नित्यस्रग्वी असे जाण । शुचि वस्र प्रावरण ।
क्षौमी दान्त चर्मधारण । दंडधारी असे रुप ॥ २०१ ॥
नयन वर्ण कांचन । सूर्यासारिखे असे किरण ।
षडरत्नी दीर्घ प्रमाण । सामवेद रुप असे ॥ २०२ ॥
याच्या भेदा नाही मिती । अखिल सहस्र बोलती ।
ऐसी कवणा असे शक्ति । समस्त शिकूं म्हणावया ॥ २०३ ॥
नारायणावांचोनि । समस्त भेद नेणे कोणी ।
ऐक शिष्या जैमिनी । सांगेन तुज किंचित ॥ २०४ ॥
प्रथम ‘ असुरायणी ‘ । दुसरे ‘ वासुरायणी ‘ ।
‘ वार्तातवेय ‘ म्हणोनि । तिसरा भेद परियेसा ॥ २०५ ॥
‘ प्रांजली ‘ भेद असे एक । ‘ ऋग्वैनविध ‘ पंचम ऐक ।
आणि ‘ प्राचीनयोग्य ‘ शाखा । असे सहावा परियेसा ॥ २०६ ॥
‘ ज्ञानयोग्य ‘ सप्तम । ‘ राणायनी ‘ असे ज्या नाम ।
यासी भेद नवम । आहेत ऐका एकचित्तें ॥ २०७ ॥
‘ राणायनी ” शाट्यायनी ‘ । तिसरा ‘ शाट्या ‘ म्हणोनि ।
‘ मुद्गल ‘ नाम जाणोनि । चौथा भेद परियेसा ॥ २०८ ॥
‘ खल्वला ‘ ‘ महाखल्वला ‘ । षष्ठ नामें ‘ लाङ्गला ‘ ।
सप्तम भेद ‘ कौथुमा ‘ भला । ‘ गोतम ‘ म्हणिजे परियेसा ॥ २०९ ॥
नवम शाखा ‘ जैमिनी ‘ । ऐसे भेद विस्तारोनि ।
सांगितले व्यासमुनीं । श्रीगुरु म्हणती द्विजांसी ॥ २१० ॥
पूर्ण सामवबेदासी । कोण जाणे क्षितीसी ।
तीनवेदी म्हणविसी । मदोन्मत्त होवोनियां ॥ २११ ॥
‘ सुमंतु ‘ म्हणिजे शिष्यासी । सांगतसे व्यास हर्षी ।
अथर्वण वेदासी । निरोपिलें परियेसा ॥ २१२ ॥
या अथर्वण वेदासी । उपवेद असे परियेसीं ।
‘ शस्रशास्र ‘ निक्ष्चयेसीं । ‘ वैतान ‘ असे गोत्र ॥ २१३ ॥
अधिदैवत इंद्र त्यासी । म्हणावें अनुष्टप् छंदासी ।
तीक्ष्ण चंड क्रूरेसी । कृष्ण वर्ण असे जाण ॥ २१४ ॥
कामरुपी क्षुद्रकर्म । स्वदारतुष्ट त्यासी नाम ।
विश्र्वसृजक साध्यकर्म । जलमूर्ध्नीगालव ॥ २१५ ॥
ऐसें रुप तयासी । भेद नऊ परियेसी ।
सुमंतु नाम शिष्यासी । सांगतसे श्रीव्यास ॥ २१६ ॥
‘ पैप्पलाद ‘ भेद प्रथम । दुसरा भेद ‘ दांत ‘ नाम ।
‘ प्रदांत ‘ भेद सूक्ष्म । चौथा भेद ‘ तौत ‘ जाण ॥ २१७ ॥
‘ औत ‘ नाम असे ऐक । ‘ ब्रह्मदपलाश ‘ विशेष ।
सातवी शाखा ऐक । ‘ शौनकी ‘ म्हणिजे परियेसा ॥ २१८ ॥
अष्टम ‘ वेददर्शी ‘ भेदासी । ‘ चारणविद्या ‘ नवमेसी ।
पांच कल्प परियेसीं । सांगेन ऐका एकचित्तें ॥ २१९ ॥
‘ नक्षत्र ‘-‘ विधि ‘-‘ विधान ‘ कल्प । ‘संहिता’ ‘ शांति ‘ असे कल्प ।
समस्त देव उपांगरुप । व्यास म्हणे शिष्यांसी ॥ २२० ॥
ऐसें चौघां शिष्यांस । सांगतसे वेदव्यास ।
प्रकाश केला क्षितीस । भरतखंडी परियेसा ॥ २२१ ॥
या भरतखंडांत । पूर्वी होतें पुण्य बहुत ।
वर्णाश्रमीं आचरत । होते लोक परियेसा ॥ २२२ ॥
या कलियुगाभीतरीं । कर्म सांडिले द्विजवरीं ।
लोपले वेद निर्धारी । गौप्य जाहले क्षितीसी ॥ २२३ ॥
कर्मभ्रष्ट झाले द्विज । म्लेंच्छांपुढे बोलती वेदबीज ।
सत्व गेले याचिकाज । मंदमति झाले जाणा ॥ २२४ ॥
पूर्वी होते महत्व । ब्राह्मणांसी देवत्व ।
वेदबळें नित्यत्व । भूसुर म्हणती याचिकाज ॥ २२५ ॥
पूर्वी राजे याचिकारण । पूजा करिती विप्रचरण ।
सर्वस्व देतां दक्षिणा । अंगीकार नच करिती ॥ २२६ ॥
वेदबळे विप्रांसी । त्रैमूर्ति वश होते त्यांसी ।
इंद्रादि सुरवरांसी । भय होते विप्रांचे ॥ २२७ ॥
कामधेनु कल्पतरु । विप्रवाक्य होतें थोरु ।
पर्वत करिती तृणाकारु । तृण पर्वत वेदसत्वें ॥ २२८ ॥
विष्णु आपण परियेसीं । पूजा करी ब्राह्मणांसी ।
आपुले दैवत म्हणे त्यांसी । वेदसत्वेंकरुनियां ॥ २२९ ॥
देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतं ।
ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम् ॥ २३० ॥
ऐसे महत्व ब्राह्मणांसी । पूर्वी होते परियेसीं ।
वेदमार्ग त्यजोनि सुरसी । अन्यमार्गे रहाटती ॥ २३१ ॥
तेणे सत्व भंगले । हीन यातीतें सेवा करुं लागले ।
अध्यापन करिती भोलें । वेद-विक्रय परियेसा ॥ २३२ ॥
हीन यातीपुढें देख । वेद म्हणती मूर्ख लोक ।
त्यांचे पाहूं नये मुख । ब्रह्मराक्षस होताति ॥ २३३ ॥
ऐसें चारी वेदांसी । शाखा असती बहुवसी ।
कवण जाणे क्षितीसी । समस्त गौप्य होऊनि गेले ॥ २३४ ॥
चतुर्वेदी म्हणविसी । लोकांसवे चर्चा करिसी ।
काय जाणसी वेदांसी । अखिल भेद आहेति जाणा ॥ २३५ ॥
ऐशियामध्यें काय लाभ । घेऊं नये द्विजक्षोभ ।
कवणें केला तूंते बोध । जाई आतां येथूनि ॥ २३६ ॥
आपुली आपण स्तुति करिसी । जयपत्रें दाखविसी ।
त्रिविक्रमयतीपाशी । पत्र मागसी लिहूनि ॥ २३७ ॥
आमुचे बोल ऐकोनि । जावें तुवा परितोनि ।
वायां गर्वे भ्रमोनि । प्राण अपुला देऊं नका ॥ २३८ ॥
ऐसें श्रीगुरु ब्राह्मणांसी । सांगती बुद्धि हितासी ।
न ऐकती विप्र तामसी । म्हणती चर्चा करुं ॥ २३९ ॥
चर्चा जरी न करुं येथे । हारी दिसेल आमुतें ।
सांगती लोक राजयातें । महत्व आमुचें उरेल केवीं ॥ २४० ॥
सिद्ध म्हणे नामांकिता । ऐसे विप्र मदोन्मत्ता ।
नेणती आपुले हिता । त्यांसी मृत्यु जवळी आला ॥ २४१ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
वेदविस्तारकथनं नाम षड्विंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥