श्री गुरु चरित्र परयाण का यह सत्ताईसवाँ अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 26
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 28
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्य सगुण । लागे सिद्धाचिये चरण ।
विनवीतसे कर जोडून । ऐका श्रोते सकळिक ॥ १ ॥
जय जया सिद्ध योगी । तूं तारक आम्हां जगीं ।
ज्ञाप्रकाश करणेलागीं । दर्शन दिधलें चरण आपुले ॥ २ ॥
चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरुंनीं निरोपिले विप्रांसी ।
पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे दातारा ॥ ३ ॥
शिष्यवचन ऐकोनि । सांगता झाला सिद्ध मुनि ।
ऐक शिष्या नामकरणी । अनुपम्य महिमा श्रीगुरुची ॥ ४ ॥
किती प्रकारें त्या ब्राह्मणांसी । सांगती श्रीगुरु हितासी ।
न ऐकती द्विज तामसी । म्हणती वाद का पत्र देणें ॥ ५ ॥
विप्रवचन ऐकोनि । कोप करिती श्रीगुरु मुनि ।
जैसी तुझे अंतःकरणीं । तैसी सिद्धि पाव म्हणती ॥ ६ ॥
सर्पाच्या पेटारियासी । कोरुं जाय मूषक कैसी ।
जैसा पतंग दीपासी । करी आपुला आत्मघात ॥ ७ ॥
तैसे विप्र मदोन्मत्त । श्रीगुरुमूर्तीस नोळखत ।
बळे आपुले प्राण देत । दिवांधापरी देखा ॥ ८ ॥
इतुकिया अवसरीं । श्रीगुरु देखती नरासी दूरी ।
शिष्यांते म्हणती पाचारीं । कवण जातो मार्गस्थ ॥ ९ ॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । गेले शिष्य धांवोनि ।
त्या नरातें पाचारोनि । आणिले श्रीगुरुसन्मुख ॥ १० ॥
श्रीगुरु पुसती तयासी । जन्म कवण यातीसी ।
तुझा वृतांत सांगे कैसी । म्हणोनि पुसती तये वेळीं ॥ ११ ॥
श्रीगुरुवचन परिसोन । सांगे आपण यातिहीन ।
‘ मातंग ‘ नाम म्हणोन । स्थान आपुले बहिर्ग्रामी ॥ १२ ॥
तूं कृपाळू सर्वां भूतीं । म्हणोनि पाचारिलें प्रीतीं ।
आपण झालों उद्धारगति । म्हणोनि दंडवत नमन करी ॥ १३ ॥
ऐसा कृपाळू परमपुरुष । दृष्टि केली सुधारस ।
लोखंडासी लागतां परीस । सुवर्ण होतां काय वेळ ॥ १४ ॥
तैसी तया पतितावरी । कृपा केली श्रीगुरु-नरहरी ।
दंड देवोनि शिष्या-करी । रेखा सप्त काढविल्या ॥ १५ ॥
श्रीगुरु म्हणती पतितासी । एकेक रेखा लंघी रे ऐसी ।
आला नर वाक्यासरसी । झालें ज्ञान अणिक तया ॥ १६ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । कवण कुळीं जन्मलासी ।
पतित म्हणे आपण किरातवंशी । नाम आपुले ‘ बनराखा ‘ ॥ १७ ॥
दुसरी रेखा लंघितां । ज्ञान झालें पूर्वापरता ।
बोलूं लागला अनेक वार्ता । विस्मय करिती सकळ लोक ॥ १८ ॥
तिसरी रेखा लंघीं म्हणती । त्यासी झाली जातिस्मृति ।
म्हणे आपण ‘ गंगासुत ‘ । नदीतीरी वास आपणा ॥ १९ ॥
लंघितां रेखा चतुर्थी । म्हणे आपण शूद्रयाती ।
जात होतों आपुले वृत्ती । स्वामी मातें पाचारिलें ॥ २० ॥
लंघितां रेखा पांचवेसी । झालें ज्ञान आणिक त्यासी ।
जन्म झाला वैश्यवंशी । नाम आपुलें ‘ सोमदत्त ‘ ॥ २१ ॥
सहावी रेषा लंघितां । म्हणे आपण क्षत्रिय ख्याता ।
नाम आपुलें विख्याता । ‘ गोविंद ‘ ऐसे देखा ॥ २२ ॥
सातवी रेखा लंघिताक्षण । अग्रयाती विप्र आपण ।
वेदशास्त्रादी व्याकरण । ‘ अध्यापक ‘ नाम आपुलें ॥ २३ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । वेदशास्त्र-अभ्यास म्हणसी ।
आले ब्राह्मण चर्चेसी । वाद करी गां यांसवें ॥ २४ ॥
अभिमंत्रोनि विभूति । त्याचे सर्वांगीं प्रोक्षिती ।
प्रकाश जाहला ज्ञानज्योति । तया नरा परियेसा ॥ २५ ॥
जैसे मानस सरोवरास । वायस जातां होय हंस ।
तैसा श्रीगुरु-स्पर्शेसी । पतित होय ज्ञानराशी ॥ २६ ॥
नरसिंहसरस्वती जगद्गुरु । त्रैमूर्तीचा अवतारु ।
अज्ञानी लोक म्हणती नरु । तेचि जाती अधःपाता ॥ २७ ॥
येणेपरी पतितासी । ज्ञान झालें असमसाहसी ।
वेदशास्त्र साङ्गेसी । म्हणों लागला तिये वेळीं ॥ २८ ॥
जे का आले चर्चेस विप्र । भयचकित झाले थोर ।
जिव्हा खुंटोनि झाले बधिर । हृदयशूळ तात्काळीं ॥ २९ ॥
विप्र थरथरां कांपती । श्रीगुरुचरणीं लोळती ।
म्हणती आपणा काय गति । जगज्ज्योति स्वामिया ॥ ३० ॥
गुरुद्रोही जाहलों आपण । केलें ब्राह्मण-धिक्कारण ।
तूं अवतार गौरीरमण । क्षमा करणे स्वामिया ॥ ३१ ॥
वेष्टोनियां मायापाशीं । झालो आपण महातामसी ।
नोळखों तुझे स्वरुप कैसी । क्षमा करणे स्वामिया ॥ ३२ ॥
तूं कृपाळू सर्वां भूतीं । आमचे दोष न धरी चित्ती ।
आम्हां देई गा उद्धारगति । म्हणोनि चरणीं लागती ॥ ३३ ॥
एखादे समयी लीलेसीं । तृण करिसी पर्वतसरसी ।
पर्वत पाहसी जरी कोपेसी । भस्म होय निर्धारे ॥ ३४ ॥
तूंचि सृष्टि रचावयासी । तूंचि सर्वांचे पोषण करिसी ।
तूंचि कर्ता प्रळयासी । त्रयमूर्ति जगद्गुरु ॥ ३५ ॥
तुझी महिमा वर्णावयासी । मति नाही आपणांसी ।
उद्धारावे आम्हांसी । शरणागता वरप्रदा ॥ ३६ ॥
ऐसें विप्र विनविती । श्रीगुरु त्यासी निरोपिती ।
तुम्हीं क्षोभविला भारती । त्रिविक्रम महामुनि ॥ ३७ ॥
आणिक केले महादोष । निंदा केली ब्राह्मणांस ।
पावाल जन्म ब्रह्मराक्षस । आपुली जोडी भोगावी ॥ ३८ ॥
आपुले आर्जव आपणासी । भोगिजे पुण्यपापासी ।
निष्कृति न होता पापासी । गति नाही परियेसा ॥ ३९ ॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । लागती विप्र दोघे चरणीं ।
कधी उद्धार होऊं भवार्णी । कवणेपरी कडे पडो ॥ ४० ॥
श्रीगुरुनाथ कृपामूर्ति । तया विप्रां नितोपिती ।
राक्षसत्व पावाल प्रख्याति । संवत्सर बारापर्यंत ॥ ४१ ॥
अनुतप्त झालिया कारण । शांतिरुप असाल जाण ।
जो कां ‘ शुक्लनारायण ‘ । प्रथम वाक्य म्हणत असां ॥ ४२ ॥
तुमचें पाप शुद्ध होतां । द्विज येईल पर्यांटतां ।
पुढील वाक्य तुम्हां सांगतां । उद्धारगति होईल जाणा ॥ ४३ ॥
आतां जावें गंगेसी । स्थान बरवें बसावयासी ।
म्हणोनि निरोपिती तया विप्रांसी । श्रीगुरुमूर्ति तये वेळीं ॥ ४४ ॥
निघतां ग्रामाबाहेरी । हृदयशूल अपरांपरी ।
जातांक्षणी नदीतीरी । विप्र पंचत्व पावले ॥ ४५ ॥
आपण केलिया कर्मासी । प्रयत्न नाही आणिकासी ।
ऐसे विप्र तामसी । आत्मघातकी तेचि जाणा ॥ ४६ ॥
श्रीगुरुवचन जेणेपरी । अन्यथा नव्हे निर्धारीं ।
झाले राक्षस द्विजवरी । बारा वर्षे गति पावले ॥ ४७ ॥
विप्र पाठविले गंगेसी । मागे कथा वर्तली कैसी ।
नामधारक शिष्यासी । सांगे सिद्ध अवधारा ॥ ४८ ॥
पतित झाला महाज्ञानी । जातिस्मरण सप्तजन्मीं ।
पूर्वांपार विप्र म्हणोनि । निर्धार केला मनांत ॥ ४९ ॥
नमन करुनि श्रीगुरुसी । विनवी पतित भक्तीसी ।
अज्ञानमायातिमिरासी । ज्योतिस्वरुप जगद्गुरु ॥ ५० ॥
पूर्वीं होतों विप्र आपण । केवीं झालों यातिहीन ।
स्वामी सांगा विस्तारोन । त्रिकाळज्ञ महामुनि ॥ ५१ ॥
जन्मांतरीं आपण देखा । काय केलें महादोषा ।
विस्तारावे स्वामी पिनाका । नृसिंहसरस्वती स्वामिया ॥ ५२ ॥
ऐसे वचन ऐकोनि । सांगती श्रीगुरु प्रकाशूनि ।
म्हणोनि सांगे सिद्धमुनि । नामधारक-शिष्याप्रति ॥ ५३ ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्र-विस्तार ।
पुढिल कथा ऐकतां नर । पतित होय ब्रह्मज्ञानी ॥ ५४ ॥
ऐसी पुण्यपावन कथा । ऐकतां जन समस्ता ।
चतुर्विध पुरुषार्थ त्वरिता । लाधे निश्र्चयें परियेसा ॥ ५५ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
मदोन्मत्तविप्रशापकथनं-पतितोद्धारणं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous Lesson – Shri Guru Charitra Adhyay 26
- Read Next Lesson– Shri Guru Charitra Adhyay 28
- Read – Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.