श्रीगुरुचरित्र अध्याय 35 भाग 3
आणिक संतोषोनि मागुतीं । वस्त्रें वाहनें अतिप्रीतीं ।
तुरंग दिल्हा मनोगती । सवें देत कुमर आपुला ॥ २२७ ॥
चंद्रागदकुमरासी । तक्षकें दिधलें अतिहर्षी ।
निरोप दिल्हा मनोगती । सवें देत कुमर आपुला ॥ २२८ ॥
तक्षकातें नमूनि त्वरित । चंद्रांगद वारुवरी चढत ।
मनोवेगें मार्ग क्रमित । नागकुमर सवें असे ॥ २२९ ॥
जयें स्थानीं बुडाला होता । पावला तेथें क्षण न लागतां ।
निघाला बाहेर वारुसहिता । नदीतटीं उभा असे ॥ २३० ॥
सोमवार असे ते दिवसीं । सीमंतिनी आली स्नानासी
होत्या सखिया सवेंसी । त्याही मिळोनि नदीतीरीं ॥ २३१ ॥
सीमंतिनी म्हणे सखियांसी । आश्र्चर्य जाहलें पहा कैसी ।
उदकांतुनी निघाला परियेंसी । सवें असे नागकुमर ॥ २३२ ॥
राक्षस होईल वेषधारु । रुप धरिलें असे नरु ।
दिसतसे मनोहरु । तुरंगारुढ जाहला असे ॥ २३३ ॥
कैसे पहा वो रुप यासी । जैसा सूर्य प्रकाशी ।
दिव्यमालांबरें कैसी । सुगंध असे परिमळ ॥ २३४ ॥
दश योजनेंपर्यंत । वास येतो अतिप्रीत ।
पूर्वी देखिली असे स्वरुपता । दिसतसे परियेसा ॥ २३५ ॥
स्थिर स्थिर भीत भीता । पाहे त्याची स्वरुपता ।
आपुला पतीसादृश्य म्हणतां । रुप आठवी तये वेळी ॥ २३६ ॥
राजकुमर पाहे तिसी । म्हणे रुपें माझी वधूऐसी ।
गळसरी न दिसे कंठासी । हार न दिसती मुक्ताफळांचे ॥ २३७ ॥
अवलोकीतसे अंगखूण । न दिसे हळदी करकंकण ।
चिंताव्याकुळ रुपहीन । सादृश्य दिसे प्राणेश्र्वरी ॥ २३८ ॥
मनीं विचारी मागुता । रुप तिचें आठवीत ।
तुरंगावरुनि उतरत । नदीतीरीं बैसला ॥ २३९ ॥
बोलावोनि सीमंतिनीसी । पुसतसे अतिप्रियेसी ।
तुझा जन्म कवण वंशीं । पुरुष तुझा कवण सांग ॥ २४० ॥
कां कोमाइलीस बाळपणीं । दिससी शोकलक्षणी ।
सांगावें आम्हां विस्तारुनि । अति स्नेहें पुसतसे ॥ २४१ ॥
ऐकोनि सीमंतिनी देखा । आपण न बोलें लाजें ऐका ।
सखियांतें म्हणे विवेका । सांगा आमुचा वृत्तांत ॥ २४२ ॥
सखिया सांगती तयासी । हिचें नाम सीमंतिनी परियेंसी ।
चंद्रांगदाची महिषी । चित्रवर्म्याची हे कन्या ॥ २४३ ॥
इचा पति अतिसुंदर । चंद्रागद नाम थोर ।
जळक्रीडा करितां पार । बुडाला येथें अवधारा ॥ २४४ ॥
तेणें शोक करितां इसी । वैधव्य आलें परियेंसीं ।
दुःख करितां तीन वर्षी । लावण्यपण ऐसें जाहलें ॥ २४५ ॥
करी सोमवारव्रत । उपवासेंसीं आचरत ।
म्हणोनि आजि स्नानानिमित्त । आली असे नदीसी ॥ २४६ ॥
इच्या श्र्वशुराची स्थिति ऐका । पुत्रशोक करितां दुःखा ।
राज्य हिरतले दायादिका । कारागृहीं घातलें असे ॥ २४७ ॥
तयाकारणें सीमंतिनी । पूजा करी शूलपाणि ।
सोमवार उपोषणी । म्हणोनि करी परियेसा ॥ २४८ ॥
इतकें सखिया सांगती । मग बोले आपण सीमंती ।
तुम्ही कवण पुसतां आम्हांप्रती । कंदर्परुप तुम्हां असे ॥ २४९ ॥
गंधर्व किंवा तुम्ही देव । किन्नर अथवा सिद्धसाधव ।
नररुप असां मानव । आमुतें पुसतां कवण कार्या ॥ २५० ॥
स्नेहभावेंकरुनि । पुसतां तुम्ही अति गहनी ।
पूर्वी देखिलें होतें नयनीं । न कळे खूण म्हणतसे ॥ २५१ ॥
आप्तभाव माझे मनीं । स्वजन ऐसे दिसतां नयनीं ।
नाम कवण सांगा म्हणोनि । आठवीं रुप पतीचें ॥ २५२ ॥
आठवी पतीचें रुप । करुं लागली अति प्रलाप ।
पडली धरणीं रुदितबाष्प । महादुःख करीतसे ॥ २५३ ॥
स्त्रियेचें दुःख देखोनि । कुमार पाहे तटस्थपणीं ।
मुहूर्त एक सांवरोनि । आपण दुःख करीतसे ॥ २५४ ॥
दुःख करोनि कुमर देखा । प्रक्षाळण केलें आपुल्या मुखा ।
उगी राहें म्हणे ऐका । आपुलेम नाम ‘ सिद्ध ‘ म्हणे ॥ २५५ ॥
सीमंतिनी करितां शोक । जवळी आला राजकुमरक ।
हातीं धरुनि बाळिका । संबोखी तो प्रेमभावें ॥ २५६ ॥
एकांतीं सांगे तियेसी । म्हणे तुझ्या भ्रतारासी ।
देखिलें आम्हीं दृष्टीसीं । सुखें ऐस परियेसीं ॥ २५७ ॥
तुझे व्रतपुण्येंकरितां । शीघ्र येईल तुझा कांत ।
चिंता न करीं वो तूं आतां । तृतीय दिवशीं दर्शन घडे ॥ २५८ ॥
तुझा पति माझा सखा । माझा प्राण तोचि ऐका ।
संदेह न करीं वो बाळिका । सदाशिवाचे चरणाची आण ॥ २५९ ॥
ऐसें एकांतीं सांगून । प्रगट करुं नको म्हणून ।
दुःख आठवलें ऐकून । सीमंतिनी बाळिकेसी ॥ २६० ॥
सुटली धारा लोचनीं । शतगुण प्रेम नयनीं ।
विचार करीतसे मनीं । हाचि होय माझा पति ॥ २६१ ॥
सारिखें वाटे मुखकमळ । नयन सुंदर अति कोमळ ।
ध्वनि होय बोल चपल । हास्यमुखें बोलतसे ॥ २६२ ॥
मृदु वाक्य माझे पतीसी । तैसाचि बोलतो हर्षी ।
धरितां माझ्या करासी । अति मृदुपण लागलें ॥ २६३ ॥
माझ्या पतीचे लक्षण । मी जाणें सर्वही खूण ।
समस्त आहेति प्रमाण । हाचि होये प्राणनाथ ॥ २६४ ॥
यास देखतां माझे मन । विघरोनि, धारा सुटती नयन ।
नवल म्हणे विचारुन । मागुती अनुमान करीतसे ॥ २६५ ॥
दैवहीन असें आपण । कैचा येईल पति म्हणोन ।
बुडाला नदींत सिद्ध जाणोन । मागुती भ्रांति कैसी मज ॥ २६६ ॥
मेला पति ये मागुता । न ऐकों कानीं ऐसी कथा ।
स्वप्न देखिलें मीं भ्रांता । काय वसतसे माझे मनीं ॥ २६७ ॥
धूर्त होय कीं वेषधारु । राक्षस किंवा यक्ष किन्नरु ।
कपट वेषें आला नरु । म्हणोनि मनीं विचारीत ॥ २६८ ॥
किंवा होईल माझें व्रत । मुनिपत्नीनें सांगितले म्हणत ।
किंवा प्रसन्न गिरजानाथ । नवल नव्हे म्हणतसे ॥ २६९ ॥
ज्यासी प्रसन्न शंकर । त्यासी कैचा दुःखविकार ।
चिंतिलें पाविजे निर्धार । ऐसें योजी सीमंतिनी ॥ २७० ॥
ऐसें होतां राजकुमरु । आरुढ जाहलां आपण वारु ।
निरोप मागे प्रीतिकरु । सीमंतिनी नारीसी ॥ २७१ ॥
निघाला अश्र्व मनोवेगीं । पावला नगरा अतीशीघ्री ।
सवें पुत्रवासुगी । पाठवी तया नगरांत ॥ २७२ ॥
तुवां जावोनि वैरियांसी । सांगे इष्टतीं वादियांसी ।
न ऐकतां तुझे बोलासी । संहारीन म्हणावें ॥ २७३ ॥
ऐसें वचन ऐकोनि । पावला त्वरित राजभुवनीं ।
उभा राहोनि कठोर वचनीं । बोलतसे नगराधिपासी ॥ २७४ ॥
चला शीघ्र कुटुंबेसीं । चंद्रागदाचे भेटीसी ।
गेला होता पाताळासी । तक्षकाचे इष्टतीसी जाणा ॥ २७५ ॥
कालिंदीये नदींत । बुडाला वचन प्रख्यात ।
तुम्हीं केला स्वामीघात । राज्य हिरतले इंद्रसेनाचे ॥ २७६ ॥
आतां सांगेन तुम्हांसी । चाड असेल प्राणासी ।
शरण जावें शीघ्रेसीं । सिंहासनीं बैसवा इंद्रसेना ॥ २७७ ॥
तक्षकासारिखा मैत्र जाहला । तुमच्या करील अस्थिमाळा ।
शीघ्र चला चरणकमळा । चंद्रांगद-दर्शनासी ॥ २७८ ॥
नायकाल जरी माझें वचन । आतांचि घेईन तुमचे प्राण ।
तक्षकानें दिल्हें निरोपण । म्हणोनि आलों सांगातें ॥ २७९ ॥
ऐसें वचन ऐकोनि । दाईंजे विचारिती मनीं ।
आपण केली बुद्धि हीन । आतां शरण रिघावें ॥ २८० ॥
जरी करुं बलात्कार । तक्षक करील संहार ।
लोकांत होईल निंदा फार । प्राण जाईल, हानी असे ॥ २८१ ॥
ऐसें विचारुनि मानसीं । बाहेर काढिती इंद्रसेनासी ।
नाना वस्त्रें-आभरणेसीं । बैसविती सिंहासनीं ॥ २८२ ।
विनविताति तयासी । अपराध घडले आपणासी ।
प्राण राखावे आम्हांसी । म्हणोनि चरणीं लागती ॥ २८३ ॥
राया इंद्रसेनासी । तक्षकपुत्र सांगे हर्षी ।
तुमचा कुमर आला परियेसीं । वासुकीभेटीं गेला होता ॥ २८४ ॥
ऐकतां राजा संतोषी । आठविलें दुःख अधिकेंसी ।
मूर्च्छा येऊनि धरणीसी । पत्नीसहित पडियेला ॥ २८५ ॥
उठवी नागकुमर त्यासी । दुःख विसरा करा हर्षासी ।
येतो पुत्र भेटीसी । म्हणोनि सांगे उल्हासें ॥ २८६ ॥
ऐकोनि राजा अतिहर्षी । बोलावूनि सांगे मंत्रियांसी ।
नगर श्रृंगार करावयासी । निरोप दिला तये वेळीं ॥ २८७ ॥
ऐसा निरोप देऊन । भेटीसी निघाला आपण ।
समस्त निघाले दायाद अपण । राणीवसादिकरुनियां ॥ २८८ ॥
मंत्री पुरोहित देखा । समस्त निघाले नगरलोक ।
पाहों म्हणती कवतुक । मेला कुमर आला म्हणोनि ॥ २८९ ॥
आनंद झाला सकळिका । राजा मानी महासुखा ।
पाहीन म्हणोनि पुत्रमुखा । शीघ्र जातो अवधारा ॥ २९० ॥
सवें वाजंत्र्यांचा गजर । नगरलोकां संतोष थोर ।
करिताति जयजयकार । अत्योल्हास करिताति ॥ २९१ ॥
ऐसें जाऊनि पुत्रासी । आलिंगी राजा प्रीतीसीं ।
सद्गदित कंठेसी । नेत्रीं सुटल्या उदकधारा ॥ २९३ ॥
पुत्रासी म्हणे इंद्रसेन । आलासी बाळा माझा प्राण ।
शवपणें होतों तुजवीण । म्हणोनि सांगे दुःख आपुलें ॥ २९४ ॥
मातेसी आलिंगोन । दुःख करी अतिगहन ।
विनवीतसे संबोखोन । आपणानिमित्त कष्टलेति ॥ २९५ ॥
पुत्र नव्हे मी तुमचा शत्रु । जाऊनि आपुले सुखार्थु ।
दुःख दिधलें तुम्हां बहुत । नेदीच सुख तुम्हांसी ॥ २९६ ॥
आपण जावोनि पाताळीं । सुखें होतों शेषाजवळीं ।
तुम्ही कष्टलेति अवलीळी । मजनिमित्त अहोरात्रीं ॥ २९७ ॥
काष्ठासारखें अंतःकरण । पुत्राचे असे तुम्ही जाण ।
माताजीव जैसें मेण । पुत्रानिमित्त कष्ट बहु ॥ २९८ ॥
मातापितयांचे दुःख । जो नेणें तोचि मूर्ख ।
उत्तीर्ण व्हावया अशक्य । स्तनपान एक घडीचें ॥ २९९ ॥
मातेवीण देव देखा । नाहीं पुत्रासी विशेषा ।
ऋण उत्तीर्ण नव्हे ऐका । माता म्हणजे भवानी ॥ ३०० ॥
दुःख करी जननीसी । तोचि जाय यमपुरासी ।
पुत्र नोहे त्याचे वंशीं । सप्तजन्म दरिद्री ॥ ३०१ ॥
ऐसी माता विनवोनि । भेटता जाहला भाऊबहिणी ।
इष्ट सोइरे अखिल जनी । प्रधानादि नगरलोका ॥ ३०२ ॥
इतुकिया अवसरीं । प्रवेश जाहला नगरपुरीं ।
तंमारंभ केला थोरी । पावले निजमंदिरांत ॥ ३०३ ॥
तक्षकाचे पुत्रासी । वस्त्रें भूषणें अति हर्षी ।
देता जाहला परियेंसीं । इंद्रसेन अतिप्रीती ॥ ३०४ ॥
चंद्रांगद सांगे पितयासी । तक्षकोपकार विस्तारेसीं ।
प्राण वांचविले आम्हांसी । द्रव्य दिधलें अपरिमित ॥ ३०५ ॥
जीं जीं वस्त्राभरणें । दिधलीं होतीं तक्षकें जाण ।
पित्यासी देवोनि चरण । नमिता झाला पुत्र देखा ॥ ३०६ ॥
निरोप दिधला नागपुत्रासी । इंद्रसेन करी अतिहर्षी ।
भृत्य पाठविले वेगेसीं । चित्रवर्म-नगरातें ॥ ३०७ ॥
राजा म्हणे तये वेळीं । सून माझी दैवागळी ।
तिचेनि धर्में वांचला बळी । पुत्र माझा अवधारा ॥ ३०८ ॥
तिणें आराधिला शंकर । अहेवपण तिचें स्थिर ।
म्हणोनि वांचला माझा कुमर । सौभाग्यवंती सून माझी ॥ ३०९ ।
म्हणोनि हेर पाठवा वेगेसीं । वार्ता लिहावी संतोषी ।
चित्रवर्मरायासी । म्हणे राजा इंद्रसेन ॥ ३१० ॥
हेर निघाले झडकरी । पातले चित्रवर्मापुरीं ।
व्यवस्था सांगती कुसरीं । चंद्रांगद-शुभवार्ता ॥ ३११ ॥
ऐकोनि राजा संतोषी देखा । करिता झाला महासुखा ।
दान दिधलें अपार ऐका । वस्त्रें भूषणें हेरांसी ॥ ३१२ ॥
इंद्रसेन राजा देखा । पुनरपि आला वर्हाडिका ।
चंद्रांगद पुत्र निका । सवें सकल कलंत्रेसीं ॥ ३१३ ॥
महोत्साह करिती थोर । वर्हाड केलें धुरंधर ।
चंद्रांगद प्रीतिकर । सीमंतिनीसी भेटला ॥ ३१४ ॥
पाताळीची अमोल्य वस्तु । प्राणेश्र्वरीसी अर्पित ।
पाजविता झाला अमृत । महानंद प्रवर्तला ॥ ३१५ ॥
कल्पवृक्षफळें देखा । देता जाहला स्वपत्निका ।
अनर्घ्य वस्तु आभरणिका । दश योजनें कांति फाके ॥ ३१६ ॥
ऐशा उत्साहें विवाह केला । आपुले पुरीसी निघाला ।
सीमंतिनीचे दैव भलें । पतिसमागमें जातसे ॥ ३१७ ॥
जावोनि आपुले नगरासी । राज्यीं स्थापिलें पुत्रासी ।
दहा सहस्त्र अब्दें हर्षी । राज्य केलें अवधारा ॥ ३१८ ॥
सीमंतिनीचें व्रत ऐसें । उपवास केलें सोमवारांस ।
पूजा केली गौरीहरास । म्हणोनि पावली इष्टार्थ ॥ ३१९ ॥
ऐसें विचित्र असे व्रत । म्हणोनि सांगती श्रीगुरुनाथ ।
ऐक सुवासिनी म्हणत । अति प्रीतीकरुनियां ॥ ३२० ॥
ऐसें व्रत करीं वो तूं आतां । अहेवपण अखंडिता ।
होतील तुज कन्या पुत्र बहुता । आमुचें वाक्य अवधारीं ॥ ३२१ ॥
दंपती विनवी श्रीगुरुसी । तुझी चरणसेवा आम्हांसी ।
तेंचि व्रत निर्धारेसीं । आम्हां व्रत कायसे ॥ ३२२ ॥
आमचा तूं प्राणनायक । तुजवांचूनि नेणो आणिक ।
तुझे चरण असती निक । म्हणोनि चरणीं लागलीं ॥ ३२३ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । आमुचे निरोपें करा ऐसी ।
व्रत आचरा सोमवारेंसी । तेचि सेवा आम्हां पावे ॥ ३२४ ॥
निरोप घेऊनि श्रीगुरुचे । व्रत करिती सोमवाराचें ।
आलीं माता-पिता त्यांचे ऐसें। भेटी जाहली श्रीगुरुची ॥ ३२५ ॥
ऐकोनि कन्यापुत्रवार्ता । संतोष करिती अत्यंता ।
द्रव्य वेंचिती अपरिमिता । समाराधना ब्राह्मणांसी ॥ ३२६ ॥
पूजा करिती श्रीगुरुसी । आनंद अति मानसीं ।
समारंभ बहुवसी । करिती भक्तिपूर्वक ॥ ३२७ ॥
ऐशापरी वंदोनि । श्रीगुरुचा निरोप घेऊनि ।
गेलीं ग्रामा परतोनि । ख्याति झाली चारी राष्ट्रीं ॥ ३२८ ॥
पुढें तया दंपतीसी । पुत्र पांच शतायुषी ।
झाले ऐका त्वरितेसीं । नामधारक श्रीगुरुचे ॥ ३२९ ॥
प्रतिवर्षीं दर्शनासी । दंपती येती भक्तीसीं ।
ऐसें शिष्य परियेसीं । श्रीगुरुचे अवधारी ॥ ३३० ॥
ऐसें श्रीगुरुचरित्र । सिद्ध सांगे पवित्र ।
नामधारक अतिप्रीत । ऐकतसे अवधारा॥ ३३१ ॥
गंगाधराचा कुमर । सरस्वती विनवी गुरुकिंकर ।
स्वामी माझा पारंपार । नृसिंहसरस्वती ॥ ३३२ ॥
ऐसी ब्रीद कीर्ति देखा । समस्त जन तुम्ही ऐका ।
प्रसन्न होय तात्काळिका । न धरा संदेह मानसीं ॥ ३३३ ॥
साखर स्वादु म्हणावयासी । उपमा द्यावी कायसी ।
मनगटीं असतां कंकणासी । आरसा काय पहावा ॥ ३३४ ॥
प्रत्यक्ष पाहतां दृष्टांतेसीं । प्रमाण काय परियेसीं ।
ख्याति असे भूमंडळासी । कीर्ति श्रीगुरुयतीची ॥ ३३५ ॥
ऐका हो जन समस्त । सांगतसे मी हित ।
सेवा करावी श्रीगुरुनाथ । त्वरित होय मनकामना ॥ ३३६ ॥
अमृताची आरवंटी । घातली असे गोमटी ।
पान करा हो तुम्ही घोटी । धणीवरी सकळिक ॥ ३३७ ॥
श्रीगुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय पतित पावनु ।
नाम ज्याचें कामधेनु । जें जें चिंतिलें पाविजे ॥ ३३८ ॥
ज्याचें चित्त श्रीगुरुचरणीं बैसलें । त्याचें सर्वही कार्य साधलें ।
अक्षयपद अनायासें पावलें । श्रीगुरुचे प्रसादें ॥ ३३९ ॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ ॥
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
सीमंतिनीआख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥