You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 30 – श्री गुरुचरित्र अध्याय तीस

Shri Guru Charitra Adhyay 30 – श्री गुरुचरित्र अध्याय तीस

म्हणे पुरुषा प्राणेश्र्वरा । कैसें माझे त्याजिलें करा ।
उबग आला तुम्हां थोरा । म्हणोनि मातें उपेक्षिलें ॥ १०० ॥

कैसी आपण दैवहीन । तटाकीं खापर लागतां भिन्न ।
होतासि तूं निधान । आयुष्य तुझें उणें जहालें ॥ १०१ ॥

तुमचे मातापितयांसी । सांडूनि आणिलें परदेशीं ।
जेणेंपरी श्रावणासी । वधिलें राये दशरथें ॥ १०२ ॥

तैसी तुमचीं जनकजननी । तुम्हां आणिलें त्यजूनि ।
तुमची वार्ता ऐकोनि । प्राण त्यजितील दोघेजण ॥ १०३ ॥

तीन हत्या भरवंसी । घडल्या मज पापिणीसी ।
वैरिणी होय मी तुम्हांसी । पतिघातकी आपण सत्य ॥ १०४ ॥

ऐशी पापिणी चांडाळी । निंदा करिती लोक सकळीं ।
प्राण घेतला मींचि बळी । प्राणेश्र्वरा दातारा ॥ १०५ ॥

स्त्री नव्हे मी तुमची वैरी । जैसी तिखट शस्त्र सुरी ।
वेधिली तुमचे शरीरीं । घेतला प्राण आपणचि ॥ १०६ ॥

मातापिता बंधु सकळीं । जरी असती तुम्हांजवळी ।
मुख पाहाती अंतःकाळीं । त्यांसि विघ्न आपण केलें ॥ १०७ ॥

माझ्या वृद्ध सासूसासर्‍यांस । होती तुमची आस ।
पुरला नाहीं त्यांचा सोस । त्यातें सांडोनि केवीं जाता ॥ १०८ ॥

एकचि उदरीं तुम्ही त्यांसी । उबगलेति पोसावयासी ।
आम्हां कोठे ठेवूनि जासी । प्राणेश्र्वरा दातारा ॥ १०९ ॥

आतां आपण कोठे जावें । कवण मातें पोसील जीवें ।
न सांगतां आम्हांसी बरवें । निघोनि गेलासी प्राणेश्र्वरा ॥ ११० ॥

तूं माझा प्राणेश्र्वरु । तुझें ममत्व केवीं विसरुं ।
लोकांसमान नव्हसी नरु । प्रतिपाळिलें प्रीतिभावें ॥ १११ ॥

कधीं नेणे पृथकशयन । वामहस्त उसेवीण ।
फुटतसे अंतःकरण । केवीं वांचों प्राणेश्र्वरा ॥ ११२ ॥

किती आठवूं तुझे गुण । पति नव्हसी माझा प्राण ।
सोडोनि जातोसि निर्वाण । कवणेपरी वांचूं मी ॥ ११३ ॥

आतां कवण वार्‍या जाणें । कवण घेतील मज पोसणें ।
‘ बालविधवा ‘ म्हणोनि जन । निंदापवाद ठेविती ॥ ११४ ॥

एकही बुद्धि मज न सांगतां । त्यजिला आत्मा प्राणनाथा ।
कोठें जावें आपण आतां । केशवपन करुनि ॥ ११५ ॥

तुझे प्रेमें होतें भरल्यें । मातापितयांतें विसरल्यें ।
त्यांचे घरा नाहीं गेल्यें । बोलावणी नित्य येती ॥ ११६ ॥ aa

केवीं जाऊं त्यांच्या घरा । उपेक्षितील प्राणेश्र्वरा ।
दैन्यवृत्तीं दातारा । चित्तवृत्ति केवीं धरुं ॥ ११७ ॥

जंववरी होतासी तूं छत्र । सर्वां ठायीं मी पवित्र ।
मानिती सकळ इष्टमित्र । आतां निंदा करतील ॥ ११८ ॥

सासूश्र्वशुरापाशीं जाणे । मज देखतां त्याहीं मरणें ।
गृह जहालें अरण्य । तुम्हांविणें प्राणेश्र्वरा ॥ ११९ ॥

घेवोनि आल्यें आरोग्यासी । येथें ठेवूनि तूंम्हांसी ।
केवीं जाऊं घरासी । राक्षसी मी पापीण ॥ १२० ॥

ऐसें नानापरी ते नारी । दुःख करी अपरांपरी ।
इतुकें होतां अवसरीं । आला तेथे सिद्ध एक ॥ १२१ ॥

भस्मांकित जटाधारी । रुद्राक्षमाळाभूषण-अळंकारी ।
त्रिशूळ धरिला असे करीं । येऊनि जवळी उभा ठेला ॥ १२२ ॥

संभाषीतसे तया वेळीं । कां वो प्रलापिसी स्थूळीं ।
जैसें लिहिलें कपाळीं । तयापरी होतसें ॥ १२३ ॥

पूर्वजन्मीचें तपफळ । भोगणें आपण हें अढळ ।
वायां रडसी निर्फळ । शोक आतां करुं नको ॥ १२४ ॥

दिवस आठ जरी तूं रडसी । न ये प्राण प्रेतासी ।
जैसें लिहिलें ललाटेसी । तयापरी घडेल जाण ॥ १२५ ॥

मूढपणें दुःख करिसी । समस्तां मरण तूं जाणसी ।
कवण वांचला असे धरित्रीसी । सांग आम्हांसी म्हणतसे ॥ १२६ ॥

आपुला म्हणसी प्राणेश्र्वरु । कोठें उपजला तो नरु ।
तुझा जन्म झाला येरु । कवण तुझी मातापिता ॥ १२७ ॥

पूर येतां गंगेंत । नानापरीचीं काष्टें वाहत ।
येऊनि एके ठायीं मिळत । फांकती आणिक चहूंकडे ॥ १२८ ॥

पाहें पां एका वृक्षावरी । येती पक्षी अपरांपरी ।
क्रमोनि प्रहर चारी । जाती मागुती चहूंकडे ॥ १२९ ॥

तैसा हा संसार जाण नारी । कवण वाचला असे स्थिरी ।
मायामोहें कलत्रपुत्रीं । पति म्हणसी आपुला ॥ १३० ॥

गंगेमध्यें जैसा फेन । तेणेपरी देह जाण ।
स्थिर नोहे, याचि कारण । शोक वृथा करुं नको ॥ १३१ ॥

पंचमहाभूतात्मक देह । तत्संबंधीं गुण पाहें ।
आपुलें कर्म कैसें आहे । तैसा गुण उद्भवे ॥ १३२ ॥

गुणानुबंधें कर्में घडती । कर्मासारखी दुःख प्राप्ति ।
मायामोहाचिया रीतीं । मायाभयसंबंधें ॥ १३३ ॥

मायासंबंधें मायागुण । उपजे सत्व-रज-तमोगुण ।
येणेंचि तीन्ही देह जाण । त्रिगुणात्मक देह हा ॥ १३४ ॥

हा संसार वर्तमान । समस्त कर्माचे अधीन ।
सुखदुःख आपुले गुण । भोगिजे आपुलें आर्जव ॥ १३५ ॥

कल्पकोटी दिवसवरी । देवांस आयुष्य आहे जरी ।
त्यांसी काळ न चुके सरी । मनुष्याचा कवण पाड ॥ १३६ ॥

काळ समस्तांसी कारण । कर्माधीन देह-गुण ।
स्थिर कल्पितां साधारण । पंचभूत देहासी ॥ १३७ ॥

काळ-कर्म-गुणाधीन । पंचभूतात्मक देह जाण ।
उपजतां संतोष नको मना । मेलिया दुःख न करावें ॥ १३८ ॥

जघीं गर्भ होता नरु । जाणिजे नश्य म्हणोनि प्रख्याते थोरु ।
त्याचे जैसे गुणकर्म-विवरु । तैसें मरण जन्म परियेसा ॥ १३९ ॥

कोणा मृत्यु पूर्ववयसी । कवणा मृत्यु वृद्धाप्येंसी ।
जैसे आर्जव असे ज्यासी । तयापरी घडे जाणा ॥ १४० ॥

पूर्वजन्मार्जवासरसीं । भोगणें होय सुखदुःख अंशी ।
कलत्र-पुत्र-पति हर्षी । पापपुण्यांशे जाणा ॥ १४१ ॥

आयुष्य सुखदुःख जाणा । समस्त पापवश्य-पुण्य ।
ललाटीं लिहिलें असे ब्रह्मानें । अढळ जाण विद्वजना ॥ १४२ ॥

एखादे समयीं कर्मासी । लंघिजेल पुण्यवशीं ।
देवदानवमनुष्यांसी । काळ न चुके भरंवसे ॥ १४३ ॥

संसार म्हणजे स्वप्नापरी । इंद्रजाल-गारुडीसरी ।
मिथ्या जाण तयापरी । दुःख आपण करुं नये ॥ १४४ ॥

शतसहस्त्रकोटि जन्मीं । तूं कवणाची कोण होतीस गृहिणी ।
वायां दुःख करिसी झणी । मूर्खपणेंकरुनियां ॥ १४५ ॥

पंचभूतात्मक शरीर । त्वचा मांस शिरा रुधिर ।
मेद मज्जा अस्थि नर । विष्ठा-मूत्र-श्र्लेष्मसंबंधीं ॥ १४६ ॥

ऐशा शरीरअघोरांत । पाहतां काय असे स्वार्थ ।
मल मूत्र भरलें रक्त । तयाकारणें शोक कां करिसी ॥ १४७ ॥

विचार पाहें पुढें आपुला । कोणेपरी मार्ग असे भला ।
संसारसागर पाहिजे तरला । तैसा मार्ग पाहें बाळे ॥ १४८ ॥

येणेंपरी तियेसी । बोधिता झाला तापसी ।
ज्ञान झालें तियेसी । सांडी शोक तयावेळी ॥ १४९ ॥

कर जोडोनि तये वेळीं । माथा ठेवोनि चरणकमळी ।
विनवीतसे करुणाबहाळी । उद्धरीं स्वामी म्हणोनियां ॥ १५० ॥

कवण मार्ग आपणासी । जैसा स्वामी निरोप देसी ।
जनकजननी तूं आम्हांसी । तारी तारी म्हणतसे ॥ १५१ ॥

कवणेपरी तरेन आपण । हा संसार भवार्ण ।
तुझा निरोप करीन । म्हणोनि चरणा लागली ॥ १५२ ॥

ऐकोनि तियेचे वचन । सांगे योगी प्रसन्नवदन ।
बोलतसे विस्तारुन । आचरण स्त्रियांचे ॥ १५३ ॥

म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार ।
ऐकतां समस्त पाप दूर । सकळाभीष्टें साधती ॥ १५४ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे

प्रेतांगनाशोको नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Leave a Reply