श्रीगणेशाय नमः ॥ नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
शिष्योत्तम नामकरणी । लागे सिद्धाचिये चरणीं ।
विनवीतसे कर जोडोनि । भक्तिभावेंकरुनियां ॥ १ ॥
जय जया सिद्ध मुनि । तूंचि तारक भवार्णी ।
तूंचि होसी ब्रह्मज्ञानी । अविद्यातिमिरभास्कर ॥ २ ॥
मायामोह-रजनींत । होतों आपण निद्रिस्त ।
कृपासागर श्रीगुरुनाथ । जागृत केलें आम्हांसी ॥ ३ ॥
तिमिरहरण भास्करु । मज भेटलासी तूं गुरु ।
कडे केला भवसागरु । चिन्मयात्मा सिद्ध मुनि ॥ ४ ॥
ऐसें म्हणोनि सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसीं ।
गुरुमूर्ति संतोषी । अभयंकार देतसे ॥ ५ ॥
पुढें चरित्र केवीं झाले । विस्तारावें स्वामी वहिलें ।
आमुतें स्वामी कृतार्थ केलें । ज्ञानामृत प्राशवूनि ॥ ६ ॥
कथामृत ऐकतां श्रवणीं । तृप्ति न होय अंतःकरणीं ।
निरोपावें विस्तारोनि । म्हणोनि चरणीं लागला ॥ ७ ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढील कथा असे निका ।
एकचित्तें तुम्हीं ऐका । ज्ञान होय समस्तांसी ॥ ८ ॥
गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा वाढला अपरांपरु ।
बोलतां असे विस्तारु । तावन्मात्र सांगतसों ॥ ९ ॥
महिमा एकेक सांगतां । विस्तार होईल बहु कथा ।
अवतार श्रीहरि साक्षाता । कवण शके वर्णावया ॥ १० ॥
तया गाणगापुरांत । होता विप्र वेदरत ।
विरक्त असे बहुश्रुत । कर्ममार्गें वर्ततसे ॥ ११ ॥
नेघें प्रतिग्रहो म्हणे । परान्नासी जावों नेणे ।
मिथ्यावाद मृषा भाषण । अतिवादे आपण न करीच ॥ १२ ॥
नित्य शुष्क भिक्षा करी । तेणें आपण उदर भरी ।
तयासी असे एक नारी । क्रोधवंती परियेसा ॥ १३ ॥
याचकवृत्ति तो ब्राह्मण । करी संसार सामान्यपणें ।
अतीत-अभ्यागताविणें । अन्न नेघे प्रत्यहीं ॥ १४ ॥
तया ग्रामीं प्रतिदिवसीं । विप्र येती आराधनेसी ।
सहस्र संख्या ब्राह्मणांसी । मिष्टान्न घालिती परियेसा ॥ १५ ॥
तया ग्रामी विप्रवनिता । समस्त जाती भोजनाकरितां ।
येऊनि सदनी स्तवित । अनेकपरीचीं पक्वान्नें ॥ १६ ॥
ऐकोनि ते विप्रनारी । नानापरी दुःख करी ।
परमेश्र्वरा श्रीहरी । म्हणोनि चिंती मनांत ॥ १७ ॥
कैसें दैव आपुलें हीन । नेणें स्वप्नीं ऐसें अन्न ।
दरिद्री पतीसी वरुन । सदा कष्ट भोगीतसें ॥ १८ ॥
पूर्वजन्मींचें आराधन । तैसा आपणासी पति हीन ।
सदा पाहें दरिद्रपणें । वर्ततसे देवराया ॥ १९ ॥
समस्त विप्र स्रियांसहित । नित्य परान्नभोजन करीत ।
पूर्वजन्मींचे सुकृत । केलें होतें सकळिकीं ॥ २० ॥
आपुला पति दैवहीन । कधीं नवचे परान्ना ।
काय करावें नारायणा । म्हणोनि चिंती मनांत ॥ २१ ॥
वर्ततां ऐसें तया स्थानीं । आला विप्र महाधनी ।
अपरपक्ष करणें मनीं । म्हणोनि आला परियेसा ॥ २२ ॥
तया स्थानीं विप्रांसी । क्षण दिले परियेसीं ।
सवें त्यांच्या स्रियांसी । आवंतिले परियेसा ॥ २३ ॥
देखोनि ते विप्रवनिता । पतीजवळी आली त्वरिता ।
सांगती झाली विस्तारता । आमंत्रण ब्राह्मणाचें ॥ २४ ॥
अनेकपरीचीं पक्वान्नें । देती वस्त्रें-परिधानें ।
अपार द्रव्य दक्षिणे । देताति ऐके प्राणेश्र्वरा ॥ २५ ॥
यातें स्वामी अंगीकारणें । अथवा आपणा निरोप देणें ।
कांक्षा करितें माझें मन । मिष्टान्न अपूर्व जेवावें ॥ २६ ॥
ऐकोनि तियेचे वचन । निरोप देत ब्राह्मण ।
सुखें जावें करीं भोजन । आपणा न घडे म्हणतसे ॥ २७ ॥
निरोप घेऊनि तये वेळीं । गेली तया गृहस्थाजवळी ।
आपण येऊं भोजनकाळीं । म्हणोनि पुसे तयासी ॥ २८ ॥
विप्र म्हणे तियेसी । आम्ही सांगूं दंपतीसी ।
बोलावीं आपुल्या पतीसी । तरीच आपुल्या गृहा यावें ॥ २९ ॥
ऐकोनि तयाचें वचन । झाली नारी खेदें खिन्न ।
विचार करी आपुले मनीं । काय करणें म्हणोनियां ॥ ३० ॥
आतां काय करावें म्हणे । कैसें दैव आपुलें उणे ।
बरवें अन्न स्वप्नीं नेणें । पतीकरितां आपणासी ॥ ३१ ॥
विचार करुनि मानसीं । आली नृसिंहगुरुपाशीं ।
नमन करी साष्टांगेसीं । अनेकपरी विनवीत ॥ ३२ ॥
म्हणे स्वामी एक करणें । बरवें अन्न कधीं नेणें ।
आपुल्या पतीसी सांगणें । आमंत्रणा जावें म्हणोनि ॥ ३३ ॥
सांगूं म्हणती दंपतीसी । माझा पति नायके वचनासी ।
न वचे कधीं परान्नासी । काय करुं म्हणतसे ॥ ३४ ॥
स्वामी आतां कृपा करणें । माझ्या पतीतें सांगणें ।
बरवीं येताति आमंत्रणें । अन्नवस्त्र देताति ॥ ३५ ॥
ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन ।
बोलावूनियां तत्क्षण । सांगती तया द्विजासी ॥ ३६ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । जावें तुवां आमंत्रणेसी ।
तुझे स्त्रियेचे मानसीं । असे मिष्टान्न जेवावें ॥ ३७ ॥
तिचे मनींची वासना । तुवां पुरवावी कारणा ।
सदा दुश्र्चित अंतःकरण । कुलस्त्रियेचें असूं नये ॥ ३८ ॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । नमन करी तो ब्राह्मण ।
विनवीतसे कर जोडून । नेघें परान्न नेम असे ॥ ३९ ॥
गुरुवचन जों न करी । तो पडे रौरवघोरीं ।
निरोप तुमचा माझ्या शिरीं । जाईन स्वामी म्हणतसे ॥ ४० ॥
पुसोनिया श्रीगुरुसी । आलें दंपत्य आमंत्रणासी ।
आनंद झाला बहुवसी । तया विप्रस्त्रियेंतें ॥ ४१ ॥
पितृनाम उच्चारोन । संकल्प करी तो ब्राह्मण ।
अनेकपरीचें मिष्टान्न । वाढिती तया दंपतींसी ॥ ४२ ॥
भोजन करित्या समयासी । दिसे विपरीत तियेसी ।
श्र्वान-सूकर येऊनि हर्षी । समागमें जेविताति ॥ ४३ ॥
कंटाळले तिचें मन । उठे आपण त्यजूनि अन्न ।
जेवीत होते जे ब्राह्मण । त्यां समस्तांसी सांगतसे ॥ ४४ ॥
ऐेसेपरी पतीसहित । आली नारी चिंता करीत ।
पतीस सांगे वृत्तांत । श्र्वानउच्छिष्ट जेविलेति ॥ ४५ ॥
स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण । तुझेनि आपुलें दैव हीन ।
घडलें आपणा परान्न । उच्छिष्ट श्र्वानसूकरांचे ॥ ४६ ॥
ऐसें कोपोनि स्त्रियेसी । आली दोघें श्रीगुरुपाशीं ।
नमन करी भक्तीसीं । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ४७ ॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । कैसें सुख परान्नासी ।
सदा दूषिसी पतीसी । पुरले तुझे मनोरथ ॥ ४८ ॥
ऐसें वचन ऐकोनि । लागे नारी श्रीगुरुचरणीं ।
विनवीतसे कर जोडूनि । क्षमा करणें स्वामिया ॥ ४९ ॥
मंदमति आपणासी । दोष घडविले पतीसी ।
नेलें आपण परान्नासी । क्षमा करणें स्वामिया ॥ ५० ॥
चिंता करी द्विजवरु । म्हणे स्वामी काय करुं ।
दोष घडला अपारु । व्रतभंग झाला म्हणोनि ॥ ५१ ॥
परान्न न घ्यावें म्हणोनि । संकल्प होता माझे मनी ।
मिळाली सती वैरिणी । दोष आपणा घडविले ॥ ५२ ॥
ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
पुरविली स्त्रियेची वासना । आतां तिचें मन धालें ॥ ५३ ॥
कधीं नवचे परान्नासी । वर्तेल तुझ्या वाक्यासरसीं ।
न करीं चिंता मानसीं । दोष तुज नाहीं जाण ॥ ५४ ॥
आणिक एक सांगेन तुज । जेणें धर्म घडती सहज ।
अडला असेल एखादा द्विज । दैवपितृकर्माविणें ॥ ५५ ॥
कोणी न मिळे विप्र त्यासी । जावें तेथें भोजनासी ।
जरी तेथें तूं न वचसी । अनंत दोष असे जाण ॥ ५६ ॥
श्रीगुरुचें वचन ऐकोन । विप्र सांष्टांगी करी नमन ।
विनवीतसे कर जोडून । विनंति माझी परियेसा ॥ ५७ ॥
अन्न घ्यावें कवणाचे घरीं । घडती दोष कवण्यापरी ।
जाऊं नये कवण्या द्वारीं । निरोपावें स्वामिया ॥ ५८ ॥
विप्रवचन ऐकोनि । श्रीगुरु सांगती विस्तारोनि ।
एकचित्त करुनि । ऐका श्रोते सकळिक ॥ ५९ ॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी । अन्न घ्यावयाची घरें पुससी ।
गुरुभुवनादिकीं हर्षीं । जेवावें शिष्यवर्गा-घरीं ॥ ६० ॥
वैदिकादि विद्वज्जन । मातुल अपुला श्र्वशुर जाण ।
सहोदरादि साधुजन–। गृहीं अन्न जेवावें ॥ ६१ ॥
अडला विप्र ब्राह्मणावीण । त्याचे घरी घ्यावें अन्न ।
करावें गायत्रीजपन । दोष नाहीं अवधारा ॥ ६२ ॥
विप्र म्हणे श्रीगुरुसी । विनंती माझी परियेसीं ।
निषिद्ध अन्न सांगा आम्हांसी । कवण्या घरीं जेवूं नये ॥ ६३ ॥
श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी । अन्नवर्जित घरें पुससी ।
अपार असे स्मृतिचंद्रेकेसी । क्रमेंकरुनि सांगेन ॥ ६४ ॥
नित्य मातापितयांशी । सेवा घेती अतिदोषी ।
जेवूं नये त्या सदनासी । धनलोभिष्ट द्विजांघरी ॥ ६५ ॥
कलत्र-पुत्र कष्टवोनि । धर्म करी ब्राह्मणजनीं ।
अन्न निषिद्ध तया भुवनीं । दोष घडती जेवलिया ॥ ६६ ॥
गर्विष्ठ चित्रिक शस्त्रधारी । विप्र होवोनि मल्लयुद्ध करी ।
वीणा-विद्या ज्याचे घरीं । न घ्यावें अन्न ब्राह्मणानें ॥ ६७ ॥
बहिष्कारी विप्राघरीं । याचकवृत्तीं उदर भरी ।
अन्न वर्जावें तया घरीं । आत्मस्तुति-परनिंदका ॥ ६८ ॥
बहुजन एक अन्न करिती । पृथक् वैश्र्वदेव न करिती ।
वर्जावें अन्न विप्रजातीं । महादोष बोलिजे ॥ ६९ ॥
गुरु होऊनि समस्तांसी । आपं मंत्र उपदेशी ।
शिष्य राहटे दुर्वृत्तीसीं । त्या गुरुघरी जेवूं नये ॥ ७० ॥
क्रोधवंत ब्राह्मण असे । अन्न न घ्यावें गृहीं ऐसे ।
स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे । जेवूं नये तया घरीं ॥ ७१ ॥
धनगर्वी तामसाघरीं । कृपण निर्दय व्यभिचारी ।
दांभिक दुराचारी विप्राघरीं । अन्न तुम्हीं वर्जावें ॥ ७२ ॥
पुत्र-पतीतें सोडोनि । वेगळी असे जे ब्राह्मणी ।
वर्जावें अन्न साधुजनीं । महादोष बोलिजे ॥ ७३ ॥
स्त्रीजित असे एखादा जरी । विप्र सुवर्णाकार करी ।
बहुयाजक निरंतरी । तया घरीं न जेवावें ॥ ७४ ॥
खळ-राजसेवकाघरीं । लोहकारसूचिका घरीं ।
वस्त्रधूत-रजकाघरीं । दान न घ्यावें ब्राह्मणें ॥ ७५ ॥
मद्य करी त्या नराघरीं । याचूनियां संचित करी ।
वेश्मीं सहजार असे नारी । दान विप्रें न घ्यावें ॥ ७६ ॥
तस्करविद्या असे ज्यासी । द्वारपाळघरा परियेसीं ।
न घ्यावें अन्न कुलालासी । महादोष बोलिजे ॥ ७७ ॥
द्रव्य घेऊनि शूद्राकरीं । अध्ययन सांगे द्विजवरी ।
अन्न वर्जावें तया घरी । घोडीं विकी जो ब्राह्मण ॥ ७८ ॥
भगवत्कीर्तन नाहीं घरीं । द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी ।
स्नानावीण भोजन करीं । तया घरीं जेवूं नये ॥ ७९ ॥
न करी संध्या संधिकाळीं । दान न करी कवणे वेळीं ।
पितृकर्मवर्जित कुळीं । तया घरीं न जेवावें ॥ ८० ॥
दंभार्थानें जप करी । अथवा काम्यरुपें जरी ।
द्रव्य घेवोनि जप करी । तया घरीं जेवूं नये ॥ ८१ ॥
ऋण देऊन एखाद्यासी । उपकार दावी परियेसीं ।
द्रव्य संचीत कळंतरेसीं । तया घरी जेवूं नये ॥ ८२ ॥
विश्र्वासघातकी नराघरीं । अनीति पक्षपात करी ।
स्वधर्म सांडी दुराचारी । पूर्वजमार्ग सोडिलिया ॥ ८३ ॥
द्विजोत्तम-साधूसी । एखादा करी द्वेषासी ।
अन्न वर्जावें तुम्हीं हरुषीं । ऐक ब्राह्मणा एकचित्तें ॥ ८४ ॥
कुळदैवत माता पिता । सोडोनि जाय जो परता ।
आपल्या गुरुसी निंदिता । जेवूं नये तया घरीं ॥ ८५ ॥
गोब्राह्मणवधका घरीं । स्त्रीवधू नर असे जरी ।
अन्न घेता दोष भारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ८६ ॥
आशाबद्ध असे नर । करुनि धरी एकाचें द्वार ।
दान देता वर्जी नर । तया घरी जेवूं नये ॥ ८७ ॥
समस्त यातींस शरण । तोचि चांडाळ होय जाण ।
घेऊं नये त्याचें अन्न । नमन न करी ब्राह्मणासी ॥ ८८ ॥
आपुल्या कन्याजामातासी । क्रोधेंकरुन सदा दूषी ।
न घ्यावें अन्न त्या घरासी । निपुत्राचे घरीं देखा ॥ ८९ ॥
विवाह झाला असतां आपण । पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण ।
‘ परपाकनिवृत्त ‘ नाम जाण । जेवूं नये तया घरी ॥ ९० ॥
यज्ञ पंचमहा करी आपण । जेवी आणिकाचे घरीं अन्न ।
‘ परपाकरत ‘ नर नाम जाण । तया घरीं जेवूं नये ॥ ९१ ॥
गृहस्थधर्में असे आपण । दान धर्म न करीं जाण ।
‘ अपच ‘ नाम तया जाण । जेवूं नये तया घरीं ॥ ९२ ॥
घरींचे अन्न दूषण करी । परान्नाची स्तुति अपारी ।
अन्न घेतां त्याच्या घरीं । अंधक होय अल्पायुषी ॥ ९३ ॥
बधिर होय शरीरहीन । स्मृतिमेधा जाय जाण ।
धृतिशक्ति होय हीन । भाणवसा घरीं जेवूं नये ॥ ९४ ॥
परगृही वसे आपण । परान्न जेवी जो ब्राह्मण ।
त्याचें जितुकें असे पुण्य । यजमानासी जाय देखा ॥ ९५ ॥
तया यजमानाचे दोष । लागती त्वरित भोजनस्पर्शें ।
याचिकारणें निषेध असे । परान्न तुम्हीं वर्जावें ॥ ९६ ॥
भूमिदान सुवर्णदान । गज-वाजी-रत्नदान ।
घेतां नाहीं महादूषण । अन्न घेतां अतिदोष ॥ ९७ ॥
समस्त दुष्कृतें परान्नासी । घडती देखा ब्राह्मणासी ।
तैसेंचि जाणा परस्त्रियेसी । संग केलिया नरक होय ॥ ९८ ॥
परगृहीं वास करितां । जाय आपुली लक्ष्मी त्वरिता ।
अमावास्येसी परान्न जेवितां । मासपुण्य जाय देखा ॥ ९९ ॥
अगत्य जाणें परान्नासी । न बोलवितां जाय सांजेसी ।
जातां होती महादोषी । शूद्रें बोलावितां जाऊं नये ॥ १०० ॥
आपुल्या कन्येच्या घरासी । जाऊं नये भोजनासी ।
पुत्र झालिया कन्येसी । सुखें जावें अवधारा ॥ १०१ ॥
सूर्यचंद्रग्रहणासी । अन्न घेऊं नये परियेसीं ।
जात अथवा मृतसतकेसी । जेवूं नये परियेसा ॥ १०२ ॥
ब्राह्मणपणाचा आचार । कवण रहाटे द्विजवर ।
तैसें जरी करिती नर । त्यांसी कैंचे दैन्य असे ॥ १०३ ॥
समस्त देव त्याचे हातीं । अष्ट महासिद्धि साधती ।
ब्राह्मणकर्में आचरती । कामधेनु तया घरीं ॥ १०४ ॥
विप्र मदें व्यापिलें । आचारकर्में सांडिलें ।
याचिकारणे दरिद्री झाले । स्वधर्मनष्ट होऊनि ॥ १०५ ॥
विप्र विनवी स्वामीसी । आमुची विनंति परियेसीं ।
आचारधर्म कैसी । निरोपावे दातारा ॥ १०६ ॥
गुरुमूर्ति कृपसागरु । त्रिमूर्तीचा अवतारु ।
भक्तजनांचा तूं आधारु । निरोपावे आचार स्वामिया ॥ १०७ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । ब्राह्मणाचा आचार पुससी ।
सांगेन ऐक विस्तारेसीं । पूर्वी ऋषि आचरले जो ॥ १०८ ॥
नैमिषारण्यीं समस्त ऋषि । तप करिती बहुवसी ।
आला तेथें पराशर ऋषि । म्हणोनि समस्त वंदिती ॥ १०९ ॥
समस्त ऋषि मिळोन । विनविताति कर जोडून ।
ब्राह्मणपणाचें आचरण । केवीं करावें म्हणोनि ॥ ११० ॥