श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रैयगुरुवे नमः ।
अथ ध्यानम्
दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदांच ।
पद्मासन्स्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥
काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् ।
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥
कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः ।
द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥
ॐ नमोजी विघ्नहरा ।
गजानना गिरिजाकुमरा ।
जयजयाजी लंबोदरा ।
शकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥
त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा ।
कृष्णातिरी वास करुनी ओजा ।
सद्भक्त तेथे करिती आनंदा ।
त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥
जयजयाजी सिद्धमुनी ।
तूं तारक भवार्णावांतुनी ।
संदेह होता माझे मनी ।
आजि तुवां कुडें केले ॥ ३ ॥
ऐशी शिष्याची विनंती ।
ऐकुनि सिद्ध काय बोलती ।
साधु साधु तुझी भक्ति ।
प्रीती पावो श्रीगुरुचरणी ॥ ४ ॥
भक्तजनरक्षणार्थ ।
अवतरला श्रीगुरुनाथ ।
सागरपुत्रांकारणें भगीरथें ।
गंगा आणिली भूमंडळी ॥ ५ ॥
तीर्थे असली अपार परी ।
समस्त सांडुनि प्रीति करी ।
कैसा पावला श्रीदत्ताची ।
श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥
ज्यावरी असे श्रीगुरुची प्रीति ।
तीर्थमहिमा ऐकावया चित्ती ।
वांच्छा होतसे त्या ज्ञानज्योती ।
कृपामूर्ति यतिराया॥ ७ ॥
गोकर्णक्षेत्री श्रीपादयती ।
राहिले तीन वर्षे गुप्ती ।
तेथूनी गुरु गीरीपुरा येती ।
लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥
श्रीपाद कुरवपुरी असतां ।
पुढें वर्तली कैसी कथा ।
विस्तारुनी सांग आतां ।
कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी ।
श्रीगुरु महिमा काय पुससी ।
अनंतरुपे परियेसी ।
विश्र्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥
सिद्ध म्हणे ऐक वत्सा ।
अवतार झाला श्रीपादहर्षा ।
पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा ।
कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥ ११ ॥
श्रीगुरु म्हणती जननीसी ।
आम्हा ऐसा निरोप देसी ।
अनित्य शरीर तूं जाणसी ।
काय भरवंसा जिविताचा ॥ १२ ॥
श्रीगुरुचरित्र कथामृत ।
सेवितां वांच्छा अधिक होत ।
शमन करणार समर्थ ।
तूचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥
ऐकुनि शिष्याचे वचन ।
संतोष करी सिद्ध आपण ।
श्रीगुरु चरित्र कामधेनू जाण ।
सांगता झाला विस्तारे ॥ १४ ॥
ऐक शिष्या शिरोमणी ।
धन्य धन्य तुझी वाणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी ।
लीन झाली परियेसी ॥ १५ ॥
विनवी शिष्य नामांकित ।
सिद्ध योगियातें पुसत ।
सांगा स्वामी वृत्तांत ।
श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥
ऐक शिष्या नामकरणी ।
श्रीगुरुभक्त शिखामणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी ।
लीन झाली निर्धारे ॥ १७ ॥
ध्यान लागले श्रीगुरुचरणी ।
तृप्ति नोव्हें अंतःकरणी ।
कथामृत संजिवनी ।
आणिक निरोपावी दातारा ॥ १८ ॥
अज्ञान तिमिर रजनीत ।
निजलो होतो मदोन्मत्त ।
श्रीगुरुचरित्र वचनामृत ।
प्राशन केले दातारा ॥ १९ ॥
स्वामी निरोपिलें आम्हांसी ।
श्रीगुरु आले गाणगापुरासी ।
गौप्यरुपें अमरपुरासी ।
औदुंबरी असती जाण ॥ २० ॥
सिद्ध म्हणे नामधारका ।
ब्रह्मचारी कारणिका ।
उपदेशी ज्ञान विवेका ।
तये प्रेत जननीसी ॥ २१ ॥
तुझा चरणसंपर्क होता ।
झाले ज्ञान मज आतां ।
परमार्थी मन ऐकता ।
झाले तुझे प्रसादें ॥ २२ ॥
लोटांगणे श्रीगुरुसी ।
जाऊनि राजा भक्तिसी ।
नमस्कारी विनयेसी ।
एकभावें करुनियां ॥ २३ ॥
शिष्यवचन परिसुनी ।
सांगता झाला सिद्धमुनी ।
ऐक भक्ता नामकरणी ।
श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥
सिद्ध म्हणे ऐक बाळा ।
श्रीगुरुची अगम्य लीला ।
सांगता न सरे बहुकाळा ।
साधारण मी सांगतसे ॥ २५ ॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ।
नको भ्रमुरे युक्तिसी ।
वेदांत न कळे ब्रह्मयासी ।
अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥
चतुर्वेद विस्तारेसी ।
श्रीगुरु सांगती विप्रासी ।
पुढे कथा वर्तली कैसी ।
विस्ताराची दातारा ॥ २७ ॥
नामधारक म्हणे सिद्धासी ।
पुढील कथा सांगा आम्हांसी ।
उल्हास होतो मानसी ।
श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥
पुढे कथा कवणेपरी ।
झाली असे गुरुचरित्री ।
निरुपावे विस्तारी ।
सिद्धमुनी कृपासिंधु ॥ २९ ॥
श्रीगुरुचरित्र सुधारस ।
तुम्ही पाजिला आम्हांस ।
परी तृप्त नव्हे गा मानस ।
तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥
सिद्ध म्हणे नामधारका ।
पुढें अपूर्व झाले ऐका ।
योगेश्र्वर कारणिका ।
सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥
पतिव्रतेची रीती ।
सांगे देवासी बृहस्पती ।
सहगमनाची फलश्रुती ।
येणेपरी निरुपिली ॥ ३२ ॥
श्रीगुरु आले मठासी ।
पुढे कथा वर्तली कैसी ।
विस्तारुनि आम्हांसी ।
निरुपावें स्वामिया ॥ ३३ ॥
श्रीगुरु म्हणती दंपतीसी ।
ऐका पाराशरऋषी ।
तया काश्मीररायासी ।
रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥ ३४ ॥
पुढें कथा वर्तली कैसी ।
विस्तारुनि सांगा वहिली ।
मति माझी असे वेधिली ।
श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥
गांणगापुरी असतां श्रीगुरु ।
महिमा झाला अपरंपारु ।
सांगता नये विस्तारु ।
तावन्मात्र सांगतसे ॥ ३६ ॥
ऐसा श्रीगुरु दातारु ।
भक्तजना कल्पतरु ।
सांगता झाला आचारु ।
कृपा करुनि विप्रांसी ॥ ३७ ॥
आर्त झालो मी तृषेचा ।
घोट भरवीं गा अमृताचा ।
चरित्रभाग सांगे श्रीगुरुचा ।
माझे मन निववी वेगी ॥ ३८ ॥
सिद्ध म्हणे नामधारका ।
अपूर्व झाले ऐका ।
साठ वर्षे वांझ देखा ।
पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥
सिद्ध म्हणे नामधारका ।
अपूर्व वर्तले आणिक ऐका ।
वृक्ष झाला काष्ट सुका ।
विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥
जयजयाजी सिद्धमुनी ।
तू तारक या भवार्णवांतुनी ।
नानाधर्म विस्तारुनि ।
श्रीगुरुचरित्र निरुपिले ॥ ४१ ॥
मागें कथानक निरुपिले ।
सायंदेव शिष्य भले ।
श्रीगुरुंनी त्यांसी निरुपिलें ।
कलत्र पुत्र आणि म्हणती ॥ ४२ ॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी ।
या अनंत व्रतासी ।
सांगेन ऐका तुम्हांसी ।
पूर्वी बहुती आराधिले ॥ ४३ ॥
श्रीगुरु माझा मलिकार्जुन ।
पर्वत म्हणजे श्रीगुरु भुवन ।
आपण नये आतां येथून ।
सोडून चरण श्रीगुरुचे ॥ ४४ ॥
तू भेटलासी मज तारक ।
दैन्य गेले सकळहि दुःख ।
सर्वाभीष्ट लाधले सुख ।
श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥
गाणगापुरीं असतां श्रीगुरु ।
ख्याती झाली अपारु ।
लोक येती थोरथोरु ।
भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥
सांगेन ऐका कथा विचित्र ।
जेणें होय पतित पवित्र ।
ऐसे हें गुरुचरित्र ।
तत्परतेसी परियेसी ॥ ४७ ॥
श्रीगुरु नित्य संगमासी ।
जात होते अनुष्ठानासी ।
मार्गांत शूद्र परियेसी ।
शेती आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥
त्रिमूर्तीचा अवतार ।
वेषधारी झाला नर ।
राहिले प्रीती गाणगापुर ।
कवण क्षेत्र म्हणूनिया ॥ ४९ ॥
तेणे मागितला वर ।
राज्यपद धुरंधर ।
प्रसन्न झाला त्यासी गुरुवर ।
दिधला वर परियेसा ॥ ५० ॥
राजभेटी घेउनी ।
श्रीपाद आले गाणगाभुवनी ।
योजना करिती आपुले मनीं ।
गौप्य रहावे म्हणूनिया ॥ ५१ ॥
म्हणे सरस्वती गंगाधर ।
श्रोतया करी नमस्कार ।
कथा ऐका मनोहर ।
सकळाभीष्ट लाधेल ॥ ५२ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ
सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्र्लोकात्मकं
गुरुचरित्र संपूर्णम् ॥