तिसरा अष्टक सविस्तर । सांगेन तुम्हां मनोहर ।
वैशंपायन शिष्य थोर । गुरुमुखें ऐकतसे ॥ १०१ ॥
तिसरा अष्टक प्रश्र्न प्रथम । नाम ‘ प्रजापतिरकाम ‘ ।
अनुवाक एकादश उत्तम । द्विचत्वारि पन्नासा त्यासी ॥ १०२ ॥
दुसरा प्रश्र्न असे जाण । नाम ‘ योवैपवमान ‘ ।
एकादश अनुवाक जाण । षट्चत्वारी पन्नासा त्यासी ॥ १०३ ॥
तृतीय प्रश्र्न बरवी । नाम असे ‘ अग्नेतेजस्वी ‘ ।
अनुवाकांची एकादशी । षट्त्रिंशती पन्नासा त्यासी ॥ १०४ ॥
चौथा प्रश्र्न ‘ विवाएत ‘ । एकादश अनुवाक ख्यात ।
षट्चत्वारी पन्नासा त्यांत । एकचित्तें परियेसा ॥ १०५ ॥
पुढें प्रश्र्ण पंचम । म्हणावें ‘ पूर्णापश्र्चात् ‘ नाम ।
अनुmवाक अकरा उत्तम । षट्त्रिंशति पन्नासा त्यासी ॥ १०६ ॥
ऐसे पांच प्रश्र्ण तृतीयाष्टकासी । अनुवाक पंचपंचाशी त्यासी ।
mmद्विशत अधिक सहा त्यासी । पन्नासा असती अवधारा ॥ १०७ ॥
चौथा अष्टक प्रथम प्रश्र्न । नामें असे ‘ युंजान ‘।
एकादश अनुवाक खूण । षट्चत्वारी पन्नासा त्यासी ॥ १०८ ॥
प्रश्र्न ‘ विष्णोःक्रमोसि ‘ । अनुवाक असती एकादशी ।
आठ अधिक चत्वारिंशी । पन्नासा त्यासी विस्तार ॥ १०९ ॥
तिसरा प्रश्र्न उत्तम । नाम जाणा तुम्ही ‘ अपांत्वेम ‘ ।
त्रयोदश अनुवाक नेम । षट्त्रिंशत् पन्नासा त्यासी ॥ ११० ॥
चौथा प्रश्र्न ‘ रश्मिरसि ‘ । अनुवाक असती द्वादशी ।
सप्ताधिक तीस त्यासी । पन्नासा ऐसे तुम्ही जाणा ॥ १११ ॥
‘ नमस्ते रुद्र ‘ उत्तम । प्रश्र्न जाणा पंचम ।
एकादश अनुवाक नेम । सप्ताधिक वीस पन्नासा ॥ ११२ ॥
‘ अश्मन्नूर्ज ‘ प्रश्र्नास । नव अनुवाक विशेष ।
षट्चत्वारी पन्नासा त्यास । एकचित्ते परियेसा ॥ ११३ ॥
प्रश्र्न ‘ अग्नाविष्णू ‘ सी । अनुवाक जाणा पंचदशी ।
एक न्यून चाळिसांसी । पन्नासा त्यासी विस्तारें ॥ ११४ ॥
ऐशे चतुर्थ अष्टकासी । सप्त प्रश्र्न परियेसीं ।
अनुवाक असती ब्यायशीं । द्विशत एक उणे ऐंशी पन्नासा ॥ ११५ ॥
पंचमाष्टक प्रथम प्रश्र्न । नामें ‘ सावित्राणि ‘ जाण ।
पन्नासा षष्ठी एक उणे । एकादश अनुवाक ख्यात ॥ ११६ ॥
‘ विष्णुमुखा ‘ प्रश्र्नासी । अनुवाक असती द्वादशी ।
चतुःषष्ठी पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती द्विजांते ॥ ११७ ॥
तिसरा प्रश्र्न ‘ उत्सन्न ‘ । द्वादश अनुवाक धरा खूण ।
पन्नासांसी द्वय न्यून । पन्नासा असती परियेसा ॥ ११८ ॥
चौथा प्रश्र्न ‘ देवासुरा ‘ । अनुवाक असती त्यासी बारा ।
षष्ठीसी दोन उण्या करा । पन्नासा असती परियेसा ॥ ११९ ॥
‘ यदेकेन ‘ नाम प्रश्र्न । चतुर्विशति अनुवाक खूण ।
दोन अधिक षष्ठी जाण । पन्नासा असती परियेसा ॥ १२० ॥
‘ हिरण्यवर्णा ‘ षष्ठ प्रश्र्न । त्रयोविंशति अनुवाक जाण ।
षष्ठीमध्ये सहा न्यून । पन्नासा असती परियेसा ॥ १२१ ॥
‘ यो वा आ य था ‘नामें प्रश्र्न । षड्विंशति अनुवाक जाण ।
षष्ठीमध्ये द्वय न्यून । पन्नासा असती परियेसा ॥ १२२ ॥
पंचमाष्टक संहितेसी । सप्त प्रश्र्न परियेंसी ।
अनुवाक एक शत त्यांसी । वीस अधिक विस्तारें ॥ १२३ ॥
त्रीणि अधिक चतुःशत । पन्नासा असती जाणा विख्यात ।
मन करुनि सावचित्त । ऐका म्हणे तयेवेळीं ॥ १२४ ॥
षष्ठमाष्टक संहितेसी । प्रथम प्रश्र्न परियेसीं ।
‘ प्राचीनवंश ‘ म्हणा ऐसी । एकादश अनुवाक जाणा ॥ १२५ ॥
अधिक सहा सत्रीसी । पन्नासा त्यासी परियेसीं ।
विस्तार करुनि शिष्यासी । सांगतसे व्यासदेव ॥ १२६ ॥
‘ यदुमौ ‘ नाम प्रश्र्नासी । अनुवाक जाणा एकादशी ।
एके उणे षष्टीसी । पन्नासा असती परियेंसी ॥ १२७ ॥
तिसरा प्रश्र्न ‘ चात्वाल ‘ । एकादश अनुवाक माळ ।
पन्नासा षष्टी द्वय स्थूळ । तिसरे प्रक्ष्नीं परियेसीं ॥ १२८ ॥
चवथा प्रश्र्न ‘ यज्ञेन ‘ । एकादश अनुवाक जाण ।
पन्नासा एक अधिक पन्न । एकचित्तें परियेसा ॥ १२९ ॥
‘ इंद्रोवृत्र ‘ नाम प्रश्र्न । एकादश अनुवाक जाण ।
द्विचत्वारि पन्नासा खूण । पंचम प्रश्र्न येणेपरी ॥ १३० ॥
‘ सुवर्गाय ‘ प्रश्र्नासी । अनुवाक असती एकादशी ।
त्रीणी अधिक चत्वारिंशी । पन्नासा असती परियेसा ॥ १३१ ॥
सहावा अष्टक परिपूर्ण । यासी सहा असती प्रश्र्न ।
सासष्ट अनुवाक जाण । त्रयस्त्रिंशस्त्रिशत पन्नासा ॥ १३२ ॥
सप्तमाष्टक प्रथम प्रश्र्न । नामें असे ‘ प्रजानन ‘ ।
अनुवाक वीस असती खूण । द्विपंचाशी पन्नासा त्यास ॥ १३३ ॥
‘ साध्या ‘ जाणिजे द्वितीय प्रश्र्न । अनुवाक वीस असती खूण ।
पन्नासा पन्न परिपूर्ण । एकचित्ते परियेसा ॥ १३४ ॥
‘ प्रजवं वा ‘ नाम प्रक्ष्नासी । अनुवाक वीस परियेसीं ।
द्विचत्वारि पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणातें ॥ १३५ ॥
‘ बृहस्पतिरकाम ‘ प्रश्र्न । द्वाविंशति अनुवाक जाण ।
त्रीण्यधिक पन्न खूण । पन्नासा असती अवधारा ॥ १३६ ॥
प्रश्र्न असे पंचम । ‘ गावो वा ‘ नामें उत्तम ।
पंचविंशति अनुवाक नेम । चत्वारि पंच पन्नासा त्यासी ॥ १३७ ॥
सप्तमाष्टक संहितेसी । प्रश्र्न पांच परियेसीं ।
एकशत सप्त त्यासी । अनुवाक असती विस्तार ॥ १३८ ॥
द्विशतावरी अधिकेसी । एकावन्न असती पन्नासी ।
सप्तमाष्टक असे सुरसी । एकचित्तें परियेसा ॥ १३९ ॥
सप्तअष्टक संहितेसी । प्रश्र्न चतुश्र्चत्वारी भरंवसीं ।
षट्शत एक अधिकेसी । पन्नास अनुवाक विस्तार ॥ १४० ॥
द्विउणें शतद्वय सहस्र दोनी । पन्नासा तुम्ही जाणोनि ।
पठण करा म्हणोनि । व्यास सांगे शिष्यासी ॥ १४१ ॥
तीन अष्तक ब्राह्मणांत । असती जाण विख्यात ।
सांगेन ऐका एकचित्त । म्हणे व्यास शिष्यासी ॥ १४२ ॥
प्रथमाष्टक ब्राह्मणासी । प्रश्र्न आठ परियेसी ।
नामें सांगेन सुरसी । एकचित्तें परियेसा ॥ १४३ ॥
प्रथम प्रश्र्न ‘ ब्रह्मसंधत ‘ । नाम असे विख्यात ।
अनुवाक दहा विस्तृत । अशीति दशक असती मनोहर ॥ १४३ ॥
‘ उद्धन्य ‘ नाम दुसरा प्रश्र्न । सहा अनुवाक शतक पन्न ।
वाजपेय अनुसंधान । ‘ देवासुरा ‘ प्रश्र्न तिसरा ॥ १४५ ॥
त्यासी दश अनुवाक जाण । पंच अधिक षष्टि दशक खूण ।
चौथा ‘ उभये ‘ नाम प्रश्र्न । दश अनुवाक मनोहर ॥ १४६ ॥
संवत्सरगणित सहा अधिका । त्यासी जाण तुम्ही दशका ।
पांचवा ‘ अग्नेःकृत्तिका ‘ । प्रश्र्न असे अवधारा ॥ १४७ ॥
त्यासी अनुवाक द्वादश । सांगेन ऐका दशक ।
दोन अधिक षष्ठी विशेष । एकचित्तें परियेसा ॥ १४८ ॥
सहावा प्रश्र्न ‘ अनुमत्य ‘ । अनुवाक पहा प्रख्यात ।
पांच अधिक सत्री निरुत । दशक त्यासी अवधारा ॥ १४९ ॥
सप्तम प्रश्र्ना धरा खूण । नाम त्या ‘ एतद्-ब्राह्मण ‘ ।
दश अनुवाक आहेत जाण । चतुःषष्टि दशक त्यासी ॥ १५० ॥
आठवा ‘ वरुणस्य ‘ नाम प्रश्र्न । अनुवाक त्यासी दहा जाण ।
सप्त अधिक तीस प्रमाण । दशक त्यासी मनोहर ॥ १५१ ॥
प्रथम अष्टक ब्राह्मणासी । प्रश्र्न आठ परियेसीं ।
अष्टसप्तति अनुवाक त्यासी । एकचित्ते परियेसा ॥ १५२ ॥
एक उणे पांच शत । दशक आहेत विख्यात ।
वैशंपायन ऐकत । गुरुमुखेकरोनि ॥ १५३ ॥
दुसरा अष्टक ब्राह्मांस । प्रथम प्रश्र्न ‘ अंगिरस ‘ ।
अनुवाक जाणा एकादश । साठी दशक मनोहर ॥ १५४ ॥
‘ प्रजापतिरकाम ‘ कांड । प्रश्र्न दुसरा महा गोड ।
एकादश अनुवाक द्दढ । त्रिसप्तति दशक त्यासी ॥ १५५ ॥
कांड ‘ ब्रह्मवादिन ‘ । एकादश अनुवाक जाण ।
दशक आहेति त्यासी पन्न । एकचित्तें परियेसा ॥ १५६ ॥
‘ जुष्टो ‘ नाम प्रश्र्न ऐक । अनुवाक आठ अशीति दशक ।
वैशंपायन शिष्यक । गुरुमुखें ऐकतसे ॥ १५७ ॥
प्रश्र्न ‘ प्राणोरक्षति ‘ । अष्ट अनुवाक त्यासी ख्याति ।
पंच अधिक चत्वारिंशती । दशक तुम्ही ओळखिजे ॥ १५८ ॥
‘ स्वाद्वींत्वा ‘ नामें षष्ठम । सौत्रामणि-प्रश्र्न उत्तम ।
अनुवाक असती वीस खूण । षडशीति दशक त्यासी ॥ १५९ ॥
सप्तम प्रश्र्न ‘ त्रिवृता ‘ सी । अनुवाक असती अष्टादशी ।
सहा अधिक षष्ठीसी । दशक त्यासी मनोहर ॥ १६० ॥
अष्टम प्रश्र्न ‘ पीवोअन्न ‘ । अनुवाक असती नऊ जाण ।
अशीतीसी एक उणा । दशक त्यासी मनोहर ॥ १६१ ॥
द्वितीय अष्टक ब्राह्मणासी । आठ प्रश्र्न परियेसीं ।
वेद उणे शतक त्यासी । अनुवाक असती मनोहर ॥ १६२ ॥
पांच शताउपरी । एक उणे चत्वारी ।
दशक आहेति विस्तारीं । एकचित्तें परियेसा ॥ १६३ ॥
तृतीयाष्टक ब्राह्मणासी । प्रश्र्न असती द्वादशी ।
नामें त्यांची परियेसीं । एकचित्तें अवधारा ॥ १६४ ॥
प्रथम प्रक्ष्न विख्यातु । नाम ‘ अग्निर्नःपातु ‘ ।
सहा अनुवाक विख्यातु । त्रीणि अधिक षष्ठी दशक ॥ १६५ ॥
‘ तृतीयस्य ‘ द्वितीय प्रश्र्न । अनुवाक दहा असती जाण ।
पंचाशीति दशक खूण । एकचित्तें परियेसा ॥ १६६ ॥
तिसरा प्रश्र्न ‘ प्रत्युष्ट ँे रक्ष ‘ । अनुवाक असती एकादश ।
एका उणे ऐशीं दशक । एकचित्तें अवधारा ॥ १६७ ॥
चौथा प्रश्र्न ‘ ब्रह्मणेसि ‘ । अनुवाक एक परियेसीं ।
एक उणे विसासी । दशक त्यासी मनोहर ॥ १६८ ॥
पंचम प्रश्र्न नाम ‘ सत्य ‘ । त्रयोदश अनुवाक विख्यात ।
एक उणें तीस दशक । एकचित्तें परियेसा ॥ १६९ ॥
सहावा प्रश्र्न ‘ अंजंति ‘ । पंचदश अनुवाक ख्याति ।
अष्ट अधिक त्रिंशति । दशक त्यासी जाणावे ॥ १७० ॥
‘ अच्छिद्र ‘ नाम प्रश्र्न । चतुर्दश अनुवाक जाण ।
तीस अधिक शत खूण । दशक त्यासी मनोहर ॥ १७१ ॥
प्रश्र्न अश्र्वमेधासी । ‘ सांग्रहण्या ‘ ख्यातीसी ।
अनुवाक असती त्रयोविंशी । एक-नवति दशक ॥ १७२ ॥
‘ प्रजापति ‘र्नाम । अश्र्वमेध असे उत्तम ।
त्रयोविंशति अनुवाक नेम । चार अधिक अशीति दशक त्यासी ॥ १७३ ॥
‘ संज्ञान ‘ म्हणिजे काठका । एकादश अनुवाक असती ऐका ।
एका उणे पन्नास दशक । एकचित्तें परियेसा ॥ १७४ ॥
दुसरा ‘ लोकोसि ‘ काठक । दश अनुवाक असती ऐक ।
दोनी अधिक षष्ठी दशक । व्यास म्हणे शिष्यासी ॥ १७५ ॥
द्वादश प्रश्र्न ‘ तुभ्य ‘ काठकासी । अनुवाक नव परियेसीं ।
सहा अधिक पन्नासासी । दशक त्यासि मनोहर ॥ १७६ ॥
तिसरे अष्टक ब्राह्मणांत । द्वादश प्रश्र्न विख्यात ।
अनुवाक एक शत षट्चत्वारिंशत । सातशत पंचाशीति दशक जाणा ॥ १७७ ॥
तीनी अष्टक ब्राह्मणासी । प्रश्र्न सांगेन परियेंसी ।
आठ अधिक विसांसी । एकचित्तें अवधारा ॥ १७८ ॥
त्रीणि शत विसांसी । एक अधिक परियेंसी ।
अनुवाक आहेति विस्तारेंसीं । ‘ परात्त ‘ ब्राह्मणासी परियेसा ॥ १७९ ॥
दशक संख्या विस्तार । अष्टशत अधिक सहस्र ।
त्रयोविंशति उत्तर । अधिक असती परियेसा ॥ १८० ॥
आतां सांगेन ‘ अरण्य ‘ । त्यासी असती दहा प्रश्र्न ।
विस्तारोनियां सांगेन । एकचित्ते अवधारा ॥ १८१ ॥
‘ भद्र ‘ नाम प्रथम प्रश्र्न । द्वात्रिंशत् अनुवाक खूण ।
एक शत तीस जाण । दशक त्यासी मनोहर ॥ १८२ ॥
‘ स्वाध्याय ‘ ब्राह्मणासी । अनुवाक वीस परियेसीं ।
चतुर्विंश दशक त्यासी । एकचित्तें परियेसा ॥ १८३ ॥
‘ चित्ती ‘ म्हणिजे प्रश्र्नासी । अनुवाक एकविंशी ।
तीन अधिक पन्नासासी । दशक त्यासी विस्तार ॥ १८४ ॥
असे थोर चवथा प्रश्र्न । नाम ‘ मंत्रब्राह्मण ‘ ।
द्विचत्वारि अनुवाक जाण । पंचाऐशीं दशक त्यासी ॥ १८५ ॥
‘ श्रेष्ठ ‘ ब्राह्मण प्रक्ष्नासी । अनुवाक जाणा द्वादशी ।
आठ अधिक शतासी । दशक तुम्ही जाणावे ॥ १८६ ॥
‘ पितृमेध ‘ असे प्रश्र्न । द्वादश अनुवाक परिपूर्ण ।
सप्तविंशती दशक जाण । एकचित्ते परियेसा ॥ १८७ ॥
‘ शिक्षा ‘ नाम प्रश्र्नासी । अनुवाक असती द्वादशी ।
तीन अधिक विसांसी । दशक त्यासी मनोहर ॥ १८८ ॥
‘ ब्रह्मवल्ली ‘ असे प्रश्रन । अनुवाक त्यासी नऊ जाण ।
चतुर्दश दशक असे खूण । व्यास म्हणे शिष्यांसी ॥ १८९ ॥
‘ भृगुवल्ली ‘ असे प्रश्र्न । अनुवाक त्यासी दहा जाण ।
पंचदश दशक जाण । एकचित्तें परियेसा ॥ १९० ॥
दशम प्रश्र्न ‘ नारायण ‘ । अनुवाक अशीति असती खूण ।
एकशत वेद जाण । दशक त्यासी परियेसा ॥ १९१ ॥
दहा प्रश्र्न अरणासी । अनुवाक जाण परियेसीं ।
दोनी शत पन्नासी । संख्या असे परियेसा ॥ १९२ ॥
पंचशताउपरी । ब्याऐशीं विस्तारीं ।
दशक जाणा मनोहरी । म्हणे व्यास शिष्यांते ॥ १९३ ॥
ऐसे ग्रंथत्रयासी । प्रश्र्न असती ब्यायशीं ।
एकविंशति अधिक द्विशतसहस्रासी । अनुवाक जाण मनोहर ॥ १९४ ॥
पन्नासा दशक विस्तार । सांगेन तुम्हां परिकर ।
द्वयशत दोनी सहस्र । द्वयउणे पन्नासा असती ॥ १९५ ॥
द्वयसहस्र चारी शत । सहा अधिक उन्नत ।
दशकीं जाण विख्यात । ग्रंथत्रय परिपूर्ण ॥ १९६ ॥
ऐशिया यजुर्वेदासी । भेद असती शायशीं ।
त्यांत एक भेदासी । एवढा असे विस्तार ॥ १९७ ॥
येणेपरी व्यासमुनीं । वैशंपायना विस्तारोनि ।
सांगितले म्हणोनि । श्रीगुरु म्हणती द्विजांसी ॥ १९८ ॥
तिसरा शिष्य जैमिनी । त्यासी सांगतसे व्यासमुनि ।
‘ सामवेद ‘ विस्तारोनि । निरोपीत अवधारा ॥ १९९ ॥
उपवेद गांधर्व अत्र । कश्यपाचें असे गोत्र ।
विष्णु असे दैवत । जगती छंद म्हणावा ॥ २०० ॥