गुरुनिरोपें येरे दिवशी । गुरे नेऊनि रानासी ।
मागे भिक्षा नित्य जैसी । नेऊनि दिधली घरांत ॥ १०१ ॥
घरीं त्यासी भोजन । कधी नव्हे परिपूर्ण ।
पुनरपि जाई तया स्थाना । भिक्षा करुनि जेवीतसे ॥ १०२ ॥
नित्य भिक्षा वेळां दोनी । पहिली भिक्षा देवोनि सदनीं ।
दुसरी आपण भक्षूनि । काळ ऐसा कंठीतसे ॥ १०३ ॥
येणेपरी किंचित्काळ । वर्ततां जाहला महास्थूळ ।
एके दिवशी गुरु कृपाळ । पुसतसे शिष्यातें ॥ १०४ ॥
शिष्य सांगे वृत्तांत । जेणें आपुली क्षुधा शमत ।
नित्य भिक्षा मागत । वेळ दोनी म्हणतसे ॥ १०५ ॥
एक वेळ घरासी । आणोनि देतों प्रतिदिवसीं ।
भिक्षा दुसरे खेपेसी । करितों भोजन आपण ॥ १०६ ॥
ऐसें म्हणतां धौम्यमुनि । तया शिष्यावरी कोपोनि ।
म्हणे भिक्षा वेळ दोनी । आणूनि घरीं देईं पां ॥ १०७ ॥
गुरुनिरोपे जेणेपरी । दोनी भिक्षा आणूनि घरी ।
देता जाहला प्रीतिकरीं । मनीं क्लेश न करीच ॥ १०८ ॥
गुरेंसहित रानांत । असे शिष्य क्षुधाक्रांत ।
गोवत्स होतें स्तन पीत । देखता जाहला तयासी ॥ १०९ ॥
स्तन पीतां वांसुरासी । उच्छिष्ट गळे संधीसी ।
वायां जातें भूमीसी । म्हणोनि आपण जवळी गेला ॥ ११० ॥
आपण असे क्षुधाक्रांत । म्हणोनि गेला धांवत ॥ १११ ॥
ऐसें क्षीरपान करीं । घेऊनि आपुलें उदर भरी ।
दोनी वेळ भिक्षा घरीं । देतसे भावभक्तीनें ॥ ११२ ॥
अधिक पुष्ट जाहला त्याणें । म्हणे गुरु अवलोकून ।
पहा हो याचें शरीरलक्षण । कैसा स्थूळ होतसे ॥ ११३ ॥
मागुती पुसे तयासी । कवणेपरी पुष्ट होसी ।
सांगे आपुलेवृत्तांतासी । उच्छिष्ट क्षिर पान करितो ॥ ११४ ॥
ऐकोनि म्हणे शिष्यासी । मतिहीन होय उच्छिष्टेसी ।
दोष असे बहुवसी । भक्षूं नको आजिचेनि ॥ ११५ ॥
भक्षूं नको म्हणे गुरु । नित्य नाही तया आहारु ।
दुसरे दिवशीं म्हणे येरु । काय करुं म्हणतसे ॥ ११६ ॥
येणेपरी गुरेंसहित । जात होता रानांत ।
गळत होतें क्षीर बहुत । एका रुईचे झाडासी ॥ ११७ ॥
म्हणे बरवें असे क्षीर । उच्छिष्ट नव्हे निर्धार ।
पान करुं धणीवर । तंव भरिलें अक्षियांते ॥ ११८ ॥
पानें तोडूनि कुसरी । तयामध्यें क्षीर भरी ।
घेत होता धणीवरी । तंव भरिलें अक्षियांते ॥ ११९ ॥
तेणें गेले नेत्र दोनी । हिंडतसे रानोवनीं ।
गुरे न दिसती नयनीं । म्हणोनि चिंता करीतसे ॥ १२० ॥
काष्ट नाही अक्षिहीन । करीतसे चिंता गोधना ।
गुरें पाहों जातां राना । पडिला एका आडांत ॥ १२१ ॥
पडोनियां आडांत । चिंता करी तो अत्यंत ।
आतां गुरें गेलीं सत्य । बोल गुरुचा आला मज ॥ १२२ ॥
पडिला शिष्य तया स्थानीं । दिवस गेला अस्तमानीं ।
चिंता करी धौम्यमुनि । अजून शिष्य न येचि कां ॥ १२३ ॥
म्हणोनि गेला रानासी । देखे तेथें गोधनासी ।
शिष्य नाहीं म्हणोनि क्लेशी । दीर्घस्वरे पाचारी ॥ १२४ ॥
पाचारितां धौम्यमुनि । ध्वनि पडला शिष्यकानीं ।
प्रत्योत्तर देतांक्षणी । जवळी गेला कृपाळू ॥ १२५ ॥
ऐकोनियां वृतांत । उपजे कृपा अत्यंत ।
अश्विनी देवा स्तवीं म्हणत । निरोप दिधला तये वेळी ॥ १२६ ॥
निरोप देतां तये क्षणी । अश्विनी देवता ध्याय मनीं ।
दृष्टि आली दोनी नयनी । आला श्रीगुरुसन्मुखेसीं ॥ १२७ ॥
येवोनि श्रीगुरुसी । नमन केलें भक्तीसीं ।
स्तुति केली बहुवसी । शिष्योत्तमे तये वेळीं ॥ १२८ ॥
संतोषोनि धौम्यमुनि । तया शिष्या आलिंगोनि ।
म्हणे शिष्या शिरोमणी । तुष्टलो तुझ्या भक्तीसी ॥ १२९ ॥
प्रसन्न होऊनि शिष्यासी । हस्त स्पर्शीं मस्तकेसी ।
वेदशास्रदि त्तक्षणेसी । आली तया शिष्यातें ॥ १३० ॥
गुरु म्हणे शिष्यासी । जावें आपुले घरासी ।
विवाहादि करुनि सुखेसी । नांदत ऐस म्हणतसे ॥ १३१ ॥
होईल तुझी बहु कीर्ति । शिष्य होतील तुज अत्यंती ।
‘ उत्तंक ‘ नाम विख्याति । शिष्य तुझा परियेसीं ॥ १३२ ॥
तोचि तुझ्या दक्षिणेसी । आणील कुंडलें परियेसी ।
जिंकोनियां शेषासी । किर्तिवंत होईल ॥ १३३ ॥
जन्मेजय रायासी । तोच करील उपदेशी ।
मारवील समस्त सर्पांसी । याग करुनि परियेसा ॥ १३४ ॥
तोचि उत्तंक जाऊन । पुढें केला सर्पयज्ञ ।
जन्मेजयातें प्रेरुन । समस्त सर्प मारविले ॥ १३५ ॥
ख्याति जाहली त्रिभुवनांत । तक्षक आणिला इंद्रासहित ।
गुरुकृपेचे सामर्थ्य । ऐसे असे परियेसा ॥ १३६ ॥
जो नर असेल गुरुदूषक । त्यासी कैंचा परलोक ।
अंतीं होय कुंभीपाक । गुरुद्रोह-पातक्यासी ॥ १३७ ॥
संतुष्ट करितां गुरुसी । काय न साधे तयासी ।
वेदशास्र तयासी । लाधे क्षण न लागतां ॥ १३८ ॥
ऐसें तूं जाणोनि मानसी । वृथा हिंडसी अविद्येसीं ।
जावें आपुले गुरुपाशीं । तोचि तुज तारील सत्य ॥ १३९ ॥
त्याचें मन संतुष्टवितां । तुज मंत्र साध्य तत्त्वता ।
मन करुनि सुनिश्र्चिता । त्वरित जाईं म्हणितलें ॥ १४० ॥
ऐसा श्रीगुरु निरोप देतां । विप्र जाहला अतिज्ञाता ।
चरणांवरी ठेवूनि माथा । विनवीतसे तया वेळी ॥ १४१ ॥
जय जया गुरुमूर्ति । तूंचि साधन परमार्थी ।
मातें निरोपिलें प्रीतीं । तत्तवबोध कृपेनें ॥ १४२ ॥
गुरुद्रोही आपण सत्य । अपराध घडले मज बहुत ।
गुरुचें दुखविलें चित्त । आतां केवीं संतुष्टवावें ॥ १४३ ॥
सुवर्णादि लोह सकळ । भिन्न होतां सांधवेल ।
भिन्न होतां मुक्ताफळ । केवीं पुन्हा ऐक्य होय ॥ १४४ ॥
अंतःकरण भिन्न होतां । प्रयास असे ऐक्य करितां ।
ऐसे माझे मन पतित । काय उपयोग जीवूनि ॥ १४५ ॥
ऐसे शरिर माझे द्रोही । काय उपयोग वांचून पाहीं ।
जीवित्वाची वासना नाहीं । प्राण त्यजीन गुरुप्रति ॥ १४६ ॥
ऐसेपरि श्रीगुरुसी । विनवितो ब्राह्मण हर्षी ।
नमूनि निघे वैराग्येसीं । निश्र्चय केला प्राण त्यजूं ॥ १४७ ॥
अनुतप्त जाहला तो ब्राह्मण । निर्मळ जाहलें अंतःकरण ।
अग्नि लागतां जैसे तृण । भस्म होय तत्क्षणीं ॥ १४८ ॥
जैसा कापूरराशीस । वन्ही लागतां परियेसीं ।
जळोनि जाय त्वरितेसी । तैसे तयासी जहालें ॥ १४९ ॥
याकारणें पापासी । अनुतप्त होतां मानसीं ।
क्षालण होय त्वरितेसी । शतजन्मींचे पाप जाय ॥ १५० ॥
निर्वाणरुपें द्विजवर । निघाला त्यजूं कलेवर ।
ओळखोनियां जगद्गुरु । पाचारिती तयावेळी ॥ १५१ ॥
बोलावोनि ब्राह्मणासी । निरोप देती कृपेसीं ।
न करी चिंता तूं मानसी । गेले तुझे दुरितदोष ॥ १५२ ॥
वैराग्य उपजले तुझ्या मनीं । दुष्कृतें गेली जळोनि ।
एकचित्त करुनि मनी । स्मरें आपुले गुरुचरण ॥ १५३ ॥
तये वेळी श्रीगुरुसी । नमन केले चरणासी ।
जगद्गुरु तूंचि होसी । त्रिमूर्तीचा अवतार ॥ १५४ ॥
तुझी कृपा होय जरी । पापें कैची या शरीरीं ।
उदय होतां भास्करीं । अंधकार राहे केवी ॥ १५५ ॥
ऐसेपरि श्रीगुरुसी । स्तुति करी तो भक्तीसी ।
रोमांचळ उठती हर्षी । सद्गदित कंठ जाहला ॥ १५६ ॥
निर्मळ मानसी तयावेळी । माथा ठेवी चरणकमळी ।
विनवीतसे करुणाबहाळी । म्हणे तारीं तारीं श्रीगुरुमूर्ति ॥ १५७ ॥
निर्वाण देखोनि अंतःकरण । प्रसन्न जाहला श्रीगुरु आपण ।
मस्तकीं ठेविती कर दक्षिण । तया ब्राह्मणासी परियेसा ॥ १५८ ॥
परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय बावनकसी ।
तैसे तया द्विजवरासी । ज्ञान जाहलें परियेसा ॥ १५९ ॥
वेदशास्रादि तात्काळी । मंत्रशास्रे आलीं सकळीं ।
प्रसन्न जहाला चंद्रमौळी । काय सांगूं दैव त्या द्विजाचें ॥ १६० ॥
आनंद जाहला ब्राह्मणासी । श्रीगुरु निरोपिती तयासी ।
आमुचें वाक्य तूं परियेसीं । जाय त्वरित आपुले गुरुपाशी ॥ १६१ ॥
जावोनियां गुरुपाशी । नमन करी भावेसीं ।
संतोषी होईल भरंवसीं । तोचि आपण सत्य मानीं ॥ १६२ ॥
ऐसेपरि श्रीगुरुमूर्ति । तया बाह्मणा संभाषिती ।
निरोप घेऊनियां त्वरिती । गेला आपल्या गुरुपाशीं ॥ १६३ ॥
निरोप देऊनि ब्राह्मणासी । श्रीगुरु निघाले परियेसीं ।
‘ भिल्लवडी ‘ ग्रामासी । आले भुवनेश्र्वरी-संनिध ॥ १६४ ॥
कृष्णापश्र्चिमतटाकेसी । औदुंबर वृक्ष परियेसीं ।
श्रीगुरु राहिले गुप्तेसी । एकचित्तें परियेसा ॥ १६५ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी ।
महिमा जाहली बहुवसी । प्रख्यात तुज सांगेन ॥ १६६ ॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्टें साधती ॥ १६७ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्ध-नामधारकसंवादे गुरुशुश्रुषणमाहात्म्यवर्णनं
नाम षोडशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 15
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 17
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.