श्री गुरु चरित्र परयाण का यह बीसवां अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 19
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 21
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा ।
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरुनि ॥ १ ॥
.
पुसतसे तयावेळीं । माथा ठेवोनि चरणकमळी ।
जय जया सिद्ध-स्तोममौळी । विनंति एक अवधारा ॥ २ ॥
स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी ।
गौप्यरुपें अमरापुरासी । औदुंबरीं असती म्हणतां ॥ ३ ॥
वर देऊनि योगिनींसी । आपण आले प्रकटेसी ।
पुढें तया स्थानीं कैसी । विस्तार झाला तें निरोपावें ॥ ४ ॥
वृक्ष सांगसी औदुंबरु । निश्र्चयें म्हणसी कल्पतरु ।
पुढें कवणा झाला वरु । निरोपावें दातारा ॥ ५ ॥
शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि ।
सांगतसे विस्तारुनि । औदुबरस्थानमहिमा ॥ ६ ॥
सिद्ध म्हणे ऐक बाळा । किती सांगू गुरुची लीळा ।
औदुंबरीं सर्वकाळ । वास आपण असे जाणा ॥ ७ ॥
जया नाम कल्पतरु । काय पुससी तयाचा वरु ।
जेथें वास श्रीगुरु । कल्पिलें फळ तेथें होय ॥ ८ ॥
अमित झाला तेथें महिमा । सांगावया अशक्य आम्हां ।
एखादा सांगों दृष्टांत तुम्हां । शिष्योत्तमा नामधारका ॥ ९ ॥
‘शिरोळ’ म्हणिजे ग्रामेसी । विप्र एक परियेसीं ।
‘गंगाधर’ नाम ऐसी । वेदरत होता जाणा ॥ १० ॥
त्याची भार्या पतिव्रता । शांत असे सुशीलता ।
तिसी पुत्र होती ते सवेंचि मृत्युता । कष्टतसे येणेंपरी ॥ ११ ॥
पांच पुत्र तिसी झाले । सवेंचि पंचत्व पावले ।
अनेक देव आराधिले । नव्हे कवणेपरी स्थिर ॥ १२ ॥
दुःख करी ते नारी । व्रतें उपवास अपरांपरी ।
पूर्वकर्म असे थोरी । स्थिर नोहे पुत्र तिसी ॥ १३ ॥
रहणी कर्मविपाकेसीं । विचार करिती तिच्या दोषासी ।
पुत्रशोक व्हावयासी। सांगती पातकें तये वेळी ॥ १४ ॥
सांगती विप्र विद्वज्जन । पुत्र न वांचती काय कारण ।
पूर्वजन्म-दोषगुण । विस्तार करिती तियेसी ॥ १५ ॥
गर्भपात स्त्रियांसी । जे जन करिती तामसी ।
पावती वांझ-जन्मासी । झाले पुत्र मरती जाणे ॥ १६ ॥
अश्र्ववध गोवध करी । वांझ होय सदा ज्वरी ।
एकादा परद्रव्य अपहारी । अपुत्री होय तो जाणा ॥ १७ ॥
विप्र म्हणती तियेसी । तुझे पूर्वजन्म-दोषी ।
दिसतसे आम्हांसी । सांगू ऐका एकचित्तें ॥ १८ ॥
शौनकगोत्री द्विजापाशी । रीण घेतलें द्रव्यासी ।
मागतां तुवां न देसी । कष्टला बहुत तो ब्राह्मण ॥ १९ ॥
लोभी होता तो ब्राह्मण । द्रव्यसंबंधे दिधला प्राण ।
आत्महत्या केलिया गुणें । तो पिशाच झाला असें ॥ २० ॥
गर्भपात करी तो तुज । जाहल्या मृत्यु करी तो द्विज ।
तुझें कर्म असे सहज । आपली जोडी भोगावी ॥ २१ ॥
ऐकोनि ब्राह्मणांचे वचन । विप्रवनिता खेदें खिन्न ।
अनुतप्त होऊनि अंतःकरण । द्विजचरणां लागली ॥ २२ ॥
कर जोडोनि तयेवेळीं । विनवीतसे करुणाबहाळी ।
माथा ठेवूनि चरणकमळीं । पुसतसे तयावेळी ॥ २३ ॥
ऐसी पापिणी दुराचारी । बुडाल्यें पापाचे सागरीं ।
स्वामी मातें तारीं तारीं । उपाय सांगणे म्हणतसे ॥ २४ ॥
ऐसीं पापें हळाहळी । आपण भक्षिलें चांडाळी ।
औषधी सांगा तुम्ही सकळीं । म्हणोनि सभेसी विनवीतसे ॥ २५ ॥
विप्र म्हणती तियेसी । तुवां केली ब्रह्महत्या दोषी ।
अपहारिलें द्रव्यासी । ब्राह्मण पिशाच जाहला असे ॥ २६ ॥
जघीं मेला द्विजवर । केली नाही क्रियाकर्म-पर ।
त्याचें द्रव्य तुवां सारें । भोगिलें असे जन्मांतरी ॥ २७ ॥
त्यासी करणे उद्धारगति । सोळावे कर्म करावे रीतीं ।
द्रव्य द्दावे एकशती । तथा गोत्रद्विजासी ॥ २८ ॥
तेणे होय तुज बरवें । एकोभावें आचरावें ।
कृष्णातीरी वास करावें । एक मास उपवासी ॥ २९ ॥
पंचगंगासंगमेसीं । तीर्थें असती बहुवसी ।
औदुंबरवृक्षासी । आराधावें परियेसा ॥ ३० ॥
पापविनाशी करुनि स्नान । वेळ सात औदुंबरस्नपन ।
अभिषेकोनि श्रीगुरुचरण । पुन्हां स्नान काम्यतीर्थी ॥ ३१ ॥
विधिपूर्वक श्रीगुरुचरणीं । पूजा करावीं भावोनि ।
येणेपरी भक्तीनें । मास एक आचरावें ॥ ३२ ॥
स्थान असे श्रीगुरुचें । नरसिंहसरस्वतीचें ।
तुझे दोष जातील साचे । पुत्र होतील शतायुषी ॥ ३३ ॥
मास आचरोनि येणेंपरी । मग ब्राह्मणातें पाचारीं ।
द्रव्य द्दावें शौनकगोत्री । द्विजवरासी एक शत ॥ ३४ ॥
त्याचेनि नामें कर्म सकळ । आचरावें मन निर्मळ ।
होतील तुझे कष्ट सफळ । श्रीगुरुनाथ तारील ॥ ३५ ॥
गुरुस्मरण करुनि मनीं । तूं पूजा करीं वो गुरुचरणीं ।
तुझे पाप होईल धुणी । ब्राह्मणसमंध परिहरेल ॥ ३६ ॥
ऐसें सांगतां द्विजवरीं । ऐकोनि सती चिंता करी ।
शतद्रव्य आमुच्या घरीं । कधीं न मिळे परियेसा ॥ ३७ ॥
कष्ट करीन आपुले देहीं । उपवासादि पूजा पाहीं ।
मासोपवास एकोभावीं । करीन आपण गुरुसेवा ॥ ३८ ॥
येणेंपरी तये नारी । सांगे आपुले निर्धारी ।
ऐकोनियां द्विजवरीं । निरोप देती तये वेळीं ॥ ३९ ॥
विप्र म्हणती ऐक बाळें । तूतें द्रव्य इतुकें न मिळे ।
सेवा करी वो मननिर्मळें । श्रीगुरुचरणीं तूं आतां ॥ ४० ॥
निष्कृति तुझिया पापासी । श्रीगुरु करील परियेंसीं ।
औदुंबरसंनिधेसी । वास असे निरंतर ॥ ४१ ॥
तो कृपाळू भक्तांसी । निवारील ब्रह्महत्यादोषासी ।
जितुकें येईल तुझ्या शक्तीसी । द्रव्य वेंची गुरुनिरोपें ॥ ४२ ॥
परिसोनि द्विजवचन । विप्रवनिता संतोषोन ।
गेली त्वरित ठाकोन । जेथे स्थान श्रीगुरुंचे ॥ ४३ ॥
स्नान करुनि संगमासी । पापविनाशी विधीसी ।
सात वेळ स्नपनेसी । करी औदुंबरी प्रदक्षिणा ॥ ४४ ॥
काम्यतीर्थी करुनि स्नान । पूजा करुनि श्रीगुरुचरण ।
प्रदक्षिणा करुनि नमन । करीतसे उपवास ॥ ४५ ॥
येणेपरी दिवस तीनी । सेवा करितां तें ब्राह्मणी ।
आला विप्र तिच्या स्वप्नी । द्रव्य मागे शत एक ॥ ४६ ॥
अद्दापि जरी न देसी । घेईन तुझे प्राणासी ।
पुढें तुझ्या वंशासी । वाढों नेदी अवधारीं ॥ ४७ ॥
वायां करिसी तूं सायासी । पुत्र कैचे तुझे वंशी ।
म्हणोनि कोपें मारावयासी । आला पिशाच स्वप्नांत ॥ ४८ ॥
भयचकित ते वनिता । औदुंबराआड रिघतां ।
तंव देखिलें श्रीगुरुनाथा । तयापाठी रिघाली ॥ ४९ ॥
अभय देवोनि नारीसी । वारिता झाला ब्राह्मणासी ।
पुसती श्रीगुरु तयासी । कां मारिसी स्त्रियेसी ॥ ५० ॥
विप्र विनवी श्रीगुरुसी । ” जन्मांतरी आपणासी ।
अपहार केला द्रव्यासी । प्राण त्यजिला यास्तव ॥ ५१ ॥
स्वामी कृपाळू सर्वांसी । आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी ।
तुम्ही यतीश्र्वर तापसी । पक्षपात करुं नये ” ॥ ५२ ॥
ऐकोनि तयाचे वचन । श्रीगुरु म्हणती कोपोन ।
“उपद्रव देसी भक्तजना । तूंतें शिक्षा करुं जाण ॥ ५३ ॥
आम्ही सांगो जेणें रीतीं । जरी ऐकसी हितार्थी ।
तुज होईल सद्गति । पिशाचत्व परिहरेल ॥ ५४ ॥
जें काय देईल विप्रवनिता । तुवां अंगीकारावें सर्वथा ।
जरी न ये तुझ्या चित्ता । जाई आतां येथोन ॥ ५५ ॥
राखीन माझिया भक्तांसी । वंशोवंशीं अभिवृद्धीसी ।
पुनरपि जरी पाहूं येसी । शिक्षा करुं ” म्हणती गुरु ॥ ५६ ॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विप्र-पिशाच करी नमन ।
“स्वामी तुझे देखिले चरण । उद्धरावें आपणासी ॥ ५७ ॥
जेणेपरी आपणासी । होय गति उद्धरावयासी ।
निरोप देसी करुणेसी । अंगिकारुं स्वामिया” ॥ ५८ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । विप्रवनिता भावेसीं ।
करील कर्म दहा दिवशी । गति होईल तूंतें जाणा ॥ ५९ ॥
येणेपरी तयासी । निरोप देती स्त्रियेसी ।
जें असेल तुजपाशीं । आचरीं कर्म तया नामी ॥ ६० ॥
अष्टतीर्थी स्नान करीं । तया नामें अवधारीं ।
सात दिवस येणेंपरी । स्नपन करीं औदुंबरा ॥ ६१ ॥
ब्रह्महत्या तुझे दोषी । जातील त्वरित भरंवसीं ।
कन्यापुत्र पूर्णायुषी । होतील म्हणती श्रीगुरु ॥ ६२ ॥
ऐसें देखोनि जागृती । विप्रवनिता भयचकिती ।
ज्ञानें पाहे श्रीगुरुमूर्ति । न विसंबे मनांत ॥ ६३ ॥
श्रीगुरुनिरोपे दहा दिवस । केलें आचरण परियेस ।
ब्रह्महत्या गेला दोष । गति झाली ब्राह्मणासी ॥ ६४ ॥
येरे दिवशी स्वप्नांत । प्रत्यक्ष आले श्रीगुरुनाथ ।
नारिकेल दोन देत । भरली ओटी तियेची ॥ ६५ ॥
म्हणे पारणें करी वो तूं आतां । पुत्र होतील वेदरता ।
वाढे त्यांची संतति बहुता । चिंता न करीं अहो बाळे ॥ ६६ ॥
गुरुनिरोपे आराधन । करिती दंपती मनःपूर्ण ।
प्रकट झाला श्रीगुरुराणा । संपर्क लोह-परिसापरी ॥ ६७ ॥
चिंतामणिस्पर्श होतां । लोहपाषाणा कांचनता ।
तैसी ते विप्रवनिता । पापावेगळी त्वरित जाहली ॥ ६८ ॥
पुढें तया नारीसी । पुत्रयुग्म सद्वंशीं ।
झाले श्रीगुरुकृपेसीं । एकचित्तें परियेसा ॥ ६९ ॥
व्रतबंध करिती ज्येष्ठासी । समारंभ अनंत हर्षी ।
चौलकर्म दुजियासी । करुं पहाती मातापिता ॥ ७० ॥
समारंभ करी जननी । चौलकर्म करणें मनीं ।
पुत्रासी जाहलीं वर्षे तीन्ही । अत्योल्हास मानसीं ॥ ७१ ॥
समारंभ अतिप्रीतीं । करिती झाली आयती ।
पूर्व दिवसीं मध्यरात्री । आली व्याधि कुमरासी ॥ ७२ ॥
व्याधि असती अष्टोत्तर । एकाहूनि एक थोर ।
तयामध्यें जो का तीव्र । धनुर्वात तयासी ॥ ७३ ॥
अवयव वांकोनि । दिसे भयानक नयनीं ।
येणेपरी दिवस तीन्ही । कष्टतसे तो बाळ ॥ ७४ ॥
तया दिवशीं अस्तमानीं । पंचत्व पावला तत्क्षणी ।
शोक करिती जनक जननी । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ७५ ॥
आक्रोशोनि भूमीसी । आफळी शिर सत्राणेसी ।
पाषाण घेवोनि उरासी । घात करी ते नारी ॥ ७६ ॥
देह टाकी धरणीवरी । निर्जीव होवोनि क्षणभरी ।
आठवी दुःख अपरांपरी । नयनीं वाहे पूर्ण जळ ॥ ७७ ॥
प्रेतपुत्रावरी लोळे । आलिंगोनि परिबळें ।
वेष्टोनियां मायाजाळें । प्रलापीतसे ते नारी ॥ ७८ ॥
.
म्हणे ताता पुत्रराया । प्राणरक्षका माझ्या प्रिया ।
मातें केवीं सोडूनियां । जासी कठोर मन करुनि ॥ ७९ ॥
कोठें गेलासी खेळावया । स्तनींचे क्षीर जातसे वायां ।
शीघ्र येई गा ठाकोनियां । पुत्रराया परियेसीं ॥ ८० ॥
केवीं विसरुं तुझे गुण । माझा तूंचि निधान ।
तुझें गोजिरें बोलणें । केवीं विसरुं पुत्रराया ॥ ८१ ॥
तुझे रुपासारखा सुत । केवीं देखों मी निश्र्चित ।
निधान देखत्यें स्वप्नांत । तैसे मज चाळविलें ॥ ८२ ॥
पुत्र व्याले पांच आपण । त्यांत तूं एक निधान ।
जघीं झालें गर्भधारण । तैंपासाव संतोष ॥ ८३ ॥
डोहळे मज उत्तम होती । कधी नसे मी दुश्र्चिती ।
अत्योल्हास नवमासांतीं । पुत्र होईल म्हणोनि ॥ ८४ ॥
श्रीगुरुंनी दिधला मातें वर । पुत्र होईल निर्धार ।
त्याणें मज हर्ष फार । वरद पिंड म्हणोनि ॥ ८५ ॥
जघीं तुज प्रसुत जाहल्यें । अनंत सौख्य मीं लाधलें ।
प्राणप्रिया तुज मीं पोसिलें । आमुतें रक्षिसी म्हणोनि ॥ ८६ ॥
मज भरंवसा तुझा बहुत । वृद्धाप्याचा पोषक म्हणत ।
आम्हांसी सांडूनि जातां उचित । धर्म नव्हे पुत्रराया ॥ ८७ ॥
दुःख झालें मज बहुत । विसरल्यें बाळा तुज देखत ।
तूं तारक आमुचा सत्य । म्हणोनि विश्र्वास केला जाण ॥ ८८ ॥
ऐसें नानापरी देखा । दुःख करी ते बाळिका ।
निवारण करिती सकळ लोक । वायां दुःख तूं कां करिसी ॥ ८९ ॥
देवदानवऋषेश्र्वरांसी । होणार न चुके परियेसीं ।
ब्रह्मा लिही ललाटेसी । तेंचि अढळ जाण सत्य ॥ ९० ॥
अवतार होताति हरिहर । तेहि न राहाती स्थिर ।
तुम्ही तरी मनुष्य नर । काय अढळ तुम्हांसी ॥ ९१ ॥
येणेपरि सांगती जन । आणखी दुःख आठवी मन ।
म्हणे मातें दिधली जाण । स्थिर म्हणोनि दोन्ही फळें ॥ ९२ ॥
श्रीगुरु-नरसिंहसरस्वती । भूमंडळीं महाख्याति ।
औदुंबरी सदा वसती । त्यांणीं दिधले मज सुत ॥ ९३ ॥
त्याचे बोल केवी मिथ्या । मातें दिधला वर सत्या ।
त्यासी घडो माझी हत्या । पुत्रासवें देईन प्राण ॥ ९४ ॥
म्हणोनि आठवी श्रीगुरुसी । देवा मातें गांजिलेंसी ।
विश्र्वास केला मी तुम्हांसी । सत्य वाक्य तुझें म्हणत ॥ ९५ ॥
सत्यसंकल्प तूंचि होसी । म्हणोनि होत्यें विश्र्वासीं ।
घात केला गा आम्हांसी । विश्र्वासघातकी केवीं न म्हणो ॥ ९६ ॥
त्रयमूर्तीचा अवतारु । तूंचि नरसिंहसरस्वती गुरु ।
ध्रुवा बिभीषणा दिधला वरु । केवीं सत्य म्हणों आतां ॥ ९७ ॥
विश्र्वास केला तुझे बोलें । आतां मातें उपेक्षिलें ।
माझ्या मनीं निश्र्चय केला । प्राण देईन तुम्हांवरी ॥ ९८ ॥
लोक येती तुझ्या स्थानीं । सेवा करिती निवसोनि ।
औदुंबरीं प्रदक्षिणा करुनि । पुरश्र्चरणें करिताति ॥ ९९ ॥
आपण केलें पुरश्र्चरण । फळा आलें मज साधन ।
आतां तुजवर देईन प्राण । काय विश्र्वास तुझ्या स्थानीं ॥ १०० ॥
कीर्ति होईल सृष्टींत । आम्हां केला तुवा घात ।
पुढें तुज भजती भक्त । काय भरंवसा तयांसी ॥ १०१ ॥
ब्रह्मस्वदोषें पीडोन । दृढ धरिले तुझे चरण ।
अंगीकारोनि मध्यें त्यजणें । कवण धर्म घडतसे ॥ १०२ ॥
व्याघ्रातें धेनु भिऊन । जाय आणिकापाशीं ठाकून ।
तोचि माझारी घे तिचा प्राण । तयापरीं झालें आपणासी ॥ १०३ ॥
कीं एखादा पूजेसी । जाय देउळा संधीसी ।
तेंचि देऊळ तयासी । मृत्यु होऊनि वर पडे ॥ १०४ ॥
तयापरी आपणासी । जाहलें स्वामी परियेसीं ।
माझ्या प्राणसुतासी । न राखिसी देवराया ॥ १०५ ॥
येणेंपरी अहोरात्रीं । दुःख करीतसे ते नारी ।
उदय जाहला दिनकरीं । प्रातःकाळीं परियेसा ॥ १०६ ॥
द्विज ज्ञाते मिळोनी सकळी । येती तये स्त्रियेजवळी ।
वायां दुःख सर्वकाळीं । करिसी मूर्खपणें तूं ॥ १०७ ॥
जे जे समयीं होणार गति । ब्रह्मादिकां न चुके ख्याति ।
चला जाऊं गंगेप्रती । प्रेतसंस्कार करुं आतां ॥ १०८ ॥
ऐसें वचन ऐकोनि । महा आक्रोश करी मनीं ।
आपणासहित घाला वन्हीं । अथवा नेदी प्रेतासी ॥ १०९ ॥
आपणासहित बाळासी । करा पां अग्निप्रवेशी ।
येरवीं नेदीं प्रेतासी । म्हणोनि उरी बांधी बाळा ॥ ११० ॥
लोक म्हणती तियेसी । नव्हसी तूं स्त्री, कर्कशी ।
प्रेतासवें प्राण देसी । कवण धर्म सांग आम्हां ॥ १११ ॥
नाहीं देखिलें न ऐकों कानीं । पुत्रासवें देती प्राण कोणी ।
वायां बोलसी मूर्खपणीं । आत्महत्या महादोष ॥ ११२ ॥
नानापरी तियेसी । बोधिती लोक परियेसीं ।
निश्र्चय तिनें केला ऐसी । प्राण त्यजीन पुत्रासवे ॥ ११३ ॥
दिवस गेला दोन प्रहर । प्रेतासी करुं नेदी संस्कार ।
अथवा न ये गंगातीरा । ग्रामीं आकांत वर्तला ॥ ११४ ॥
इतुकिया अवसरीं । आला एक ब्रह्मचारी ।
सांगे तिसी सविस्तारीं । आत्मज्ञान तये वेळीं ॥ ११५ ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।
ब्रह्मचारी आला एका । बोधिता झाला ज्ञान तिसी ॥ ११६ ॥
बाळ नव्हे तोचि गुरु । आला नरवेषधारु ।
नरसिंहसरस्वती अवतारु । भक्तवत्सल परियेसा ॥ ११७ ॥
म्हणोनि सरस्वती गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । शतायुषी पुरुष होय ॥ ११८ ॥
भक्तिपूर्वक ऐकती जरी । व्याधि नव्हती त्यांचे शरीरीं ।
पूर्णायुषी ते होती अमरी । सत्य माना माझा बोल ॥ ११९ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
ब्रह्मसमंधपरिहारप्रेतजननीशोकनं नाम विंशोsध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 19
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 21
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.