पतीसवें जे नारी । सहगमन जाय प्रीतीकरीं ।
एकेक पाउला भूमीवरी । अश्र्वमेधयज्ञ फळ असे ॥ १०१ ॥
आपुले मातापिता-पक्ष । एकवीस कुळें विख्यात ।
पतीचे मातापितापक्ष । एकवीस कुळें परियेसा ॥ १०२ ॥
इतुके जरी नरकी असती । त्यांसी घेऊनि समवेती ।
जाई त्वरित स्वर्गाप्रति । वेदशास्त्रें म्हणती ऐसें ॥ १०३ ॥
ऐसें पुण्य जोडिती । काय वांचूनि राहणें क्षितीं ।
दुःखसागर संसार ख्याति । मरणें सत्य कधीं तरी ॥ १०४ ॥
म्हणोनि विनवी समस्तांसी । निघाली बाहेर संतोषी ।
आली अग्निकुंडापाशी । नमन केलें अग्निकुंडा ॥ १०५ ॥
स्मरोनियां सर्वेश्र्वर । केला सूर्यासी नमस्कार ।
प्रदक्षिणे उल्हास थोर । करिती झाली तये वेळीं ॥ १०६ ॥
नमूनि समस्त द्विजांसी । उभी ठेली अग्निपाशीं ।
उडी घालितां वेगेसीं । अभिनव जहालें तये वेळीं ॥ १०७ ॥
सदाशिव पंचवजक्त्र । दशभुजा नागसूत्र ।
हातीं असे पानपात्र । त्रिशूळ डमरु करीं असे ॥ १०८ ॥
भस्मांकित जटाधारी । बैसलासे नंदीवरी ।
धरितां झाला वरचेवरी । वेश्येसी तये वेळीं ॥ १०९ ॥
तया अग्निकुंडांत । न दिसे अग्नि असे शांत ।
भक्तवत्सल जगन्नाथ । प्रसन्न जाहला तये वेळी ॥ ११० ॥
हातीं धरुनि वेश्येसी । कडे काढिलें व्योमकेशीं ।
प्रसन्न होऊनि परियेसीं । वर माग म्हणतसे ॥ १११ ॥
ईश्र्वर म्हणे तियेसी । आलों तुझे परीक्षेसी ।
धर्मधैर्य पहावयासी । येणें घडलें परियेसा ॥ ११२ ॥
जाहलों वैश्य आपणचि । लिंगरत्न स्वयंभूचि ।
अग्नि केली मायेची । नाट्यमंडप जाळिला ॥ ११३ ॥
तुझें मन पहावयासी । जहालों अग्निप्रवेशीं ।
तूंचि पतिव्रता होसी । सत्य केलें व्रत आपुलें ॥ ११४ ॥
तुष्टलों तुझे भक्तीसी । देईन वर जे मागसी ।
आयुरारोग्यश्रियेसीं । जें इच्छिसी माग आतां ॥ ११५ ॥
म्हणे वेश्या तये वेळीं । नलगे वर चंद्रमौळी ।
स्वर्ग-भूमि-रसातळीं । न घें भोग ऐश्र्वर्य ॥ ११६ ॥
तुझे चरणकमळीं भृंग । होवोनि असेन महाभाग ।
माझे इष्ट बंधुवर्ग । सकळ तुझे संनिधेंसी ॥ ११७ ॥
दासदासी माझे असती । सकळ न्यावें स्वर्गाप्रति ।
तुझे संनिध पशुपति । रांहू स्वामी सर्वेश्र्वरा ॥ ११८ ॥
आम्हां न व्हावी पुनरावृत्ति । न लगे संसार यातायाती ।
विमोचावें स्वामी त्वरिती । म्हणोनि चरणीं लागली ॥ ११९ ॥
ऐकोनि तियेचें वचन । प्रसन्न झाला गौरीरमण ।
समस्तां विमानीं बैसवोन । घेऊनि गेला स्वर्गासी ॥ १२० ॥
तिचे नाट्यमंडपांत । जो कां जाहला मर्कटघात ।
तया कुक्कुटासमवेत । दग्ध जहाले परियेसा ॥ १२१ ॥
म्हणे पराशर ऋषि । सांगेन राया परियेसीं ।
मर्कटत्व त्यजूनियां हर्षी । तुझे उदरीं जन्मला ॥ १२२ ॥
तुझे मंत्रियाचे कुशीं कुक्कुट जन्मला परियेसीं ।
रुद्राक्षधारणफळें ऐसीं । राजकुमर होऊनि आले ॥ १२३ ॥
पूर्वसंस्काराकरितां । रुद्राक्षधारण असे करीत ।
दोघे पुत्र ज्ञानवंत । केवळ भक्त ईश्र्वराचे ॥ १२४ ॥
पूर्वजन्मीं अज्ञान असतां । रुद्राक्षधारण नित्य करितां ।
इतुकें पुण्य घडलें म्हणतां । जहाले तुझे कुमारक ॥ १२५ ॥
आतां तरी ज्ञानवृत्तीं । रुद्राक्ष धारण करिताती ।
त्यांच्या पुण्या नाहीं मिति । म्हणोनि सांगे पराशर ॥ १२६ ॥
श्रीगुरु म्हणती दंपतीसी । येणेंपरी रायासी ।
सांगता झाला महा हर्षी । पराशर विस्तारें ॥ १२७ ॥
ऐकोनि ऋषीचें वचन । राजा विनवी कर जोडून ।
प्रश्र्न केला अतिगहन । सांगेन ऐका एकचित्तें ॥ १२८ ॥
म्हणोनि सिद्ध विस्तारेसीं । सांगे नामधारकासी ।
अपूर्व जाहलें परियेसीं । पुढील कथा ऐक पां ॥ १२९ ॥
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्रकामधेनु ।
ऐकतां श्रोते सावधानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥ १३० ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
रुद्राक्षमहिमानिरुपणं नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 32
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 34
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.