श्री गुरु चरित्र परयाण का यह चालीसवाँ अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है .
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 39
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 41
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका ।
वृक्ष जाहला काष्ठ शुष्का । विचित्र कथा ऐक पां ॥ १ ॥
गाणगापुरीं असतां गुरु । आला एक कुष्ठी विप्रु ।
आपस्तंब गार्ग्य गोत्रु । नाम तया ‘ नरहरि ‘ ॥ २ ॥
येवोनियां श्रीगुरुमूर्तीसी । नमन करी भक्तीसी ।
करी स्तोत्र बहुवसीं । करसंपुट जोडूनियां ॥ ३ ॥
जय जया गुरुमूर्ति । ऐकोनि आलों तुझी कीर्ति ।
भक्तवत्सला परंज्योती । परमपुरुषा जगदगुरु ॥ ४ ॥
आपण जन्मोनि संसारीं । वृथा जाहलों दगडापरी ।
निंदा करिती द्विजवरी । कुष्ठी म्हणोनि स्वामिया ॥ ५ ॥
वाचिला वेद यजुःशाखा । निंदा करिती मातें लोक ।
ब्राह्मणार्थ न सांगती देखा । अंग हीन म्हणोनियां ॥ ६ ॥
प्रातःकाळीं उठोनि लोक । न पाहती आपुलें मुख ।
तेणें मातें होतें दुःख । जन्म पुरे आतां मज ॥ ७ ॥
पाप केलें आपण बहुत । जन्मांतरीं असंख्यात ।
त्याणें हा भोग भोगीत । आतां न साहें स्वामिया ॥ ८ ॥
नाना व्रत नाना तीर्थें । हिंडोनि आलों असंख्यात ।
पूजा केली देवां समस्त । माझी व्याधि नवचेचि ॥ ९ ॥
आतां धरुनि निर्धारु । आलों स्वामी जगद्गुरु ।
तुझी कृपा न होय जरी । प्राण आपुला त्यजीन ॥ १० ॥
म्हणोनि निर्वाण मानसीं । विनवीतसे श्रीगुरुसी ।
एकोभावें भक्तींसीं । कृपा भाकी द्विजवर ॥ ११ ॥
म्हणोनि मागुती नमस्कारी । नानापरी स्तुति करी ।
लोहपरीस भेटीपरीं । तुझे दर्शनमात्रेंसी ॥ १२ ॥
करुणावचन ऐकोनि । भक्रवत्सल श्रीगुरु मुनि ।
निरोप देती कृपा करुनि । ऐक शिष्या नामधारका ॥ १३ ॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । पूर्वजन्मीं महादोषासी ।
केले होते बहुवसीं । म्हणोनि कुष्ठी झालासि तूं ॥ १४ ॥
आतां सांगेन तें करीं । तुझें पाप जाईल दुरी ।
होशील दिव्यशरीरी । एकोभावें आचरावें ॥ १५ ॥
इतुकिया अवसरीं । काष्ठ एक औदुंबरी ।
शुष्क होते वर्षें चारी । घेऊनि आले सर्पणासी ॥ १६ ॥
तंव देखिलें श्रीगुरुमूर्ती । तया विप्रा निरोप देती ।
एकोभावेंकरोनि चित्तीं । घे गा काष्ठ झडकरी ॥ १७ ॥
काष्ठ घेवोनि संगमासी । त्वरित जावें भावेंसी ।
संगमनाथ-पूर्वदिशीं । भीमातीरी रोवी पां ॥ १८ ॥
तुवां जाऊनि संगमांत । स्नान करुनि यावें त्वरित ।
पूजा करुनि अश्र्वत्थ । पुनरपि जावें स्नानासी ॥ १९ ॥
हातीं धरुनि कलश दोनी । आणी उदक तत्क्षणीं ।
शुष्क काष्ठा वेळ तीन्ही । स्नपन करीं गा मनोभावें ॥ २० ॥
जया दिवसीं काष्ठासी । पर्णे येतील सजीवेसीं ।
पाप गेलें तुझे दोषी । अंग तुझें होईल बरवें ॥ २१ ॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
विश्र्वास झाला तयाचे चित्तिं । धांवत गेला काष्ठाजवळी ॥ २२ ॥
काष्ठ घेऊनि डोईवरी । गेला तो भीमतीरीं ।
संगमेश्र्वरासमोरी । रोविता जाहला द्विजवर ॥ २३ ॥
जेणें रीतीं श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
आचरीतसे एकचित्तीं । भक्तिभावेंकरोनियां ॥ २४ ॥
येणेंपरी सात दिवस । द्विजें केले उपवास ।
तया काष्ठासी दोनी कलश । भरोनि घाली वेळोवेळीं ॥ २५ ॥
देखोनि म्हणती सकळही जन । तया विप्रा बोलावोन ।
सांगताति विवंचन । श्रीगुरुनिरोपलक्षण ॥ २६ ॥
म्हणती तूंते काय जाहलें । शुष्क काष्ठ कां रोंविलें ।
यातें संजीवन तुवां योजिलें । मग तूंतें काय होय ॥ २७ ॥
श्रीगुरुमूर्ति कृपासिंधु । भक्तजना असे वरदु ।
त्याची कृपा असे सद्यु । समस्तांतें कृपा करी ॥ २८ ॥
नसेल निष्कृति तुझिया पापा । म्हणोनि दिधलें काष्ठ बापा ।
वायां कष्ट करिसी कां पां । तूंतें श्रीगुरुनीं निरोपिलें ॥ २९ ॥
ऐकोन तयांचे वचन । विप्रवर करी नमन ।
गुरुवाक्य मज कामधेनु । अन्यथा केवीं होईल ॥ ३० ॥
सत्यसंकल्प श्रीगुरुनाथ । त्यांचे वाक्य नव्हे मिथ्य ।
माझे मनीं निर्धार सत्य । होईल काष्ठ वृक्ष जाणा ॥ ३१ ॥
माझे मनीं निर्धारु । असत्य नव्हे वाक्यगुरु ।
प्राण वेंचीन सवरावरु । गुरुवाक्य मज करणें ॥ ३२ ॥
येणेंपरी समस्तांसी । विप्र सांगे परियेसीं ।
सेवा करी भक्तीसीं । तया शुष्क काष्ठाची ॥ ३३ ॥
एके दिवशीं श्रीगुरुमूर्तीसीं । सांगती शिष्य परियेसीं ।
स्वामींनी निरोपिलें द्विजासी । शुष्क काष्ठा भजीं म्हणोनि ॥ ३४ ॥
सात दिवस उपवासी । सेवा करितो काष्ठासी ।
एकोभावें भक्तींसी । निर्धार केला गुरुवचनीं ॥ ३५ ॥
किती रीतीं आम्हीं त्यासी । विनविलें त्याच्या हितासी ।
वायां कां गा कष्टसी । मूर्खपणें म्हणोनि ॥ ३६ ॥
विप्र आमुतें ऐसें म्हणे । चाड नाही काष्ठासी ।
गुरुवाक्य मज करणें । करील आपुला बोल साचा ॥ ३७ ॥
निर्धार करुनि मानसीं । सेवा करितो काष्ठासी ।
जाहले सात उपवासी । उदक मुखें घेत नाहीं ॥ ३८ ॥
ऐकोनि शिष्यांचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण ।
जैसा भाव अंतःकरण । तैसी सिद्धि पावेल ॥ ३९ ॥
गुरुवाक्य शिष्यासी कारण । सर्वथा नव्हे निर्वाण ।
जैसी भक्ति अंतःकरण । त्वरित होय परियेसा ॥ ४० ॥
याकारणें तुम्हांसी । सांगेन कथा इतिहासीं ।
सांगे सूत ऋषेश्र्वरांसी । स्कंदपुराणीं परियेसा ॥ ४१ ॥
गुरुभक्तीचा प्रकार । पुसती सुतासी ऋषेश्र्वर ।
सांगे सूत सविस्तर । तेचि कथा सांगतसे ॥ ४२ ॥
सूत म्हणे ऋषेश्र्वरांसी । गुरुभक्ति असे विशेषीं ।
तारावया संसारासी । आणिक नाहीं पदार्थ ॥ ४३ ॥
अयोग्य अथवा ज्ञानवंत । म्हणोनि न पहावा अंत ।
गुरु त्रैमूर्ति मनीं ध्यात । सेवा करणें भक्तिभावें ॥ ४४ ॥
दृढ भक्ति असे जयापाशीं । सर्व धर्म साधती तयासी ।
संदेह न धरावा मानसीं । एकचित्तें भजावें ॥ ४५ ॥
गुरु नर ऐसा न म्हणावा । त्रैमूर्ति तोचि जाणावा ।
गुरु-राहटी न विारावी । म्हणावा तोचि ई्वर ॥ ४६ ॥
येणेंपरी धरोनि मनीं । जे जे भजती श्रीगुरुचरणी ।
प्रसन्न होय शूलपाणि । तात्काळिक परियेसा ॥ ४७ ॥
मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ ।
यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी ॥ ४८ ॥
मंत्र-तीर्थ-द्विजस्थानीं । देवता-भक्ति औषधगुणीं ।
गुरुसी पाहे शिवसमानी । भाविल्यासारखें फल होय ॥ ४९ ॥
म्हणे सूत ऋषेश्र्वरांसी । गुरुभक्ति म्हणिजे असे ऐसी ।
सांगेन साक्ष तुम्हांसी । अपूर्व एक वर्तलें असे ॥ ५० ॥
पूर्वी पांचाळ नगरांत । होता राजा सिंहकेत ।
तयासी होता एक पुत्र । नाम तया ‘ धनंजय ‘ ॥ ५१ ॥
एके दिवसीं राजपुत्र । गेला पारधीं अरण्यांत ।
जेथे नसती मनुष्यमात्र । उदकवर्जित स्थळासी ॥ ५२ ॥
राजपुत्र तृषाक्रांत । हिंडतसे अरण्यांत ।
सवें होता शबर दूत । श्रमूनियां परियेसा ॥ ५३ ॥
श्रमोनियां शबर दूत । हिंडत होता रानांत ।
देखता झाला अवचित । जीर्ण एक शिवालय ॥ ५४ ॥
भिन्नलिंग तया स्थानीं । पडिले होते मेदिनी ।
शबरें घेतले उचलोनि । म्हणे लिंग बरवें असे ॥ ५५ ॥
हाती घेवोनि लिंगासी । पहात होता शबर हर्षी ।
राजपुत्र ते संधीसी । आला तया जवळिक ॥ ५६ ॥
राजकुमर म्हणे त्यासी । भिन्न लिंग तें काय करिसी ।
पडिलीं असती भूमीसी । लिंगाकार अनेक ॥ ५७ ॥
शबर म्हणे राजसुता । माझे मनीं ऐसी आता ।
लिंग पूजा करणें नित्या । म्हणोनि घेतलें परियेसा ॥ ५८ ॥
ऐकोनि तयाचें वचन । राजपुत्र हास्यवदन ।
म्हणे पूजीं एकोमनें । लिंग बरवें असें सत्य ॥ ५९ ॥
ऐसें म्हणतां राजकुमार । तया करी नमस्कार ।
कवणें विधीं पूजा करुं । निरुपावें म्हणतसे ॥ ६० ॥
स्वामी व्हावें मातें गुरु । आपण याती असें शबरु ।
नेणें पूजेचा प्रकारु । विस्तारावें म्हणतसे ॥ ६१ ॥
राजपुत्र म्हणे त्यासी । न्यावें पाषाणलिंग घरासी ।
पूजा करावी शुचीसीं । पत्रपुष्पें अर्चोनियां ॥ ६२ ॥
तुम्ही दंपती दोघेजणें । मनःपूर्वक पूजा करणें ।
हेंचि लिंग गिरिजारमणे । म्हणोनि मनीं निर्धारीं पां ॥ ६३ ॥
नानापरी पुष्पजाती । आणाव्या तुवां शिवाप्रती ।
धूप दीप विधानरीतीं । नैवेद्या द्यावें भस्म जाण ॥ ६४ ॥
भस्म असेल जें स्मशानीं । आणावें तुवा प्रतिदिनीं ।
द्यावा नैवेद्य सुमनीं । प्रसाद आपण भक्षावा ॥ ६५ ॥
आणिक जें जें जेवी आपण । तोहि द्यावा नैवेद्य जाण ।
ऐसें असे पूजाविधान । म्हणोनि सांगे राजकुमरु ॥ ६६ ॥
येणेंपरी राजकुमरु । तया शबरा जाहला गुरु ।
विश्र्वास केला निर्धारु । शबरें आपुले मनांत ॥ ६७ ॥
संतोषोनि शबर देखा । नेलें लिंग गृहांतिका ।
स्त्रियेसी सांगे कौतुका । म्हणें ‘ लिंग प्रसन्न जाहलें ‘॥ ६८ ॥
गुरुनिरोप जेणें रीतीं । पूजा करी एकचित्तीं ।
चिताभस्म अतिप्रीतीं । आणोनि नैवेद्य देतसे ॥ ६९ ॥
क्वचितकाळ येणेंपरी । पूजा करी शबरशबरी ।
एके दिवसीं तया नगरीं । चिताभस्म न मिळेचि ॥ ७० ॥
हिंडोनि पाहे गांवोगांवी । चिता भस्म न मिळे कांही ।
येणेंपरी सात गांवीं । हिंडोनि आला तो घरासी ॥ ७१ ॥
चिंता बहु शबरासी । पुसता जाहला स्त्रियेसी ।
काय करुं म्हणे तिसी । प्राण आपुला त्यजीन म्हणे ॥ ७२ ॥
पूजा राहिली लिंगासी । भस्म न मिळे नैवेद्यासी ।
हिंडोनि आलों दाही दिशीं । चिताभस्म न मिळेचि ॥ ७३ ॥
जैसें गुरुनें निरोपिलें । तैसें नैवेद्या पाहिजे दिल्हें ।
नाहीं तरी वृथा जाहलें । शिवपूजन परियेसा ॥ ७४ ॥
गुरुवाक्य जो न करी । तो पडे रौरवघोरीं ।
त्यातें पाप नाहीं दूरी । सदा दरिद्री होय नर ॥ ७५ ॥
त्यासी होय अधोगति । जरकीं पचे अखंडिती ।
जो कवण करी गुरुची भक्ति । तोचि निस्तरे भवार्णव ॥ ७६ ॥
सकळ शास्त्रें येणेपरी । बोलताति वेद चारी ।
याकारणें ऐके शबरी । प्राण आपुला त्यजीन ॥ ७७ ॥
ऐकोनि पतीचे वचन । बोले शबरी हांसोन ।
चिंता करितां किंकारण । चिताभस्म देईन मी ॥ ७८ ॥
मज घालूनि गृहांत । अग्नि लावा तुम्ही त्वरित ।
काष्ठें असती बहुत । दहन होईल आपणासी ॥ ७९ ॥
तेंचि भस्म ईश्र्वरासी । उपहारावें तुम्हीं हर्षी ।
व्रतभंग न करावा भरंवसी । संतोषरुपें बोलतसे ॥ ८० ॥
कधीं तरी शरीरासी । नाश असे परियेसीं ।
ऐसे कार्याकारणासी । देह आपुला समर्पीन ॥ ८१ ॥
ऐकोनि स्त्रियेचे वचन । शबर झाला खेदें खिन्न ।
प्राणेश्र्वरी तुझा प्राण । केवीं घेऊं म्हणतसे ॥ ८२ ॥
अद्यापि तूं पूर्ववयसी । रुपें दिससी रतीसरसी ।
पुत्रापत्य न देखिलेंसी । या संसारा येऊनि ॥ ८३ ॥
मन नाही तुझें धालें । संसारसुख नाही देखिले ।
तुझे मातापित्यानें मज निरविलें । प्राणप्रिये रक्षणार्थ ॥ ८४ ॥
चंद्रसूर्यसाक्षीसीं । वरिलें वो म्यां तुजसी ।
प्राण रक्षणें म्हणोनि हर्षी । घेवोनि आलों मंदिरा ॥ ८५ ॥
आतां तुज दहन करितां । घडतील पापें असंख्याता ।
स्त्रीहत्या महादोषता । केवीं करुं म्हणतसे ॥ ८६ ॥
तूं माझी प्राणेश्र्वरी । तूंतें मारु मी कवणेपरी ।
कैसा तुष्टेल त्रिपुरारि । पुण्य जावोन पाप घडे ॥ ८७ ॥
दुःखे तुझी मातापिता । मातें म्हणती स्त्रीघाता ।
अजूनि तुझी लावण्यता । दिसतसे प्राणप्रिये ॥ ८८ ॥
नाना व्रतें नाना भक्ति । या शरिरालागी करिती ।
दहन करुं कवणें रीतीं । पापें मातें घडतील ॥ ८९ ॥
ऐकोनि पतीचे वचन । विनवीतसे ती अंगना ।
कैसें तुम्हां असे ज्ञान । मिथ्या मोहें बोलतसां ॥ ९० ॥
शरीर म्हणजे स्वप्नापरी । जैसा फेण गंगेवरी ।
न राहे जाणा कधीं स्थिरी । मरण सत्य परियेसा ॥ ९१ ॥
आमुचे मातापिता जाण । तुम्हां दिधलें मातें दान ।
मी तुमची अर्धांगना । भिन्नभाव कोठें असे ॥ ९२ ॥
मी म्हणजे तुमचा देह । मनीं विचार करोनि पाहें ।
आपुलें अर्ध शरीर आहे । काय दोष दहन करितां ॥ ९३ ॥
जो उपजे भूमीवरी । तो जाणावा नश्य निर्धारीं ।
माझें देह साफल्य करीं । ईश्र्वराप्रती पावेल ॥ ९४ ॥
संदेह सोडोनि आपणासी । दहन करीं वेगेंसी ।
आपण होवोनि संतोषीं । निरोप देत्यें परियेसा ॥ ९५ ॥
ऐसें नानापरी पतीसी । बोधी शबरी परियेसीं ।
घरांत जाऊनि पतीसी । म्हणे अग्नि लावीं आतां ॥ ९६ ॥
संतोषोनि तो शबर । बांधिता झाला घराचें द्वार ।
अग्नि लावितां थोर । लागली ज्वाळा धुरंधर ॥ ९७ ॥
दहन जाहलें शबरीसी । भस्म घेतलें परियेसीं ।
पूजा करोनि शिवासी । नैवेद्य दिधला अवधारा ॥ ९८ ॥
पूजा करितां ईश्र्वरासी । आनंद झाला बहुवसीं ।
स्त्रियेसी वधिलें म्हणोनि ऐसी । स्मरण नाहीं तयासी ॥ ९९ ॥
ऐसी भक्तिभावेंसीं । पूजा केली महेशासी ।
प्रसाद घेवोनि हस्तेंसीं । आपुले स्त्रियेस बोलाविलें ॥ १०० ॥
नित्य पूजा करोन । प्रसाद हातीं घेऊन ।
आपुले स्त्रियेस बोलावून । देत होता शबर तो ॥ १०१ ॥
तया दिवसीं तेणेंपरी । आपले स्र्त्रियेतें पाचारी ।
कृपासागर त्रिपुरारि । प्रसन्न जाहला परियेसा ॥ १०२ ॥
तेचि शबरी येऊनि । उभी ठेली हास्यवदनीं ।
घेतला नैवेद्य मागोनि । घेवोनि गेली घरांत ॥ १०३ ॥
जैसे घर तैसें दिसे । शबर विस्मय करीतसे ।
म्हणे दहन केलें स्त्रियेसरिसें । पुनरपि घर तैसेंचि ॥ १०४ ॥
बोलावूनि स्त्रियेसी । शबर पुसतसे तियेसी ।
दहन केलें मीं तुजसी । पुनरपि केवीं आलीस तूं ॥ १०५ ॥
शबरी सांगे पतीसी । आठवण आपणा आहे ऐसी ।
अग्नि लावितां घरासी । निद्रिस्त आपण जाहल्यें देखा ॥ १०६ ॥
महाशीतें पीडित । आपण होत्यें निद्रिस्त ।
तुमचे बोल ऐकत । उठोनि आल्यें म्हणतसे ॥ १०७ ॥
हे होईल ईश्र्वरकरणी । प्रसन्न जाहला शूलपाणी ।
ऐसें म्हणतां तत्क्षणीं । निजस्वरुपें उभा ठेला ॥ १०८ ॥
नमन करीत लोटांगणी । धांवोनि लागती दोघे चरणीं ।
प्रसन्न जाहला शूलपाणि । मागा वर म्हणतसे ॥ १०९ ॥
इह सौख्य संसारी । राज्य दिधलें धुरंधरी ।
गति जाहली त्यानंतरी । कल्पकोटि स्वर्गवास ॥ ११० ॥
येणेंपरी ऋषेश्र्वरांसी । सूत सांगे विस्तारेंसी ।
गुरुवाक्य विश्र्वास ज्यासी । ऐसें फळ होय जाणा ॥ १११ ॥
म्हणोनि श्रीगुरु शिष्यांसी । सांगते झाले परियेसीं ।
विश्र्वासेंकरोनि द्विज हर्षी । शुष्क काष्ठ सेवीतसे ॥ ११२ ॥
जैसा भाव तैसी सिद्धि । होईल सत्य त्रिशुद्धि ।
श्रीगुरुनाथ कृपानिधि । सहज निघाले संगमासी ॥ ११३ ॥
जाऊनि करिती अनुष्ठाना । पहावया येती त्या ब्राह्मणा ।
देखोनि त्याचे अंतःकरणा । प्रसन्न झाले तयेवेळी ॥ ११४ ॥
हातीं होता कमंडळ । भरलें सदा गंगाजळ ।
उचलोनियां करकमळें । घालिती उदक काष्ठासी ॥ ११५ ॥
तत्क्षणी काष्ठासी । पल्लव आले परियेसीं ।
औदुंबर वृक्ष ऐसी । दिसतसे समस्तांते ॥ ११६ ॥
जैसा चिंतामणिस्पर्श होतां । लोखंड होय कांचनता ।
तैसा श्रीगुरुसुता स्पर्शतां । काष्ठ झाला वृक्ष देखा ॥ ११७ ॥
काष्ठ दिसे औदुंबर । सुदेही जाहला तो विप्र ।
दिसे सुवर्णदेही नर । गेलें कुष्ठ तात्काळीं ॥ ११८ ॥
संतोषोनि द्विजवर । करी साष्टांग नमस्कार ।
करीतसे ‘ महास्तोत्र ‘ श्रीगुरुचें तये वेळीं ॥ ११९ ॥
इंदुकोटितेज करुण-सिंधु भक्तवत्सले ।
नंदनात्रिसूनु दत्त, इंदिराक्ष श्रीगुरुम् ।
गंधमाल्याक्षतादि-वृंददेववंदितम् ।
वन्दयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम ॥ १२० ॥
मायपाश-अंधकारछायदूरभास्करं ।
आयताक्ष पाहि श्रियावल्लभेश-नायकम् ।
सेव्य भक्तवृदं वरद, भूय भूय नमाम्यहं ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ १२१ ॥
चित्तजादिवर्गषट्क-मत्तवारणांकुशम् ।
तत्त्वसारशोभितात्मदत्त श्रियावल्लभम् ।
उत्तमावतार भूत-कर्तृ भक्तवतसलं ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ १२२ ॥
व्योमरापवायुतेज-भूमिकर्तुमीश्र्रम् ।
कामक्रोधमोहरहित सोमसूर्यलोचनम् ।
कामितार्थदातृ भक्त-कामधेनु श्रीगुरुम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ १२३ ॥
पुंडरिक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् ।
चंडदुरितखंडनार्थ दंडधारि श्रीगुरुम् ।
मंडलीकमौलिमार्तंडभासिताननम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ १२४ ॥
वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्तिश्रीगुरुम् ।
नादबिंदुकलातीत, कल्पपादसेव्ययम् ।
सेव्यभक्तवृंदवरद भूय भूय नमाम्यहम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ १२५ ॥
अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्ट ज्ञानवारिधिम् ।
कृष्णावेणितीरवास-पंचनदीसंगमम् ।
कष्टदैन्यदूरिभक्त-तुष्टकाम्यदायकम् ।
वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ १२६ ॥
नारसिंहसरस्वती-नाम अष्टमौक्तिकम् ।
हारकृत शारदेन गंगाधर-आत्मजम् ।
धारणीक-देवदीक्ष गुरुमूर्तितोषितम् ।
परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥ १२७ ॥
नारसिंहसरस्वतीय अष्टकं च यः पठेत् ।
घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् ।
सारज्ञानदीर्घआयुरोग्यादिसंपदम् ।
चारुवर्गकाम्यलाभ वारंवार यज्जपेत् ॥ १२८ ॥
स्तोत्र केलें येणेपरी । आणिक विनवी परोपरी ।
म्हणे देवा श्रीहरी । कृपा केली स्वामिया ॥ १२९ ॥
म्हणोनि मागुती नमस्कारी । श्रीगुरुनाथ अभयकरीं ।
उठविताति आवधारी । ज्ञानराशि म्हणोनियां ॥ १३० ॥
समस्त लोक विस्मय करिती । श्रीगुरुतें नमस्कारिती ।
नानापरी स्तुति करिती । भक्तिभावेंकरुनियां ॥ १३१ ॥
मग निघाले मठासी । समस्त शिष्यद्विजांसरसीं ।
ग्रामलोक आनंदेंसी । घेऊनि येती आरतिया ॥ १३२ ॥
जाऊनियां मठांत । शिष्यांसहित श्रीगुरुनाथ ।
समाराधना असंख्यात । जाहली ऐका तयादिनीं ॥ १३३ ॥
तया विप्रा बोलवोनि । श्रीगुरु म्हणती संतोषोनि ।
कन्या-पुत्र-धन-गोधनीं । तुझी संतति वाढेल ॥ १३४ ॥
तुझें नाम ‘ जोगेश्र्वर ‘ । म्हणोनि ठेविलें निर्धार ।
समस्त शिष्यांमध्यें थोर । तूंचि आमुचा भक्त जाण ॥ १३५ ॥
वेदशास्त्रीं संपन्न । तुझ्या वंशोवंशी जाण ।
न करीं चिंता म्हणोन । निरोप देती तयावेळीं ॥ १३६ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । जावोनि आणीं कलत्रपुत्रासी ।
तुम्हीं रहावें आम्हांपाशीं । येचि ग्रामीं नांदत ॥ १३७ ॥
तूंतें होतील तिघे सुत । एकाचें नांव ‘ योगी ‘ ख्यात ।
आमुची सेवा करील बहुत । वंशोवंशी माझे दास ॥ १३८ ॥
म्हणोनि तया द्विजासी । करी मंत्र उपदेशी ।
‘ विद्यासरस्वती ‘ ऐशी । मंत्र दिल्हा परियेसी ॥ १३९ ॥
जैसें श्रीगुरुंनी निरोपिलें । तयापरी त्यासी जाहलें ।
म्हणोनि सिद्धें सांगितलें । नामधारक शिष्यासी ॥ १४० ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्र विस्तार ।
उतरावया पैलपार । कथा ऐका एकचित्तें ॥ १४१ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
शुष्ककाष्ठसंजीवनं नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 39
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 41
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.