त्याचे राज्यश्रियेसी । नाश नव्हे परियेसी ।
अकंटक संतोषी । राज्य करिती तुझे सुत ॥ ८१ ॥
बोलवावें द्विजांसी । विद्वजन-शतांसी ।
ज्ञानी यज्ञनिष्ठांसी । पाचारावें परियेसा ॥ ८२ ॥
ऐशा विप्रांकरवीं देखा । करावें शिवासी अभिषेका ।
आयुष्य वर्धेल कुमारका । सद्यःश्रेय होईल ॥ ८३ ॥
येणेंपरी रायासी । सांगे पराशर ऋषि ।
राजा आनंदभरितेसीं । आरंभ केला तिये वेळी ॥ ८४ ॥
जैसा पराशर गुरु । निरोप दिधला द्विजवरु ।
तैसे बोलाविले सहस्त्रु । विद्वजन ब्राह्मणांसी ॥ ८५ ॥
शतसंख्या कलशेसी । पुण्य-इक्षुरसेसी ।
विधिपूर्वक शिवासी । अभिषेचिलें परियेसा ॥ ८६ ॥
त्याचि जळें पुत्रासी । स्नान करवी प्रतिदिवसीं ।
येणेपरी सात दिनेसी । आराधिला ईश्र्वर ॥ ८७ ॥
अवधि जहाली दिवस सात । मूर्छना आली अकस्मात ।
क्षण एक पडला अचेत । पराशरें रक्षिलें ॥ ८८ ॥
तया समयीं अवचिता । वाक्य जहालें अदृश्यता ।
सवेंचि दिसे अद्भुत । दंडहस्त महापुरुष ॥ ८९ ॥
महादंष्ट्र भयचकित । आले होते महादूत ।
समस्त द्विज रुद्र पढत । मंत्रस्वरें देताति ॥ ९० ॥
मंत्राक्षता अवसरीं । घालिती तया कुमरावरी ।
दूत पाहती उभे दूरी । जवळी येऊं न शकती ॥ ९१ ॥
होते महापाश हातीं । कुमरावरी टाकूं येती ।
दंडहस्त शिवदूती । मारुं आले तयेवेळीं ॥ ९२ ॥
भयचकित महादूत । पळोनि गेले त्वरित ।
पाठीं लागले शिवदूत । वेदपुरुषरुप देखा ॥ ९३ ॥
येणेंपरी द्विजवरें । रक्षिलें तया राजकुमरा ।
आशीर्वचन देती थोर । वेदश्रुतीकरुनियां ॥ ९४ ॥
इतुकियावरी राजकुमर । सावध झाला मन स्थिर ।
राजयातें आनंद थोर । समारंभ करीतसे ॥ ९५ ॥
पूजन केलें द्विजवरांसी । भोजन जाहलें समस्तांसी ।
तांबूलादि दक्षणेसीं । संतुष्टविलें महाराजें ॥ ९६ ॥
संतोषोनि महाराजा । सभा रचिली महावोजा ।
बैसवोनि समस्त द्विजां । महाऋषीतें सिंहासनीं ॥ ९७ ॥
राजा आपुले स्त्रियेसहित । भोजन केले इष्ट सुत ।
येवोनि बैसला सभेंत । महानंद प्रवर्तला ॥ ९८ ॥
तया समयीं ब्रह्मसुत । नारदमुनि आला त्वरित ।
राजा जाऊनि सन्मुखत । अभिवंदिलें तये वेळीं ॥ ९९ ॥
पूजा करी उपचारीं । राजा साष्टांगी नमस्कारी ।
विनवीतसे अवसरीं । कर जोडोनि परियेसा ॥ १०० ॥
राजा म्हणे ऋषीसी । तूं त्रैलोक्यीं हिंडसी ।
काय वार्ता विशेषीं । अपूर्व कांही निरोपिजे ॥ १०१ ॥
नारद म्हणे रायासी । गेलों होतों कैलासासी ।
येतां देखिलें मार्गासी । अपूर्व जाहलें परियेसा ॥ १०२ ॥
महामृत्यु दूतांसहित । न्यावया आला तुझा सुत ।
सवेंचि येऊनि शिवदूत । तया मृत्युसी पराभविलें ॥ १०३ ॥
यमदूत पळोनि जाती । तया यमापुढें सांगती ।
आमुतें मारिलें शिवदूतीं । कैसे जावें क्षितीसी ॥ १०४ ॥
यम कोपें निघाला । विरभद्रापाशीं गेला ।
म्हणे दूतां कां मार दिधला । निरपराधें स्वामिया ॥ १०५ ॥
निजकर्मानुबंधेसीं । राजपुत्र गतायुषी ।
त्यातें आणितां दूतांसी । कां मारिलें शिवदूतीं ॥ १०६ ॥
तयेवेळीं वीरभद्र । कोपोनि झाला महारौद्र ।
वर्षावधि दहा सहस्त्र । आयुष्य असे राजकुमारा ॥ १०७ ॥
न विचारितां चित्रगुप्ता । वायां पाठविलें त्वां दूतां ।
वोखटें केलें शिवदूतें । जीवें सोडिले तुझे दूत ॥ १०८ ॥
बोलावूनि चित्रगुप्ता । विचारावें आयुष्य क्षिप्ता ।
म्हणोनि पाठविलें दूतां । चित्रगुप्ता पाचारिलें ॥ १०९ ॥
पुसतां चित्रगुप्तासी । काढोनि पाहती पत्रासी ।
द्वादशाब्द वर्षायुषी । राजकुमारा लिहिलें असे ॥ ११० ॥
तेथेंचि लिहिले होतें आणिक । दहा सहस्त्र वर्षे लेख ।
पाहूनि यम धरी शंका । म्हणे स्वामी अपराध ॥ १११ ॥
वीरभद्रातें वंदूनि । यम गेला परतोनि ।
आम्ही आलों तेथोनि । म्हणोनि सांगे नारद ॥ ११२ ॥
रुद्रजाप्यें पुण्य करितां । आपुष्य जाहलें तुझ्या सुता ।
मृत्युतें जिंकिलें सत्य । पराशरगुरुकरितां ॥ ११३ ॥
ऐसें नारद सांगोनि । निघोन गेला तेथोनि ।
पराशर महामुनीं । निरोप घेतला रायाचा ॥ ११४ ॥
समस्त गेले द्विजवर । राजा हर्षें निर्भर ।
राज्य केलें धुरंधर । पुत्रपौत्रीं महीवरी ॥ ११५ ॥
ऐसा रुद्राध्यायमहिमा । पूजा करावी गुरुब्रह्मा ।
भेणें नलगे काळ यमा । श्रीगुरु म्हणती दंपतीसी ॥ ११६ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कथा विस्तारेसीं ।
श्रीगुरु सांगती दंपतीसी । प्रेमभावें करोनियां ॥ ११७ ॥
याकारणें श्रीगुरुसी । प्रीति बहु रुद्रेसीं ।
पूजा करी भक्तीसीं । रुद्राध्यायेंकरोनियां ॥ ११८ ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां तरती भवसागर । लाधे चारी पुरुषार्थ ॥ ११९ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
रुद्राध्यायमहिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 33
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 35
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.