें स्वामिया ॥ १५१ ॥
ऐशा काशीपुरासी । मातें कोण नेईल हर्षी ।
विनवूं जरी मी तुम्हांसी । घेवोनि जावें म्हणोनियां ॥ १५२ ॥
कार्य असलियां तुम्हांसी । मज कैसी बुद्धि देसी ।
आम्ही बाळक तुम्हांसी । म्हणोनि चरणीं लागला ॥ १५३ ॥
ऐसें म्हणता तापसी । आपण नेईन म्हणे हर्षी ।
तुजकरितां आपणासी । यात्रा घडे लाभ थोर ॥ १५४ ॥
यापरता आम्हांसी । काय लाभ असे विशेषीं ।
वृथा जन्म मानवासी । काशीवास न करितां ॥ १५५ ॥
तुजकरितां आपणासी । दर्शन घडे पुरी काशी ।
चला जाऊं त्वरितेंसीं । म्हणोनि दोघे निघाले ॥ १५६ ॥
मनोवेगें तात्काळीं । पातले विश्र्वेश्र्वराजवळी ।
तापसी म्हणे तये वेळीं । बाळा यात्रा करीं आतां ॥ १५७ ॥
बाळ म्हणे तापसीसी । स्वामी मातें निरोप देसी ।
नेणों यात्रा आहे कैसी । कवणेंपरी रहाटावें ॥ १५८ ॥
आपण बाळ ब्रह्मचारी । नेणें तीर्थ कवणेपरी ।
कवणें विधिपुरःसरीं । विस्तारुनि सांग मज ॥ १५९ ॥
तापसी म्हणे तयासी । सांगेन यात्राविधीसी ।
तुवां करावें भावेंसीं । नेमें भक्तिपूर्वक ॥ १६० ॥
पहिलें मणिकर्णिकेसी । स्नान करणें नेमेंसीं ।
जाऊनियां विनायकांसी । पांचाठायीं नमावें ॥ १६१ ॥
मग जावें महाद्वारा । विश्र्वनाथदर्शन करा ।
पुनरपि यावें गंगातीरा । मणिकर्णिकास्नान करावें ॥ १६२ ॥
मणिकर्णिकेश्र्वर । पूजा करीं निर्धार ।
जाऊनि कंबळाश्र्वतर । पूजा करी गा भावेंसीं ॥ १६३ ॥
पुढें ईश्र्वर-वासुकीसी । पूजा करी गा भक्तींसीं ।
पर्वतेश्र्वर पूजोनि हर्षी । गंगाकेशव पूजीं मग ॥ १६४ ॥
ललिता देवी पूजोनि । मग जावें तेथूनि ।
जरासंधेश्र्वर सगुणी । पूजा करीं गा भक्तींसीं ॥ १६५ ॥
सोमनाथ असे थोर । पूजावा शूळटंकेश्र्वर ।
तया पुढें वाराहेश्र्वर । पूजा करी गा ब्रह्मेश्र्वरीं ॥ १६६ ॥
अगस्त्येश्र्वर कश्यपासी । पूजा करीं गा हरिकेश-वनेश्र्वरासी ।
वैद्यानाथ महाहर्षी । ध्रुवेक्ष्वरा पूजीं मग ॥ १६७ ॥
गोकर्णेश्र्वर असे थोर । पूजा करीं गा हाटकेश्र्वर ।
अस्थिक्षेप-तटाकतीर । कीकसेश्र्वर पूजावा ॥ १६८ ॥
भारभूतेश्र्वरासी । पूजा करीं गा भावेंसीं ।
चित्रगुप्तेश्र्वरासी । चित्रघंटेसी पूजावें ॥ १६९ ॥
पशुपतीश्र्वर निका । पूजा करोनि बाळका ।
पितामह असे जो कां । त्या ईश्र्वरांते पूजावें ॥ १७० ॥
कलशेश्र्वर वंदूनि । पुढें जावें एकोमनीं ।
चंद्रेश्र्वरासी नमोनि । पूजा करीं गा वीरेश्र्वरा ॥ १७१ ॥
पुढें पूजीं विद्येश्र्वर । यानंतर अग्नीश्र्वर ।
मग पूजिजे नागेश्र्वर । हरिचंद्रेश्र्वर पूजीं जाण ॥ १७२ ॥
चिंतामणि-विनायका । सेनाविनायक देखा ।
पूजा करुनि ऐका । वसिष्ठ वामदेव मग पूजीं ॥ १७३ ॥
पुढें त्रिसंध्येश्र्वर । पूजीं लिंग असे थोर ।
विशालाक्षी मनोहर । धर्मेश्र्वर पूजीं मग ॥ १७४ ॥
विश्र्वबाहु पूजा निका । पुढें आशाविनायका ।
वृद्धादित्य असे जो कां । पूजा करीं गा मनोभावें ॥ १७५ ॥
चतुर्वक्त्रेश्र्वर थोर । लिंग असे मनोहर ।
पूजा करी गा ब्राह्मीश्र्वर । अनुक्रमेंकरुनियां ॥ १७६ ॥
मनः प्रकामेश्र्वर असे खूण । पुढें ईश्र्वरईशान ।
चंडी-चंडेश्र्वर जाण । पूजा करीं गा भक्तींसीं ॥ १७७ ॥
पूजीं भवानी-शंकर । ढुण्डीराज मनोहर ।
अर्ची राजराजेश्र्वर । लांगलीश्र्वर पूजिजे मग ॥ १७८ ॥
नकुलीश्र्वर पूजेसी । तुवां जावें भक्तींसीं ।
परान्न-परद्रव्येश्र्वरासी । प्रतिगृहेश्र्वर पूजीं मग ॥ १७९ ॥
निष्कलंकेश्र्वर थोर । असे लिंग मनोहर ।
पूजीं मार्कंडेयेश्र्वर । अप्सरेश्र्वर पूजीं मग ॥ १८० ॥
गंगेश्र्वर पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान ।
ज्ञानेश्र्वरा अर्चून । नंदिकेश्र्वरा पूजीं मग ॥ १८१ ॥
तारकेश्र्वर थोर । लिंग असे मनोहर ।
पूजीं महाकाळेश्र्वर । दंडपाणि पूजीं मग ॥ १८२ ॥
महेश्र्वरातें पूजोनि । अर्ची मोक्षेश्र्वर ध्यानीं ।
वीरभद्रेश्र्वर सुमनीं । पूजा करीं गा बाळका ॥ १८३ ॥
अविमुक्तेश्र्वरापाशीं । तुवां जाऊनियां हर्षी ।
पूजा करीं गा भावेंसी । मोदादि पंचविनायका ॥ १८४ ॥
आनंदभैरवपूजा करीं । पुनरपि जाय महाद्वारीं ।
जेथें असे मन्मथारि । विश्र्वनाथ परियेसा ॥ १८५ ॥
बाळा तुवां येणेंपरी । अंतर्गृहयात्रा करीं ।
मुक्तिमंडपाभीतरीं । जाऊनि मंत्र म्हणावा ॥ १८६ ॥
अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥ १८७ ॥
ऐसा मंत्र जपोनि । विश्र्वनाथातें नमूनि ।
मग निघावें तेथूनि । ‘ दक्षिणमानस ‘ यात्रेसी ॥ १८८ ॥
मणिकर्णिकेसी जाऊनि । स्नान उत्तरवाहिनी ।
विश्र्वनाथातें पूजोनि । संकल्पावें यात्रेसी ॥ १८९ ॥
तेथोनि यावें हर्षी । मोदादि पंचविनायकांसी ।
पूजा करावी भक्तींसी । धुंडिराज पूजीं मग ॥ १९० ॥
पूजा भवानीशंकरा । दंडपाणि नमन करा ।
विशालाक्ष अवधारा । पूजीं तूं भक्तिभावें ॥ १९१ ॥
स्नान धर्मकूपेसी । श्राद्धादिविधि करा हर्षी ।
पूजा धर्मेश्र्वरासी । गंगाकेशव पूजीं मग ॥ १९२ ॥
पूजावी देवी ललिता । जरासंधेश्र्वर नमितां ।
पूजीं मग सोमनाथा । वाराहेश्र्वरा भक्तींसीं ॥ १९३ ॥
दशाश्र्वमेधतीर्थेसी । स्नान श्राद्धविधि करा हर्षी ।
प्रयागतीर्थीं परियेसीं । स्नान करा श्राद्ध कर्म ॥ १९४ ॥
पूजोनियां प्रयागेश्र्वरासी । दशाश्र्वमेध-ईश्र्वरासी ।
पूजा करीं गा भक्तीसीं । शीतलेश्र्वरासी पूजिजे ॥ १९५ ॥
अर्ची मग बंदी देवी । सर्वेश्र्वरी मनोभावीं ।
धुंडिराजा भक्तिपूवा । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥ १९६ ॥
तिळभांडेश्र्वर देखा । पूजा करी पुढें ऐका ।
रेवाकुंडीं स्नान निका । मानससरोवरीं मग स्नान ॥ १९७ ॥
श्राद्धादि पितृतर्पण । मानसेश्र्वर पूजोन ।
मनःकामना पावणें । ऐक बाळा ब्रह्मचारी ॥ १९८ ॥
केदारकुंडी स्नान । करावें तेथें तर्पण ।
केदारेश्र्वर पूजोन । गौरीकुंडीं स्नान करीं ॥ १९९ ॥
वृद्धकेदारेश्र्वर । पूजीं हनुमंतेश्र्वर ।
रामेश्र्वर मनोहर । पूजोनि श्राद्ध कृमिकुंडीं ॥ २०० ॥
सिद्धेश्र्वरासी करीं नमन । करुनि स्वप्नकुंडीं स्नान ।
स्वप्नेश्र्वरासी पूजोन । स्नान करीं गा संगमांत ॥ २०१ ॥
संगमेश्र्वर पूजोन । लोलार्ककूपी करीं स्नान ।
श्राद्धादिकर्मे आचरोन । गतिप्रदीप-ईश्र्वरासी ॥ २०२ ॥
पूजावें अर्कविनायका । पाराशरेश्र्वराअधिका ।
पूजा करोनि बाळका । सन्निहत्य-कुंडीं स्नान करीं ॥ २०३ ॥
कुरुक्षेत्र-कुंडीं देखा । स्नान करावें विशेखा ।
सुवर्णादिदान निका । तेथें तुम्हीं करावें ॥ २०४ ॥
अमृतकुंडीं स्नान निका । पूजीं दुर्गाविनायका ।
दुर्गादेवीसी बाळका । पूजा करीं मनोभावें ॥ २०५ ॥
पुढें चौसष्टी योगिनी । पूजा करीं गा एकोमनीं ।
कुक्कुट द्विजातें वंदुनी । मंत्र तेथे जपावा ॥ २०६ ॥
(श्र्लोक) वाराणस्यां दक्षिणेंऽगे ‘ कुक्कुटो ‘ नाम वै द्विजः ।
तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत् ॥ २०७ ॥
(ओंवी) पुढें मासोपवासासी । पूजिजे गोईबाईसी ।
कवाडें घालूनियां तिसी । टोले तीन मारावे ॥ २०८ ॥
पूजा करीं रेणुकेसी । पुढें स्नान करावें हर्षी ।
शंखोद्धारकुंडेसी । शंखविष्णु पूजिजे ॥ २०९ ॥
कामाक्षिकुंडीं स्नान । कामाक्षिदेवी पूजोन ।
अयोध्याकुंडीं करीं स्नान । रामसीता पूजावीं ॥ २१० ॥