श्री गुरु चरित्र परयाण का यह अठारह अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 17
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 19
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगुरूचरित्र अध्याय अठरावा
श्री गणेशाय नमः I श्री सरस्वत्यै नमः I श्री गुरुभ्यो नमः I
जय जया सिद्धमुनि I तूं तारक भवार्णी I
सुधारस आमुचे श्रवणीं I पूर्ण केला दातारा II १ II
गुरुचरित्र कामधेनु I ऐकतां न धाये माझें मन I
कांक्षीत होतें अंतःकरण I कथामृत ऐकावया II २ II
ध्यान लागलें श्रीगुरूचरणीं I तृप्ति नव्हे अंतःकरणीं I
कथामृत संजीवनी I आणिक निरोपावें दातारा II ३ II
येणेंपरी सिद्धासी I विनवी शिष्य भक्तीसीं I
माथा लावूनि चरणांसी I कृपा भाकी तये वेळीं II ४ II
शिष्यवचन ऐकोनि I संतोषला सिद्धमुनि I
सांगतसे विस्तारोनि I ऐका श्रोते एकचित्तें II ५ II
ऐक शिष्या-शिखामणि I धन्य धन्य तुझी वाणी I
तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं I तल्लीन झाली परियेसा II ६ II
तुजकरितां आम्हांसी I चेतन जाहलें परीयेसीं I
गुरुचरित्र आद्यंतेसीं I स्मरण जाहलें अवधारीं II ७ II
भिल्लवडी स्थानमहिमा I निरोपिला अनुपमा I
पुढील चरित्र उत्तमा I सांगेन ऐका ऐकचित्तें II ८ II
व्कचित्काळ तये स्थानीं I श्रीगुरू होते गौप्योनि I
प्रकट जहाले म्हणोनि I पुढें निघाले परियेसा II ९ II
वरुणासंगम असे ख्यात I दक्षिणवाराणसी म्हणत I
श्रीगुरू आले अवलोकित I भक्तानुग्रह करावया II १० II
पुढें कृष्णातटाकांत I श्रीगुरू तीर्थें पावन करीत I
पंचगंगासंगम ख्यात I तेथें राहिले द्वादशाब्दें II ११ II
अनुपम्य तीर्थ मनोहर I जैसें अविमुक्त काशीपुर I
प्रयागासमान तीर्थ थोर I म्हणोनि राहिले परियेसा II १२ II
कुरवपुर ग्राम गहन I कुरुक्षेत्र तेंचि जाण I
पंचगंगासंगम कृष्णा I अत्योत्तम परियेसा II १३ II
कुरुक्षेत्रीं जितकें पुण्य I तयाहूनि अधिक असे जाण I
तीर्थे असतीं अग्रण्य I म्हणोनि राहिले श्रीगुरू II १४ II
पंचगंगानदीतीर I प्रख्यात असे पुराणांतर I
पांच नामें आहेति थोर I सांगेन ऐका एकचित्तें II १५ II
शिवा-भद्रा-भोगावती I कुंभीनदी-सरस्वती I
‘ पंचगंगा ‘ ऐसी ख्याति I महापातक संहारी II १६ II
ऐसी प्रख्यात पंचगंगा I आली कृष्णेचिया संगा I
प्रयागाहूनि असें चांगा I संगमस्थान मनोहर II १७ II
अमरापुर म्हणिजे ग्राम I स्थान असे अनुपम्य I
जैसा प्रयागसंगम I तैसें स्थान मनोहर II १८ II
वृक्ष असे औम्दुबरु I प्रत्यक्ष जाणा कल्पतरू I
देव असे अमरेश्वरू I तया संगमा षट्कूळी II १९ II
जैसी वाराणसी पुरी I गंगाभागीरथी-तीरीं I
पंचनदी संगम थोरी I तत्समान परियेसा II २० II
अमरेश्वर संनिधानीं I आहेति चौसष्ट योगिनी I
शक्तितीर्थ निर्गुणी I प्रख्यात असे परियेसा II २१ II
अमरेश्वरलिंग बरवें I त्यासी वंदूनि स्वभावें I
पूजितां नर अमर होय I विश्वनाथ तोचि जाणा II २२ II
प्रयागीं करितां माघस्नान I जें पुण्य होय साधन I
शतगुण होय तयाहून I एक स्नानें परियेसा II २३ II
सहज नदीसंगमांत I प्रयागसमान असे ख्यात I
अमरेश्वर परब्रह्म वस्तु I तया स्थानीं वास असे II २४ II
याकारणें तिये स्थानीं I कोटितीर्थे असतीं निर्गुणी I
वाहे गंगा दक्षिणी I वेणीसहित निरंतर II २५ II
अमित तीर्थें तया स्थानीं I सांगतां विस्तार पुराणीं I
अष्टतीर्थ ख्याति जाग्रणी I तया कृष्णातटाकांत II २६ II
उत्तर दिशीं असे देखा I वाहे कृष्णा पश्चिममुखा I
शुक्लतीर्थ नाम ऐका I ब्रह्महत्यापाप दूर II २७ II
औदुम्बर सन्मुखेसी I तीनी तीर्थें परियेसीं I
एकानंतर एक धनुषी I तीर्थें असती मनोहर II २८ II
” पापविनाशी ” ‘काम्यतीर्थ ‘ I तिसरें सिद्ध ‘वरदतीर्थ ‘ I
अमरेश्वरसंनिधार्थ I अनुपम्य असे भूमंडळीं II २९ II
पुढें संगम-षट्कूळांत I ‘ प्रयागतीर्थ ‘ असे ख्यात I
‘ शक्तितीर्थ ‘ ‘ अमरतीर्थ ‘ I ‘ कोटितीर्थ ‘ परियेसा II ३० II
तीर्थें असती अपरांपर I सांगतां असे विस्तार I
याकारणें श्रीपाद्गुरू I राहिले तेथें द्वादशाब्दें II ३१ II
कृष्णा वेणी नदी दोनी I पंचगंगा मिळोनि I
सप्तनदीसंगम सगुणी I काय सांगूं महिमा त्यांची II ३२ II
ब्रह्महत्यादि महा पातकें I जळोनि जातीं स्नानें एकें I
ऐसें सिद्धस्थान निकें I सकळाभीष्ट होय तेथें II ३३ II
काय सांगूं त्यांची महिमा I आणिक द्दावया नाही उपमा I
दर्शनमात्रें होती काम्या I स्नानफळ काय वर्णूं II ३४ II
साक्षात् कल्पतरु I असे वृक्ष औदुम्बरु I
गौप्य होऊन अगोचरु I राहिले श्रीगुरु तया स्थानीं II ३५ II
भक्तजनतारणार्थ I होणार असे तीर्थ ख्यात I
राहिले तेथें श्रीगुरुनाथ I म्हणोनि प्रकट जाहले जाणा II ३६ II
असतां पुढें वर्तमानीं I भिक्षा करावया प्रतिदिनीं I
अमरापुरग्रामीं I जाती श्रीगुरू परियेसा II ३७ II
तया ग्रामीं द्विज एक I असे वेदाभ्यासक I
त्याची भार्या पतिसेवक I पतिव्रताशिरोमणी II ३८ II
सुक्षीण असे तो ब्राह्मण I शुक्लभिक्षा करी आपण I
कर्ममार्गी आचरण I असे सात्विक वृत्तीनें II ३९ II
तया विप्रमंदिरांत I असे वेल उन्नत I
शेंगा निघती नित्य बहुत I त्याणें उदरपूर्ति करी II ४० II
एखादे दिवशीं त्या ब्राह्मणासी I वरो न मिळे परियेसीं I
तया शेंगांतें रांधोनि हर्षी I दिवस क्रमी येणेंपरी II ४१ II
ऐसा तो ब्राह्मण दरिद्री I याचकपणें उदर भरी I
पंचमहायज्ञ कुसरी I अतिथी पूजी भक्तीनें II ४२ II
वर्ततां श्रीगुरू एके दिवसीं I तया विप्रमंदिरासी I
गेले आपण भिक्षेसी I नेलें विप्रें भक्तीनें II ४३ II
भक्तिपूर्वक श्रीगुरूसी I पूजा करी तो षोडशी I
घेवडे-शेंगा बहुवसी I केली होती पत्र-शाका II ४४ II
भिक्षा करून ब्राह्मणासी I आश्र्वासिती गुरु संतोषीं I
गेले तुझे दरिद्र दोषी I म्हणोनि निघती तये वेळीं II ४५ II
तया विप्राचे गृहांत I जो का होता वेल उन्नत I
घेवडा नाम विख्यात I आंगण सर्व वेष्टिलें असे II ४६ II
तया वेलाचें झाडमूळ I श्रीगुरूमूर्ति छेदिती तात्काळ I
टाकोनि देती परिबळे I गेले आपण संगमासी II ४७ II
विप्रवनिता तये वेळीं I दुःख करिती पुत्र सकळी I
म्हणती पहा हो दैव बळी I कैसें अदृष्ट आपुलें II ४८ II
आम्हीं तया यतीश्र्वरासी I काय उपद्रव केला त्यासी I
आमुचा ग्रास छेदुनि कैसी I टाकोनि दिल्हा भूमीवरी II ४९ II
ऐसेपरी ते नारी I दुःख करी नानापरी I
पुरुष तिचा कोप वारी I म्हणे प्रारब्ध प्रमाण II ५० II
म्हणे स्त्रियेसी तये वेळीं I जें जें होणार जया काळीं I
निर्माण करी चंद्रमौळी I तया आधीन विश्व जाण II ५१ II
विश्वव्यापक नारायण I उत्पत्तिस्थितिलया कारण I
पिपीलिकादि स्थूळ-जीवन I समस्तां आहार पुरवीतसे II ५२ II
‘ आयुरन्नं प्रयच्छती ‘ I ऐसें बोले वेदश्रुति I
पंचानन आहार हस्ती I केवीं करी प्रत्यहीं II ५३ II
चौर्यायशीं लक्ष जीवराशी I स्थूल सूक्ष्म समस्तांसी I
निर्माण केले आहारासी I मग उत्पत्ति तदनंतरे II ५४ II
रंकरायासी एक दृष्टीं I करूनी पोषितो हे सर्व सृष्टि I
आपुलें आर्जव बरवें वोखटी I तैसे फळ आपणासी II ५५ II
पूर्वजन्मीचें निक्षेपण I सुकृत अथवा दुष्कृत जाण I
आपुलें आपणचि भोगणें I पुढिल्यावरी काय बोल II ५६ II
आपुलें दैव असतां उणें I पुढिल्या बोलती मूर्खपणें I
जें पेरिलें तेंचि भक्षणें I कवणावरी बोल सांगे II ५७ II
बोल ठेविसी यतीश्वरासी I आपलें आर्जव न विचारिसी I
ग्रास हरितला म्हणसी I अविद्यासागरी बुडोनि II ५८ II
तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I
नेलें आमुचे दरिद्रदोषी I तोचि तारील आमुतें II ५९ II
येणेंपरी स्त्रियेसी I संभाषी विप्र परियेसीं I
काढोनि वेलशाखेसी I टाकीता झाला गंगेंत II ६० II
तया वेलाचें मूळ थोरी I जें कां होतें आपुलें द्वारीं I
काढूं म्हणूनि द्विजवरीं I खणिता झाला तया वेळीं II ६१ II
काढितां वेलमूळासी I लाधला कुंभ निधानेसीं I
आनंद जाहला बहुवसी I घेऊनि गेला घरांत II ६२ II
म्हणती नवल काय वर्तलें I यतीश्वर आम्हां प्रसन्न झाले I
म्हणोनि ह्या वेला छेदिलें I निधान लाधलें आम्हांसी II ६३ II
नर नव्हे तो योगीश्वर I होईल ईश्वरीअवतार I
आम्हां भेटला दैन्यहर I म्हणती चला दर्शनासी II ६४ II
जाऊनि संगमा श्रीगुरूसी I पूजा करिती बहुवसी I
वृतांत सांगती तयांसी I तये वेळीं परियेसा II ६५ II
श्रीगुरू म्हणती तयासी I तुम्हीं न सांगणें कवणासी I
प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II ६६ II
ऐसेपरी तया द्विजासी I सांगे श्रीगुरू परियेसीं I
अखंड लक्ष्मी तुमचे वंशीं I पुत्रपौत्रीं नांदाल II ६७ II
ऐसा वर लाधोन I गेली वनिता तो ब्राह्मण I
श्रीगुरूकृपा ऐसी जाण I दर्शनमात्रें दैन्य हरे II ६८ II
ज्यासी होय श्रीगुरूकृपा I त्यासी कैचें दैन्य पाप I
कल्पवृक्ष आश्रय करितां बापा I दैन्य कैंचें तया घरीं II ६९ II
दैवें उणा असेल जो नरु I त्याणें आश्रयावा श्रीगुरू I
तोचि उतरेल पैलपारु I पूज्य होय सकळिकांसी II ७० II
जो कोण भजेल श्रीगुरू I त्यासी लाधेल इह परू I
अखंड लक्ष्मी त्याचे घरीं I अष्ट ऐश्वर्ये नांदती II ७१ II
सिद्ध म्हणे नामधारकासी I श्रीगुरूमहिमा असे ऐसी I
भजावें तुम्हीं मनोमानसीं I कामधेनु तुझ्या घरीं II ७२ II
गंगाधराचा कुमर I सांगे श्रीगुरूचरित्रविस्तार I
पुढील कथामृतसार I ऐका श्रोते एकचित्तें II ७३ II
II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोSध्यायः II
श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु II
श्रीगुरुदेवदत्त II शुभं भवतु II
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 17
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 19
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.