गुरुचरित्र अध्याय 36 भाग 3
अन्नकाम अनामिकेसीं । तर्जनी काम्य-मुक्तीसी ।
जे लाविती नखेसीं । महापातक घडे तयां ॥ २२१
उत्तम रुंदी दशांगुलीं । मध्यम नव अष्ट अंगुलीं ।
सप्त सहा पंचांगुलीं । शूर्पाकार लावावें ॥ २२२ ॥
चतुर्थ त्रीणि द्वयांगुलीं । अधम पक्ष असे बोली ।
द्वादश नामें करा भलीं । विष्णुनाम उच्चारित ॥ २२३ ॥
केशव म्हणावें ‘ ललाट ‘ स्थानीं । नाभीं ‘ नारायण ‘ म्हणोनि ।
‘ माधव ‘ नामें हृदयस्थानीं । कमळपुष्पाकार देखा ॥ २२४ ॥
‘ गोविंद ‘ नामें कंठेसी । ‘ विष्णु ‘ नाभिं-दक्षिणेसी ।
दक्षिण भुजा ‘ मधुसूदने ‘ सी । दक्षिणकर्णी ‘ त्रिविक्रम ‘ ॥ २२५ ॥
‘ वामन ‘ नाभि-वामी देखा । ‘ श्रीधर ‘ वामबाहुका ।
‘ हृषीकेश ‘ वामकर्णिका । ‘ पद्मनाभ ‘ पश्र्चिमकटीं ॥ २२६ ॥
‘ दामोदर ‘ शिखास्थान । ऐका ऊर्ध्वपुंड्र विधान ।
पापें जातीं जळोन । गोपींचदन लावितां ॥ २२७ ॥
द्वारावती लावोनि । लावा भस्म त्रिपुंड्रांनीं ।
हरिहर संतोषोनि । भुक्ति मुक्ति साधे देखा ॥ २२८ ॥
विवाहादि शोभन-दिवसीं । देवताकृत्य-श्राद्धदिवसीं ।
अभ्यंगानंतर सूतकेसी । गोपीचंदन वर्जावें ॥ २२९ ॥
ब्रह्मयज्ञतर्पणासी । कुश सांगेन विस्तारेंसीं ।
आहेति दश प्रकारेंसीं । नामें सांगेन विख्यात ॥ २३० ॥
दूर्वा उशीर कुश काश । सकुद गाधूम व्रीहि मौंजीष ।
नागरमोथा भद्रमुस्ता परियेसा । दश दर्भ मुख्य असती ॥ २३१ ॥
नित्य आणावें दूर्वेसी । जरी न साधे आपणासी ।
श्रवण-भाद्रपद-अमेसी । संग्रह संवत्सरीं करावा ॥ २३२ ॥
चारी दुर्वा विप्रासी । त्रीणि जाणा क्षत्रियासी ।
द्वय दूर्वा वैश्यासी । शूद्रें एक धरावी ॥ २३३ ॥
या दूर्वेची महिमा । सांगतां असे अनुपमा ।
अग्रस्थानीं असे ब्रह्मा । मूळीं रुद्र मध्यें हरि ॥ २३४ ॥
अग्रभागीं चतुरंगलें । ग्रंथिमूळीं द्वयांगुलें ।
धारण करावें ब्रह्मकुळें । याची महिमा थोर असे ॥ २३५ ॥
चक्र धरोनि विष्णु देखा । दैत्य पराभवी ऐका ।
ईश्र्वर त्रिशूल धरितां देखा । राक्षसांतक जेवीं होय ॥ २३६ ॥
इंद्र वज्रायुध धरितां । दैत्यगिरी विभांडी तत्त्वतां ।
तैसे ब्राह्मण दूर्वा धरितां । पापदुरिता पराभवती ॥ २३७ ॥
जैसे तृणाचे पर्वतासी । अग्निस्पर्श होतां कैशी ।
तेवीं असलिया पापराशि । दर्भस्पर्शें जळती देखा ॥ २३८ ॥
ब्रह्मयज्ञ-जपसमयीं । ग्रंथि न बांधावी कुशद्वयीं ।
वर्तुळाकार भोजनसमयीं । धरावी ब्राह्मणें भक्तीनें ॥ २३९ ॥
कर्म आचरतां दूर्वेसीं । ग्रंथि बांधावी परियेसीं ।
अग्निस्पर्श कापुसासी । पाप नाशी येणेंपरी ॥ २४० ॥
एकादशांगुल प्रादेशमात्र । द्विदल असावें पवित्र ।
नित्य-कर्मासि हेंच पात्र । द्विदल जाणा मुख्य असे ॥ २४१ ॥
जपहोमादि दानासी । स्वाध्याय-पितृकर्मासी ।
सुवर्ण-रजतमुद्रिकेसीं । कुशावेगळें न करावें ॥ २४२ ॥
देवपितृकर्मासी देख । रजत करावें सुवर्णयुक्त ।
तर्जनीस्थानीं रौप्यमुद्रिका । सुवर्ण धरावें अनामिकेसी ॥ २४३ ॥
मुद्रिका असावी खड्गपात्री । कनिष्ठिकांगुलीं पवित्रीं ।
ग्राह्य नव्हे जिवंतपित्री । तर्जनीअंगुलीं मुद्रिका ॥ २४४ ॥
योगपट्ट-उत्तरी देखा । तर्जनीस्थानीं रौप्यमुद्रिका ।
पायीं न घालाव्या पादुका । गयाश्राद्ध न करावें ॥ २४५ ॥
नवरत्न-मुद्रिका ज्याचे हातीं । पापें त्यासी न लागती ।
एखादें रत्न जरी असे हातीं । मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी ॥ २४६ ॥
प्रातःसंध्येचें विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
नक्षत्रें असतांचि प्रारंभून । अर्घ सूर्योदयीं द्यावें ॥ २४७ ॥
सूर्योदय होय तंव । जप करीत उभें असावें ।
उदयसमयीं अर्घ्य द्यावें । तत्पूर्वी देणें सर्व व्यर्थ ॥ २४८ ॥
ऋषि पुसती पराशरासी । संध्या करावया विधि कैसी ।
विस्तारोनि सांगा आम्हांसी । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥ २४९ ॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासीं । सांगेन संध्याविधीसी ।
ऐका तुम्ही तत्परेसीं । पराशरस्मृतीं असे ॥ २५० ॥
गायत्रीमंत्र जप करितां । शिखा बांधावी त्वरिता ।
आसन घालोनि निरुता । चित्त दृढ करावें ॥ २५१ ॥
ब्राह्मतीर्थें त्रिराचमन । विष्णुनाम स्मरोन ।
प्राणायाम विस्तारोन । न्यासपूर्वक करावे ॥ २५२ ॥
प्रणवस्थानीं परब्रह्म-ऋषि । गायत्री-छंदासी ।
अग्नि-देवता परियेसीं । म्हणा ‘ प्राणायामे विनियोगः ‘ ॥ २५३ ॥
ॐ अं -नाभी, उं-दय । मं –मूर्धी स्पर्श अवयव ।
व्याहृति सप्त अतिशया । पृथक् देव ऋषि सांगेन ॥ २५४ ॥
व्याहृति सप्तै स्थानासी । ऐका असे प्रजापति-ऋषि ।
पृथक् देवता परियेसीं । सात नामें देवांची ॥ २५५ ॥
अग्नि-वायु-सूर्य-जीव । वरुण-इंद्र-विश्र्वेदेव ।
सप्त व्याहृती सात देव । छंदही सप्त सांगेन ॥ २५६ ॥
‘ गायत्री ‘ – ‘ उष्णिक ‘ – ‘ अनुष्टुप ‘ देखा । ‘ बृहती ‘ –पंक्ति पंचम ऐका ।
‘ त्रिष्टुप ‘ – ; ‘जगती ‘ –छंद विशेखा । प्राणायामे विनियोगः ॥ २५७ ॥
ॐ भूः —पादन्यास । भुवः —जानु’ सुवः–कटि विशेष ।
महः –नाभिस्थान स्र्पर्श । जनः –हृदय, तपः–कंठ ॥ २५८ ॥
सत्यं–भ्रुवललाट स्थान । गायत्र्यागायत्री–छंदासी म्हणा ।
सविता- देव, विश्र्वामित्र–ऋषि खुणा । प्राणायामे विनियोगः ॥ २५९ ॥
ॐ भूः-हृदयाय नमः । ॐ भुवः–शिरसे स्वाहा ।
ॐ सुवः –शिखायै वषट् । ॐ ‘ तत्सवितुर्वरेण्यं ‘–कवचाय हुं ॥ २६० ॥
ॐ ‘ भर्गोदेवस्य धीमहि ‘ –नेत्रत्रयाय वौषट् ।
‘ धियोयोनः प्रचोदयात् ‘ अस्त्राय फट् । ॐ भूर्भुवः स्वः’ इति दिग्बंधः ऐसे षडंग करावे ॥ २६१ ॥
प्राणायाम करावयासी । प्रजापति म्हणा ऋषि ।
देवतानामें परियेसीं । ब्रह्मा-अग्नि-वायु-सूर्य असे ॥ २६२ ॥
‘ प्रानायामे विनियोगः ‘ म्हणूनि । ‘ आपो ‘ स्तन स्पर्शोनि ।
‘ ज्योति ‘ नेत्रस्पर्श करुनि । ‘ रसो ‘ –जिव्हा, ‘ अमृतं ‘ –ललाट स्पर्शावें ॥ २६३ ॥
‘ ब्रह्मभूर्भुवः-स्वरोम् ‘ म्हणूनि । प्राणायाम करावे तीनि ।
त्रिपदा गायत्री जपे कोणी । जपणारासी सर्व सिद्धि ॥ २६४ ॥
या गायत्रीच्या अधिदेवता । ब्रह्मा-अग्नि-वायु-गभस्ता ।
ऋषि ब्रह्मा असे ख्याता । सप्तलोकन्यास सांगेन ॥ २६५ ॥
‘ पाद ‘ न्यास भूर्लोक । भुवः- ‘ जानु ‘ अतिविशेख ।
स्वः –गुह्य असे लोक । ‘ नाभि ‘ न्यास महर्लोक ॥ २६६ ॥
जनो–‘ हृदय ‘ , तपो –‘ ग्रीवे ‘ । भ्रुवोर्ललाटे– सत्यलोक म्हणावें ।
असे शिरस्थान बरवें । सत्यलोक म्हणती तयासी ॥ २६७ ॥
गायत्रीची प्रार्थना करुनि । प्राणायाम करा विधीनीं ।
ब्रह्मचारी गृहस्थांनी । पंचांगुलीं धरा परमेष्ठी ॥ २६८ ॥
वानप्रस्थ -संन्यासीं । अनामिका – कनिष्टिकांगुष्टेंसीं ।
ओंकारादि वायुपूरकेंसीं । दक्षिणनासापुटें चढवावें ॥ २६९ ॥
वामनासापुटीं विसर्जोनि । करा प्राणायाम तीनि ।
येणेंचि विधीं करा मुनि । त्रिकाळींचे संध्या कर्म ॥ २७० ॥
आतां करा मार्जनासी । सांगेन ऐका समस्त ऋषि ।
जैसें असे स्मृतिचंद्रिकेसी । तेणें विधीं सांगतो ॥ २७१ ॥
‘ आपोहिष्टे ‘ ति सूक्तस्य । सिंधुद्वीप-ऋषि, गायत्री-छंदेसीं ।
‘ आपोदेवता ‘ मार्जनासी । हा म्हणावा विनियोग ॥ २७२ ॥
‘ आपोहिष्ठा ‘ ऐसे मंत्र म्हणोन । कुशपवित्रें करा मार्जन ।
‘ यस्य क्षयाय ‘ मंत्रानें । आपुले पाद प्रोक्षावे ॥ २७३ ॥
‘ आपोजनयथा ‘ मंत्रेसीं । प्रोक्षावें आपुल्या शिरसीं ।
‘ सूर्यश्र्चे ‘ ति-मंत्रेसीं । उदक प्राशन करावें ॥ २७४ ॥
आचमनें करोनि दोनी । ‘ दधिक्राव्णो ‘ मंत्र जपोनि ।
करा मार्जन तुम्ही तीनि । पुनरपि ‘ आपोहिष्ठा-‘ म्हणा ॥ २७५ ॥
‘ हिरण्यवर्ण ‘ सूक्तेसीं । मार्जन करावें परियेसीं ।
‘ द्रुपदादिवेति ‘ मंत्रेसीं । घ्राणोनि उदक सांडा वामीं ॥ २७६ ॥
मार्जन करावयाचें विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
वामहस्तीं पात्र धरुन । मार्जन करा विशेषीं ॥ २७७ ॥
औदुंबर-सुवर्ण-रजत । काष्ठपात्र असे पवित्र ।
ऐसें पात्र न मिळे यत्र । वामहस्तीं उदक घ्यावें ॥ २७८ ॥
मृण्मय अथवा द्विमुख पात्र । भिन्न भांडें त्यजा अपवित्र ।
अग्राह्य वर्जा देवपितरां । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ २७९ ॥
मार्जनसंख्या सांगेन ऐका । शिरसीं अष्ट, पादीं नवका ।
‘ यस्यक्षयाय ‘ स्थान भूमिका । येणेंपरी मार्जन ॥ २८० ॥
‘ आपः पुनंतु ‘- मंत्रेसीं । प्राशन करावें माध्याह्नेसी ।
‘ अग्निश्र्चे ‘ ति -मंत्रेसी । संध्याकाळीं करावें ॥ २८१ ॥
प्राशनांती तुम्ही ऐका । द्विराचमन करा निका ।
आघ्राणूनि उदक सांडोनि देखा । एक आचमन करावें ॥ २८२ ॥
अर्घ्य द्यावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
गोशृंगाइतके उंच करुन । अर्घ्य द्यावें मनोभावें ॥ २८३ ॥
गायत्रीमंत्र जपोनि । सायंप्रातर्द्यावीं तीनी ।
‘ हंसः शुचिषन् ‘ मंत्रेसीं माध्याह्नीं । अर्घ्य द्यावें अवधारा ॥ २८४ ॥
प्रातर्माध्याह्नीं उभें बरवें । सायं अर्घ्य बैसोनि द्यावें ।
आचमन त्रिवार करावें । करा प्रदक्षिणा ‘ असावादित्य ‘ ॥ २८५ ॥
अर्घ्य द्यावयाचें कारण । सांगेन कथा विस्तारोन ।
राक्षस मंदेह दारुण । तीस कोटि आहेति देखा ॥ २८६ ॥
सूर्यासवें युद्धासी । नित्य येती परियेसीं ।
संदेह पडे देवांसी । सूर्या होईल अपजय ॥ २८७ ॥
अपजय होतां सूर्यासी । उदय-अस्तमान नव्हे परियेसीं ।
कर्मे न चालती ब्राह्मणांसी । स्वाहा-स्वधाकार न चाले ॥ २८८ ॥
स्वाहा-स्वधाकार रहाती । समस्त देवांस उपवास घडती ।
सृष्टि राहील नव्हे उत्पत्ति । म्हणोनि उपाय रचियेला ॥ २८९ ॥
याचि कारणें अर्घ्यें देती । तींचि वज्रायुधें होतीं ।
जावोनि दैत्यांसी लागतीं । पराभविती प्रतिदिवसीं ॥ २९० ॥
दैत्य असती ब्रह्मवंश । त्यांसी वधिलिया घडती दोष ।
प्रदक्षिणा करितां जाती दोष । ‘ असावादित्य ‘ म्हणोनियां ॥ २९१ ॥
ब्रह्महत्येचे पापासी । भूप्रदक्षिणा दोष नाशी ।
चारी पावलें फिरतां कैसी । भूप्रदक्षिणा पुण्य असे ॥ २९२ ॥
संध्या करावयाचें स्थान । सांगेन ऐका फलविधान ।
घरीं करितां प्रतिदिन । एकचि फळ अवधारा ॥ २९३ ॥
दश फळ ग्रामाबाहेर देखा । नदीस केलिया शतफल ऐका ।
पुष्करतीर्थीं सहस्त्र एक । गंगा-सुरनदीं कोटिफल ॥ २९४ ॥
सुरापान दिवामैथुन । अनृतवाक्यादि पाप जाण ।
संध्या बाहेर करितां क्षण । जळतीं पापें प्रत्यक्ष ॥ २९५ ॥
स्थानें असती जप करावयासी । विस्तारें सांगेन तुम्हांसी ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । एकचित्तें परियेसा ॥ २९६ ॥
जप केलिया घरीं ऐका । एकचि फल असे निका ।
बाहेर द्विगुण फल अधिका । नदीसी त्रिगुण फळ असे ॥ २९७ ॥
गोष्ठ वृंदावनीं देखा । दशगुण फळ आहेति अधिका ।
अग्निहोत्रादि स्थानीं निका । शताधिक फलें असती ॥ २९८ ॥
तीर्थ-देवतासन्निधानीं । सहस्त्रफल असे निर्गुणी ।
शतकोटि फल परिसन्निधानी । ईश्र्वरसन्निधानीं अनंत फळ ॥ २९९ ॥
जप करितां आसनासी । विधिनिषेध आहेति कैसी ।
सांगेन ऐका तात्पर्येसीं । पुण्य पाप बोलिलें असे ॥ ३०० ॥
भिन्नकाष्ठासनीं बैसोनि जरी । जप करिती मनोहरी ।
दुःख होय त्यास अपारीं । तृणीं भाग्य यश जाय ॥ ३०१ ॥
पल्लवशाखांसी बसतां । सदा होय दुश्र्चित्तता ।
वंशासनीं दरिद्रता । पाषाणासनीं व्याधि होय ॥ ३०२ ॥
भस्मासनीं व्याधिनाश । कंबलासनी सुख परियेस ।
कृष्णाजिनीं ज्ञानप्रकाश । व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया ॥ ३०३ ॥
कुशासनीं वशीकरण । सर्व रोग अपहरण ।
पापें जातीं पळोन । आयुः प्रज्ञा अधिक होय ॥ ३०४ ॥
‘ ओं ‘ इत्येकाक्षर ब्रह्म- मंत्र । जपा तुम्हीं पवित्र ।
ध्यान करावें गायत्र । समस्त पापें हरती देखा ॥ ३०५ ॥
या गायत्रीची स्वरुपता । अभिनव असे वर्णितां ।
रक्तांगी वास रक्ता । हंसवाहन असे देखा ॥ ३०६ ॥
‘ अ–कारब्रह्माऽधिदेवता । चतुर्भुजा चतुर्वक्त्रा ।
कमंडलु अक्षसूत्रा । चाटु धरिला असे करीं ॥ ३०७ ॥
ऋग्वेद असे समागमीं । ‘ अग्निहोत्रफलमावाहयामि ‘ ।
मग ‘ आयातु वरदा देवी ‘ ‘ ओजोऽसि ‘ । म्हणावें ऐका ब्राह्मणानें ॥ ३०८ ॥
या मंत्रासी ऋषिदेवता । गायत्री-सदृश असे ख्याता ।
प्रातःसंध्या तुम्ही करितां । विधान तुम्हां सांगेन ॥ ३०९ ॥
विश्र्वदेवा-ऋषयः । गायत्री-देवता गायत्री-छंदः ।
गायत्र्यावाहने विनियोगः । हें प्रातःसंध्येसी म्हणावें ॥ ३१० ॥
सावित्री–देवता । सावित्री–छंदः ।
सावित्र्यावाहने विनियोगः । हें माध्याह्नसंध्येसी म्हणावे ॥ ३११ ॥
सरस्वती- देवता । सरस्वती–छंदः ।
सरस्वत्यावाहने विनियोगः । हें सायंसंध्येसी म्हणावें ॥ ३१२ ॥
प्रातःसंध्येचें ध्यान । सांगेन ऐका तुम्ही गहन ।
अभिभूरों गायत्री जाण । बालरुपिणी असे देखा ॥ ३१३ ॥
अकार ब्रह्मा दैवत खूण । सांगेन सर्व विस्तारोन ।
रक्तांगी रक्तवसन । हंसासनीं आरुढ असे ॥ ३१४ ॥
चतुर्बाहु चतुर्मुख । कमंडलु धरिला विशेख ।
अक्षसूत्र चाटुहस्तक । ऋग्वेदसहित अग्निहोत्र फळ ॥ ३१५ ॥
ऐसें ध्यान करोन । मग जपा अक्षरज्ञान ।
एकचित्तें करावें ध्यान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ३१६ ॥
ओंकार-शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥ ३१७ ॥
ऐसें म्हणोनि प्रातःकाळीं । संध्या करावी सुवेळीं ।
आतां सांगेन माध्याह्नकाळीं । ध्यान आवाहनपूर्वक ॥ ३१८ ॥
अभिभूरों सावित्री यौवन । माध्याह्नसंध्या ध्यान ।
सांगेन ऐका ऋषिजन । एकचित्तें परियेसा ॥ ३१९ ॥
श्र्वेतांगी श्र्वेतवस्त्र । वाहन वृषभ पवित्र ।
उ–कार रुद्रगण दैवत । पंचमुखा असे देखा ॥ ३२० ॥
वरद-अभयस्त निका । रुद्राक्षमाळा-त्रिशूलधारका ।
यजुर्वेदसहित देखा । अग्निष्टोम फल जाणा ॥ ३२१ ॥
ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषिनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । हिृयमावाहयामि ॥ ३२२ ॥
आतां सायंसंध्याध्यान । सांगेन ऐका विधान ।
एकचित्तें ऐका वचन । ध्यानपूर्वक सांगेन ॥ ३२३ ॥
अभिभूरों सरस्वती वृद्धा । जाणावी तुम्ही सांयसंध्या ।
कृष्णांगी कृष्णवस्त्रपरिधा । गरुडवाहन असे देखा ॥ ३२४ ॥
म–कार विष्णुदेवता । चतुर्भुज शंखचक्रधृता ।
गदापद्नधारणहस्ता । सामवेदसहित जाणा ॥ ३२५ ॥
वाजपेयफल जाणा । सायंसंध्या असे ध्यान ।
करावें तुम्हीं ब्राह्मण । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥ ३२६ ॥
ओंकार–शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥ ३२७ ॥
गायत्र्यागायत्री छंदः । प्रणवस्य अंतर्यामी ऋषिः ।
परमात्मा देवता परियेसीं । पंचशिर्षोपनये विनियोगः ॥ ३२८ ॥
उदात्तस्वरित स्वरः । शुक्लवर्णः ज्योतिःस्वरुपम् ।
सर्व देवमयं जगत्स्वरुप । अकार-उकार-मकाराणाम् ॥ ३२९ ॥
अग्निवायुसूर्या ऋषयः । गायत्री-त्रिष्टुप्-जगती-छंदासि ।
ब्रह्माविष्णुमहेश्र्वरा देवताः । ऋग्यजुःसामानि स्वरुपाणि ॥ ३३० ॥