You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 36 – श्री गुरुचरित्र अध्याय 36

Shri Guru Charitra Adhyay 36 – श्री गुरुचरित्र अध्याय 36

श्रीगुरुचरित्र अध्याय 36 भाग 2

आचार आम्ही आतां करीत । तेणें संशय मनीं होत ।
ब्रह्मऋषि तूं विख्यात । तुझा उपदेश आम्हां व्हावा ॥ १११ ॥

गुरुमुखाविणें मंत्र । ग्राह्य नव्हे, तो अपवित्र ।
आम्हां गुरु तूं पवित्र । आचार सर्व सांगावा ॥ ११२ ॥

पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन आचार परियेसीं ।
जेणें होय अप्रयासीं । सर्व सिद्धिपावती ॥ ११३ ॥

ब्राह्ममुहूर्ती उठोनि । श्रीगुरुस्मरण करोनि ।
मग ध्याव्या मूर्ती तिन्ही । ब्रह्मा-विष्णु-महेश्र्वर ॥ ११४ ॥

मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि केतूसह ।
सनत्कुमार-सनक-सनंदन सह । सनातन स्मरावे तये वेळीं ॥ ११५ ॥

सह नारद तुंबरु देखा । स्मरावे सिद्ध योगी ऐका ।
सप्त समुद्र असती देखा । स्मरावें सप्त पर्वतां ॥ ११६ ॥

सप्त ऋषींतें स्मरोनि । सप्त द्वीपें सप्त भुवनीं ।
समस्त नामकरणें घेऊनि । मग म्हणावें ” प्रातःस्मरामि ” ॥ ११७ ॥

मग उठावें शयनस्थानीं । आचमन करोनि दोनी ।
मूत्रशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावें ॥ ११८ ॥

पराशर म्हणे ऋषींसी । ऐका आचमन तुम्हांसी ।
सांगतसें विस्तारेसीं । जे जे समयीं करणें असे ॥ ११९ ॥

स्नानपूर्व अपर दोनी । उदक पितां येणेंचि गुणीं ।
निजतां उठतां समयीं दोनी । आचमनें करावी ॥ १२० ॥

भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई आलिया, शिंकलिया दोनी ।
लघुशंका शौचीं दोनी । आचमन करावें ॥ १२१ ॥

अघोवायुशब्द झालिया । वोखटें कांहीं दृष्टीं देखिलिया ।
दोन्ही वेळां आचमनूनियां । शुचि होय परियेसा ॥ १२२ ॥

जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन करा निर्धारीं ।
स्पर्शावें चक्षु श्रोत्रीं । येणें पवित्र परियेसा ॥ १२३ ॥

ब्राह्मणाचे उजवे कानीं । सप्त देवता असती निर्गुणी ।
त्यांसी स्पर्शितां तत्क्षणीं । आचमनफळ असे देखा ॥ १२४ ॥

(श्र्लोक) अर्ग्निरापश्र्च वेदाश्र्च वरुणार्केदुवायवः ।
विप्रस्य दक्षिणे कर्णे । नित्यं तिष्ठंति देवताः ॥१२५ ॥

(टिका) त्या देवतांचीं नावें ऐका । सांगेन ऋषि सकळिका ।
अग्नि आप वरुणार्का । वायु वेद चंद्र असती ॥ १२६ ॥

लघुशंकाऽचमन करोनी । तूष्णीं स्नान सुमनीं ।
बैसावे शुचि-आसनीं । अरुणोदय होय तंव ॥ १२७ ॥

गायत्रीजपाव्यतिरिक्त । वरकड जपावें आगमोक्त ।
मग होतां अरुणोदित । बहिर्भूमीसी जाइजे ॥ १२८ ॥

यज्ञोपवीत कानीं ठेवोनि । नैऋत्य दिशे जाऊनि ।
डोई पालव घेवोनि । अधोमुखीं बैसावें ॥ १२९ ॥

दिवसा बैसावें उत्तरमुखी । रात्रीं बैसावें दक्षिणमुखी ।
मौन असावें अति विवेकीं । चहूंकडे पाहूं नये ॥ १३० ॥

सूर्तचंद्रनक्षत्रांसी । पाहूं नये नदी आकाशीं ।
स्त्रीजन लोक परियेसीं । पाहूं नये कवणातें ॥ १३१ ॥

जो ब्राह्मण उभा मुती । त्याची ऐका कवण गति ।
त्याचे अंगीं रोम किती । तितुके दिवस नरकीं पडे ॥ १३२ ॥

शोचाविणें कांस घाली जरी । कांस न सोडितां लघुशंका करी ।
त्यासी होय यमपुरी । नरक भोगी अवधारा ॥ १३३ ॥

अगत्य घडे उदकावीण । करुनियां गंगास्मरण ।
मृत्तिकेनें शौच करणें । भक्षणादि वर्जावें ॥ १३४ ॥

बहिर्भूमि बैसावयासी । ठाव कैसा परियेसीं ।
ऐका तत्पर सर्व ऋषी । म्हणे पराशर ऋषेश्र्वर ॥ १३५ ॥

न बैसावें भूमीवरी । बैसिजे पानगवतावरी ।
हिरवें पान करावें दूरी । वाळल्या पर्णी बैसावें ॥ १३६ ॥

मलविसर्जन करुनि । उठावें ऐका ब्रह्मा धरुनि ।
जळपात्रापाशीं जाऊनि । शौच करावें परियेसा ॥ १३७ ॥

मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका नाणावी तुम्हीं ऐशी ।
वारुळ मूषकगृह परियेसीं । नदीमधील आणूं नये ॥ १३८ ॥

ज्या मार्गी लोक चालती । अथवा वृक्षाखालील माती ।
देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका आपण वर्जावी ॥ १३९ ॥

वापी-कूप-तडागांत । मृत्तिका आणिता पुण्य बहुत ।
उदक करीं घेऊनि प्रोक्षित । मृत्तिका घ्वावी शौचासी ॥ १४० ॥

आंवळ्याएवढे गोळे करावे । लिंगस्थानीं एक लावावें ।
अपानद्वारीं पांच स्वभावें । एकैक हस्तासी तीन सप्त ॥ १४१ ॥

एकैक पायासी सात गोळीं । मृत्तिका लावावी सकळीं ।
आणिक सांगेन समय काळीं । ऋषि समस्त परियेसा ॥ १४२ ॥

मृत्तिका शौचविधान । मूत्रशंकेसी एक गुण ।
बहिर्भूमीसी द्विगुण । मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥ १४३ ॥

मृत्तिकाशौच करावें । तोंवरी मौन आसावें ।
कोणीकडे न पहावें । नेम करावा येणेंपरी ॥ १४४ ॥

आणिक प्रकार असे एक । करावया नेम प्रमाणिक ।
जितुकें करी गृहस्थ देख । द्विगुण करावें ब्रह्मचारीं ॥ १४५ ॥

त्रिगुण करावें वानप्रस्थें । चतुर्गुण यतीं समस्तें ।
न्यूनाधिक न करा परतें । धर्मसिद्धि होय देखा ॥ १४६ ॥

येणें प्रकारें करा दिवसीं । रात्रीं याच्या अर्धेंसीं ।
संकटसमयीं तदर्धेंसीं । मार्गस्थ अर्ध त्याहुनी ॥ १४७ ॥

व्रतबंध झालिया ब्राह्मणास । हेचि आचार परियेस ।
चारी वर्णा हाचि उपदेश । शौचविधि बोलिला ॥ १४८ ॥

शौच केलियाउपरी । चूळ भरावे परिकरी ।
ब्राह्मण आठ वेळां भरी । क्षत्री सहा परियेसा ॥ १४९ ॥

वैश्य चार, शूद्र दोन वेळां । येणेंविधि भरा चुळा ।
समस्त ऐका ऋषिकुळा । म्हणे पराशर ऋषि ॥ १५० ॥

चूळ भरावें आठ वेळां । आचम्यावें तीन वेळां ।
शुद्धस्थानीं बैसून निर्मळा । कुळदैवत स्मरावें ॥ १५१ ॥

तूष्णीं आचमन करावें । नाम न घेतां वीस ठाव आतळावे ।
पुनः आचमन करावें । त्याचें विधान सांगेन ॥ १५२ ॥

विप्रदक्षिणतळहातीं । पांच तीर्थें विख्या असती ।
जें बोलिली असे स्मृति । तेंही आतां सांगेन ॥ १५३ ॥

अंगुष्ठमूळ-तळहातेसीं । ‘ ब्राह्मतीर्थ ‘ ‘अग्नितीर्थ ‘ परियेसीं ।
अंगुष्ठतर्जनी-मध्यदेशीं । ‘ पितृतीर्थ ‘ असे जाण ॥ १५४ ॥

चतुरंगतळवेवरी । ‘ देवतीर्थ ‘ असे निर्धारीं ।
कनिष्ठिकामागोत्तरीं । ‘ ऋषितीर्थ ‘ असे जाणा ॥ १५५ ॥

तर्पण देव-पितृ-ऋषि । जे ते स्थानतीर्थे करा हर्षी ।
आचमन ब्राह्मतीर्थेंसीं । करावें ब्रह्मविद्वजनें ॥ १५६ ॥

ब्राह्मतीर्थें आचमनें तीनी । ‘ केशव-नारायण-माधव म्हणोनि ।
देवतीर्थें उदक सोडोनि । ‘ गोविंद ‘ नाम उच्चारावें ॥ १५७ ॥

‘ विष्णु-मधुसूदन ‘ हस्त धुवोनि दोनी । ‘ त्रिविक्रम-वामन ‘ गाल स्पर्शोनि ।
बिंबोष्ठीं तळहस्त ठेवोनि । ‘ श्रीधर ‘ नाम ऊच्चारावें ॥ १५८ ॥

पुनरपि हस्त ‘ हृषीकेशी ‘ । ‘ पद्मनाभें ‘ पादस्पर्शी ।
सव्य हस्त पंचागुंलीसीं । ‘ दामोदरें ‘ शिरस्थानीं ॥ १५९ ॥

चतुरंगगुलपृष्ठेसीं । ‘ संकर्षण ‘ घ्राणेसी ‘ ।
तर्जनी-आदि अंगुष्ठेसीं । म्हणावा ‘ वासुदेव प्रद्युम्न ‘ ॥ १६० ॥

अंगुष्ठानामिकें ‘ अनिरुद्ध-पुरुषोत्तम ‘ नेत्रांसी । श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठकनिष्ठिकेसीं ।
‘ अधोक्षज-नारसिंह ‘ म्हणा ऐसी । ‘ अच्युतें ‘ नाभि, ‘ जनार्दनें ‘ हृदयस्पर्श ॥ १६१ ॥

पंचांगुलीं ‘ उपेन्द्र ‘ शिरसीं देखा । ‘ हरि-श्रीकृष्णें ‘ भुजांस ऐका ।
पांच-अंगुलीं विधिपूर्वका । येणेंविधि स्पर्शावें ॥ १६२ ॥

येणेंविधि संध्याकाळीं ।आणिक करावें वेळोवेळीं ।
अशक्य अथवा संकटकाळीं । आहेति विधानें तीं ऐका ॥ १६३ ॥

ब्राह्मतीर्थें तीन वेळां घ्यावें । हस्त प्रक्षाळा गोविंद-नांवें ।
मुख स्पर्शोनि मंत्र म्हणावे । संध्याव्यतिरिक्त येणेंविधि ॥ १६४ ॥

विधान आणिक सांगेन । देवतीर्थे उदक घेऊन ।
गोविंदनामें हस्त धुऊन । चक्षुःश्रोत्र स्पर्शावे ॥ १६५ ॥

शूद्रादि ओवळियासी । स्पर्श होतां परियेसीं ।
आचमन करा ऐसी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणातें ॥ १६६ ॥

भिजोनि आलिया पाउसांत । द्विराचमनें होय पुनीत ।
स्नान-भोजनांतीं निश्र्चित । द्विराचमन करावें ॥ १६७ ॥

फळाहार भक्षण करितां । अथवा आपण उदक घेतां ।
आला असेल स्मशान हिंडतां । द्विराचमनें शुद्ध होय ॥ १६८ ॥

आणिक असे एक परी । तूष्णीं आचमन करा निर्धारी ।
उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन करावें ॥ १६९ ॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचमनविधि आहे ऐसी ।
जे करिती भक्तीसीं । दैन्य कैंचें तया घरीं ॥ १७० ॥

आतां सांगेन विधान । करावयासी दंतधावन ।
समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा षष्ठी वर्जावी ॥ १७१ ॥

न करावें नवमीद्वादशीसी । शनि-अर्क-मंगळवारेसीं ।
श्राद्धकाळीं विवाहदिवसीं । करुं नये दंतधावन ॥ १७२ ॥

कंटकवृक्षशाखेसीं । ताड-हिंताड-केतकीसीं ।
खर्जूर-नारिकेळ-शाखेसीं । केलिया जन्म चांडाळयोनीं ॥ १७३ ॥

खदिर-करंज-आघाडेसीं । औदुंबर अर्क वट परियेसीं ।
अथवा वृक्ष करवंदेसीं । पुण्य वृक्ष असे ऐका ॥ १७४ ॥

विप्रा द्वादशांगुळेसीं । नवांगुळें क्षत्रियासी ।
षडांगुळें वैश्यशूद्रांसी । दंतधावन-काष्ट आणावें ॥ १७५ ॥

दंतधावन-काष्टेसी । तोडितां म्हणावें मंत्रासी ।
‘ आयुःप्रजा ‘ नाम परियेसीं । म्हणोनि काष्ट तोडावें ॥ १७६ ॥

दंतधावन करोनि ऐसें । काष्ट टाकावें नैऋत्य दिशे ।
चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावें ॥ १७७ ॥

मग करावें प्रातःस्नान । तेणे होय सर्व साधन ।
तेजोबलआयुष्यवर्धन । प्रातःस्नान केलिया ॥ १७८ ॥

प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ दैवत आपणा वश ।
सौभाग्य सुख पुष्टि हर्ष । दरिद्र-चिंता-शोकहरण ॥ १७९ ॥

नित्य केलिया पापनाश । करावें याचि कारणें हर्षें ।
गृहस्थ-वानप्रस्थें विशेंषें । प्रातर्मध्यान्हीं करावें ॥ १८० ॥

यतीं तापसीं संन्यासी । त्रिकाळ करावें परियेसीं ।
ब्रह्मचारीं विधिसीं । एकवेळ करावें ॥ १८१ ॥

अशक्य संकट जाहलें जरी । अथवा न मिळे निर्मळ वारी ।
स्नान करावयाची परी । सांगेन ऐक ब्राह्मणा ॥ १८२ ॥

अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावें वायुस्नान ।
मंत्रस्नान करावें विधीनें । ‘ आपोहिष्ठा ‘ मंत्रेसीं ॥ १८३ ॥

आणिक स्नानफळें असती । ज्यासी असेल भावभक्ति ।
गुरुदेवता-दर्शनमात्रीं । तीर्थस्नानफळ असे ॥ १८४ ॥

अथवा दर्शन-मातापिता । चरणतीर्थ भक्तीनें घेतां ।
अंगावरी प्रोक्षितां । तीर्थस्नानफळ असे देखा ॥ १८५ ॥

अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा राहोनि वारा घेत ।
किंवा बैसावें गोधुळींत । स्नानफळ असे देखा ॥ १८६ ॥

स्पर्श होतां चांडाळाचा । जलस्नानें होय शुचा ।
स्पर्श होतां शूद्राचा । उपस्नान करावें ॥ १८७ ॥

दृढ असतां देह आपुलें । स्नान मुख्य करावें जलें ।
संधि-विग्रह-सांकडे मांडले । उपस्नान करावें ॥ १८८ ॥

प्रातःस्नान करावयासी । शीतोदक उत्तम परियेसीं ।
अशक्य असेल देहासी । उष्णोदकें करावें ॥ १८९ ॥

स्वभावें पवित्र असे उदक । वरी झालिया अग्निसंपर्क ।
पवित्र झालें उदक अधिक । गृहस्थासी मुख्य असे ॥ १९० ॥

उष्णोदकें स्नान करितां । शीतोदक करा मिश्रिता ।
मध्यें करावें आचमन तत्त्वतां । संकल्प तेथें न म्हणावा ॥ १९१ ॥

घरीं स्नान करितां देखा । अघमर्षण तर्पण नव्हे निका ।
वस्त्र पिळूं नये ऐका । आपुले हस्तेंकरुनियां ॥ १९२ ॥

पुत्रोत्साहीं संक्रांतीसी । श्राद्धकाळीं मृतदिवसीं ।
न करावें स्नान उष्णोदकेसीं । पौर्णिमा-अमावास्येसी ॥ १९३ ॥

स्नान करितां बांधा शिखा । दर्भहातीं सूर्याभिमुखा ।
मौन स्नान असे मुख्या । कवणासवें न बोलावें ॥ १९४ ॥

‘ अपोहिष्ठेति ‘ मंत्रेसीं । गायत्री तीन म्हणा सुरसी ।
येणें मंत्रे स्नानोदकासी । अभिमंत्रावें ब्राह्मणें ॥ १९५ ॥

प्रथम शीतोदक घालूनि । पश्र्चात् उष्णोदक मिळवोनि ।
स्नान करावें प्रतिदिनीं । गृहस्थाश्रमीं घरीं देखा ॥ १९६ ॥

आचमन करुनि आपण । ‘ देवस्यत्वा ‘ मंत्र जपोन ।
धूत वस्त्र घेऊन । आणिक मंत्र जपावे ॥ १९७ ॥

‘ अवधूत ‘ मंत्र म्हणत । वस्त्र उकलावें त्वरित ।
‘ उदुत्यं- ‘ मंत्र म्हणत । वस्त्र सूर्यासी दाखवावें ॥ १९८ ॥

‘ आवहंतीवितन् ‘ मंत्रे । वस्त्र नेसावें पवित्र ।
द्विराचमन करावें तत्र । वस्त्र पिळोनि आचमन कीजे ॥ १९९ ॥

आतां मंत्रस्नान करणें । सांगेन त्याचीं विधानें ।
‘ आपोहिष्ठा ‘ दि मंत्रानें । प्रोक्षावें आपुले शरीरावरी ॥ २०० ॥

पाद-मूर्ध्नी-हृदयस्थानीं । मूर्ध्नी-हृदय-पाद प्रोक्षोनि ।
हृदय-पाद-शिरस्थानीं । ‘ आपोहिष्ठा ‘ दि मंत्रेसीं ॥ २०१ ॥

ऐेसें स्नान करोनि । पुनः आचमन करोनि ।
मानसस्नान विधानीं । करावें ऐका भक्तीनें ॥ २०२ ॥

नारायण-मूर्तीसी । ध्यान करावें भक्तीसीं ।
चतुर्भुजालंकारेसीं । ध्यान केलिया मानसस्नान ॥ २०३ ॥

‘ अपवित्रः पवित्रो वा– ‘ । येणें मंत्रें हरि ध्यावा ।
उदकें शरीर प्रोक्षावें । स्नानफळ असे अवधारा ॥ २०४ ॥

नदीतीरीं असे नरु । अशक्त असे शरीरु ।
स्मरण करुनि नदी निर्धारु । आर्दवस्त्रें अंग पुसावें ॥ २०५ ॥

मंगलस्नानविधान । सांगेन ऐका ब्राह्मण ।
रविवारीं निषेध जाण । ज्वर होय अंगासी ॥ २०६ ॥

कांतिहानि सोमवारासी । मंगलवारीं मृत्यु परियेसीं ।
लक्ष्मी पावे बुधवारेंसी । धनहानि होय गुरुवारीं ॥ २०७ ॥

शुक्रवारीं पुत्रघात । शनिवारीं अखिल संपत प्राप्त ।
जाणा तुम्हीं निश्र्चित । मंगलस्नान करावें ॥ २०८ ॥

नदीस्नान प्रवाहमुखी । घरी प्रातःपूर्वमुखी ।
संध्याकाळीं पश्र्चिममुखी । स्नान करावें अवधारा ॥ २०९ ॥

स्नान करितां नदीसी । अघमर्षण करावें परियेसीं ।
‘ नमोऽग्नयेऽप्सुमते ‘ मंत्रासीं । नमस्कारावें नदीतें ॥ २१० ॥

‘ यदपांक्रूरं ‘ मंत्रेसीं । उदक लोटावे द्विहस्तेसीं ।
तीन वेळा लोटोनि हषा । ‘ इमं मे गंगे ‘ जपावें ॥ २११ ॥

‘ ऋतं च सत्यं च ‘ मंत्र जपत । स्नान करावें गंगेंत ।
नदीस्नानविधिख्यात । करा तुम्ही विप्रवर्ग ॥ २१२ ॥

रोदनांतीं करुनि वांति । मैथुन-दुःस्वप्न-दर्शनांतीं ।
स्नानाविणें शुद्ध न होती । स्नान करावें अवधारा ॥ २१३ ॥

आतां वस्त्राचें विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
वस्त्र काषाय जाण । नेसूं नये गृहस्थानें ॥ २१४ ॥

रक्तादि वस्त्र जीर्ण अधौत । नेसूनि जें आचरत ।
तें पुण्य जाय राक्षसांप्रत । एक धोत्र असलिया ॥ २१५ ॥

श्र्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य असे परियेसीं ।
असावें उपवस्त्र बहिर्वासी । ‘ उपवस्त्र ‘ म्हणिजे तया ॥ २१६ ॥
धोत्र नेसलिया उपरी । विभूति लावावी परिकरी ।
मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण करावें ॥ २१७ ॥

भस्म शुद्ध न मिळे जरी । गोपीचंदन लावा परिकरी ।
द्वारावती मुख्य करीं । वरकड मृत्तिका अग्राह्य ॥ २१८ ॥

न मिळे द्वारावती देखा । करा धारण गंगामृत्तिका ।
ऊर्ध्वपुंड्र असे निका । विष्णुसायुज्य होय तयां ॥ २१९ ॥

पुष्टिकाम असे ज्यासी । लावावें तेणें अंगुष्ठेसीं ।
ज्यासी काम असे आयुषीं । मध्यांगुलीं लावावें ॥ २२० ॥

Leave a Reply