श्री गुरु चरित्र परयाण का यह तिसराअध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 2
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 4
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.
श्रीगुरुचरित्र अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
येणेंपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि ।
संतोषोनि नामकरणी । विनवीतसे मागुती ॥ १ ॥
जय जया सिद्ध मुनी । तूं तारक या भवार्णी ।
संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कडे केलें ॥ २ ॥
तुझेनि सर्वस्व लाधलों । आनंदजळी बुडालों ।
परमार्थतत्व जोडलों । आजिचेनि ॥ ३ ॥
ऐसें श्रीगुरुमहिमान । तुम्हीं निरोपिलें ज्ञान ।
आनंदी झालें माझें मन । तुझेनि धर्मे स्वामिया ॥ ४ ॥
कवणे ठायीं तुमचा वासु । नित्य तुम्हां कोठें ग्रासु ।
होऊं आतां तुमचा दासु । म्हणोनि चरणीं लागला ॥ ५ ॥
कृपानिधि सिद्ध मुनी । तया शिष्या आलिंगोनि ।
आशीर्वचन देऊनि । सांगे आपुला वृत्तांत ॥ ६ ॥
जे जे स्थानीं होते गुरु । तेथें असतो ममत्कारु ।
पुससी जरी आम्हां आहारु । गुरुस्मरण नित्य जाण ॥ ७ ॥
श्रीगुरुचरित्र महिमान । तेंचि आम्हां अमृतपान ।
सदा सेवितों याचि गुणें । म्हणोनि पुस्तक दाखविलें ॥ ८ ॥
भुक्ति-मुक्ति परमार्थ । जें जें वांछी मनीं आर्त ।
त्वरित होय साध्यंत । गुरुचरित्र ऐकतां ॥ ९ ॥
धनार्थ्यासी अक्षय धन । पुत्रपौत्रादि गोधनें ।
कथा ऐकतां होय जाणे । ज्ञानसिद्धि तात्काळी ॥ १० ॥
जे भक्तीनें सप्तक एक । पठती ऐकती मनुष्य लोक ।
काम्य होय तात्कालिक । निपुत्रिकां पुत्र होती ॥ ११ ॥
ग्रहरोगादिपीडन । नव्हती व्याधि कधीं जाण ।
जरी मनुष्या असे बंधन । त्वरित सुटे ऐकतां ॥ १२ ॥
ज्ञानवंत शतायुषी । ऐकतां होय भरंवसीं ।
ब्रह्महत्यादि पाप नाशी । एकचित्तें ऐकतां ॥ १३ ॥
इतुकें ऐकोनि ते अवसरीं । नामधारक नमस्कारी ।
स्वामी मातें तारीं तारीं । कृपानिधि सिद्ध मुनी ॥ १४ ॥
साक्षात्कारें गुरुमूर्ति । भेटलासी मज जगज्ज्योति ।
होती वासना मज चित्तीं । गुरुचरित्र ऐकावें ॥ १५ ॥
एखादा तृषेनें पीडित । जात असतां मार्गस्थ ।
त्यासी आणूनि देती अमृत । तयापरि भेटलासी ॥ १६ ॥
गुरुचें महिमान ऐकों कानीं । सांगिजे स्वामी विस्तारोनि ।
अंधकारोनि असतां रजनी । सूर्योदयापरी करी ॥ १७ ॥
इतुकिया अवसरीं । सिद्ध योगी अभय करी ।
धरुनियां सव्य करीं । घेऊनि गेला स्वस्थाना ॥ १८ ॥
अमरजासंगम भीमरथी । जैसा ठाव ज्ञानपंथी ।
कल्पवृक्ष अश्र्वत्थीं । बैसोनि सांगे ज्ञानोदय ॥ १९ ॥
ऐक शिष्या नामधारका । नेणसी सोय गुरुदास्यका ।
याचिकारणें उपबाधका । चिंता कष्ट तुज घडती ॥ २० ॥
ओळखावया गुरुमूर्तीसी । आपुला आचार परियेसीं ।
दृढ भक्ति धरोनि मानसीं । ओळखावा मग श्रीगुरु ॥ २१ ॥
ऐकोनि सिद्धाचें वचन । संतोषें नामधारक गहन ।
क्षणक्षणां करी नमन । करुणावचनेंकरुनियां ॥ २२ ॥
जी ! मी संसारसागरीं । बुडालों तापत्रयपुरी ।
भक्षिलें क्रोधादि जलचरीं । अज्ञानजाळें वेष्टिलों ॥ २३ ॥
ज्ञानतारवीं बैसवोनि । कृपेचा वायु पालाणोनि ।
देह तारक करुनि । तारावें मातें स्वामिया ॥ २४ ॥
ऐशी कृपा उपजवोनि । विनवीतसे नामकरणी ।
मस्तक सिद्धाचे चरणीं । न्यासिता झाला तयेवेळीं ॥ २५ ॥
तंव बोलिले सिद्ध मुनि । उठवीतसे आश्र्वासोनि ।
न धरीं चिंता मनीं । सांकडें फेडीन तुझें आतां ॥ २६ ॥
ज्यांसी नाहीं दृढ भक्ति । सदा दैन्यें कष्टती ।
श्रीगुरुवरी बोल ठेविती । अविद्यामाया वेष्टूनियां ॥ २७ ॥
संशय धरोनि मानसीं । श्रीगुरु काय देईल म्हणसी ।
त्यागुणें हा भोग भोगिसी । नाना चितें व्याकुळित ॥ २८ ॥
सांडोनि संशय धरीं निर्धार । गुरुमूर्ति देईल अपार ।
सहज गुरु कृपासागर । तुज नुपेक्षी सर्वथा ॥ २९ ॥
गुरुमूर्ति कृपासिंधु । प्रख्यात असे वेदांतबोधु ।
तुझे अंतःकरणीं वेधु । असे तयाचे चरणांवरी ॥ ३० ॥
तो दातार अखिल महीं । जैसा मेधाचा गुण पाही ।
पर्जन्य पडतो सर्वां ठायीं । कृपामूर्ति ऐसा असे ॥ ३१ ॥
त्यांतचि पाहीं पात्रानुसार । सांगेन साक्षी एक थोर ।
सखोल भूमीं उदक स्थिर । उन्नतीं उदक नाही जाण ॥ ३२ ॥
दृढ भक्ति जैसी सखोल भूमि । दांभिक जाणावी उन्नत तुम्ही ।
याचि कारणें मनोवाक्कर्मी । निश्र्चयावें श्रीगुरुसी ॥ ३३ ॥
म्हणोनि श्रीगुरुसी उपमा । ऐसी कवणासी आहे महिमा ।
प्रपंच होय परब्रह्मा । हस्त-मस्तक करुनियां ॥ ३४ ॥
कल्पतरुची द्यावी उपमा । कल्पिलें लाभे त्याचा महिमा ।
न कल्पितां पुरवी कामा । कामधेनु श्रीगुरुचि ॥ ३५ ॥
ऐसा श्रीगुरु परब्रह्ममूर्ति । ख्याति असे श्रुतिस्मृतीं ।
संदेह सांडूनि एकचेत्तीं । ध्याय पदाब्ज श्रीगुरुचें ॥ ३६ ॥
इतुकें परिसोनि नामधारक । नमन करुनि क्षणएक ।
संपट करुनि द्वयहस्तक । विनवीतसे सिद्धासी ॥ ३७ ॥
श्रीगुरु सिद्ध योगेश्रवरा । कामधेनु कृपासागरा ।
विनवीतसे अवधारा । सेवक तुमचा चरणरज ॥ ३८ ॥
स्वामींनीं निरोपिलें सकळ । झाले माझें मन निर्मळ ।
वेध लागला असे केवळ । चरित्र ऐकावें श्रीगुरुचें ॥ ३९ ॥
गुरु त्रैमूर्ति ऐकों कानीं । कां अवतरले मनुष्ययोनीं ।
सर्व सांगावे विस्तारोनि । म्हणोनि चरणीं लागला ॥ ४० ॥
मग काय बोले योगींन्द्र । बा रे शिष्या पूर्णचंद्र ।
तूं माझा बोधसमुद्र । कैसे मन उत्साहविलें ॥ ४१ ॥
तूंतें महासुख लाधलें । गुरुदास्यत्व फळलें ।
परब्रह्म अनुभविलें । आजिचेनि तुज आतां ॥ ४२ ॥
हिंडत आलों सकळ क्षिति । नव्हेत कवणा ऐशी मति ।
गुरुचरित्र न पुसती । तूंतें देखिलें आजि आम्हीं ॥ ४३ ॥
ज्यासी इहपर असे चाड । त्यासी ही कथा असे गोड ।
त्रिकरणें करुनियां दृढ । एकचित्ते ऐकिजे ॥ ४४ ॥
तूं भक्त केवळ श्रीगुरुचा । म्हणोनि बुद्धि झाली उंचा ।
निश्र्चय मानीं माझी वाचा । लाधेल चारी पुरुषार्थ ॥ ४५ ॥
धनधान्यादि संपत्ति । पुत्रपौत्र धृतिस्मृति ।
इहसौख्य आयुष्यशति । अंतीं गति असे जाणा ॥ ४६ ॥
गुरुचरित्र कामधेनु । वेदशास्त्रसंमत जाण ।
अवतार जाहला त्रयमूर्ति आपण । धरोनि नरवेष कलियुगीं ॥ ४७ ॥
कार्याकारण अवतार । होऊनि येती हरिहर ।
उतरावया भूमीचा भार । भक्तजन तारावया ॥ ४८ ॥
ऐकोनि सिद्धाचें वचन । प्रश्र्न करी शिष्यराणा ।
त्रयमूर्ति अवतार किंकारणा । देह धरोनी मानुषी ॥ ४९ ॥
विस्तारोनि तें आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसीं ।
म्हणोनि लागला चरणासी । करुणावचनेंकरुनियां ॥ ५० ॥
सिद्ध म्हणे नामधारका । त्रयमूर्तीचे तीन गुण ऐक ।
आदिवस्तु आपण एक । प्रपंच मूर्ति तीन जाण ॥ ५१ ॥
ब्रह्मयाचा रजोगुण । विष्णु असे सत्वगुण ।
तमोरुद्र उमारमण । मूर्ति एकचि अवधारा ॥ ५२ ॥
ब्रह्मा सृष्टि रचावयासी । पोषक विष्णु विश्र्वासी ।
रुद्रमूर्ति प्रळयासी । त्रयमूर्तिचे तीन गुण ॥ ५३ ॥
एका वेगळे एक नसती । कार्याकारण अवतार होती ।
भूमीचा भार फेडिती । प्रख्यात असे पुराणीं ॥ ५४ ॥
सांगेन साक्षी आतां तुज । ‘ अंबऋषि ‘ म्हणिजे दि्वज ।
द्वादशीव्रताचिये काज । विष्णूसी अवतार करविले ॥ ५५ ॥
अवतार व्हावया कारण । सांगेन तुज विस्तारुन ।
मन करोनि सावधान । एकचित्तें परियेसा ॥ ५६ ॥
दि्वज करी द्वादशीव्रत । पूजा करी अभ्यागत ।
निश्र्चयो करोनि दृढ व्रत । हरिचिंतन सर्वकाळी ॥ ५७ ॥
ऐसे त्याचे व्रतासी । भंग करावया आला ऋषी ।
अतिथि होऊनि द्वादशीसी । पातला मुनि दुर्वास ॥ ५८ ॥
तद्दिनीं साधन घडी एक । आला अतिथि कारणिक ।
अंबऋषीस पडला धाक । केवीं घडे म्हणोनि ॥ ५९ ॥
ऋषि आले देखोनि । अंबऋषीं अभिवंदोनि ।
अर्घ्य पाद्य देवोनि । पूजा केली उपचारें ॥ ६० ॥
विनवीतसे ऋषेश्र्वरासी । साधन असे घटी द्वादशी ।
शीघ्र यावें आरोगणासी । अनुष्ठान सारोनियां ॥ ६१ ॥
ऋषि जाऊनि नदीसी । अनुष्ठान करी विधीसी ।
विलंब लागतां तयासी । आली साधन एकघटी ॥ ६२ ॥
व्रतभंग होईल म्हणोन । पारणें केलें तीर्थ घेऊन ।
नानापरी पक्वान्न । केले तया ऋषेश्र्वरासी ॥ ६३ ॥
तंव आले दुर्वास देखा । पाहूनि अंबऋषीच्या मुखा ।
म्हणे केलेंसि कां । अतिथिविणें दुरात्मया ॥ ६४ ॥
शाप देतां ऋषेश्र्वर । दि्वज स्मरे शारंगधर ।
करावया भक्ताचा कैवार । ठाकून आला परियेसा ॥ ६५ ॥
भक्तवत्सल नारायण । शरणागताचें रक्षण ।
बिरुद बोलती पुराणें । धांवे जैशी वत्सालागीं धेनु ॥ ६६ ॥
शापिलें ऋषीनें दि्वजासी । जन्म होईल गा अखिल योनींसी ।
तंव पातला हृषीकेशी । येऊनि जवळी उभा ठेला ॥ ६७ ॥
मिथ्या नव्हे ऋषीचें वचन । अंबऋषि धरी विष्णूचे चरण ।
भक्तवत्सल बिरुद जाण । तया महाविष्णूचें ॥ ६८ ॥
विष्णु म्हणे दुर्वासासी । तुम्हीं शापिलें भक्तासी ।
राखीन माझ्या दासासी । शाप आपणासी द्यावा ॥ ६९ ॥
दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर । केवळ ईश्र्वर-अवतार ।
फेडावया भूमीचा भार । कारण असे पुढें म्हणत ॥ ७० ॥
जाणोनि ज्ञानी-शिरोमणी । म्हणे तप करिती युगें क्षोणीं ।
भेटी न होय हरिचरणीं । भूमीवरी दुर्लभ ॥ ७१ ॥
शापसंबंधे अवतरोनि । येईल लक्ष्मी घेऊनि ।
तारावयालागोनि । भक्तजन समस्त ॥ ७२ ॥
परोपकारसंबंधेसीं । शाप द्यावा विष्णूसी ।
भूमीचा भार फेडावयासी । कारण असे म्हणोनियां ॥ ७३ ॥
ऐसें विचारुनि मानसीं । दुर्वास म्हणे विष्णूसी ।
अवतरोनि भूमीसी । नाना स्थानीं जन्मावें ॥ ७४ ॥
प्रसिद्ध होसी वेळ दहा । उपर अवतार पूर्णब्रह्मा ।
सहज तूं विश्र्वात्मा । स्थूळसूक्ष्मीं तूंचि वससी ॥ ७५ ॥
ऐसा कार्याकारण शाप । अंगीकारी जगाचा बाप ।
दुष्टांवरी असे कोप । सुष्टां प्रतिपाळावया ॥ ७६ ॥
ऐसे दहा अवतार झाले । कथा असेल तुवां ऐकिली ।
महाभागवतीं विस्तारिली । अनंतरुपी नारायण ॥ ७७ ॥
कार्याकारण अवतार होती । क्वचित्प्रकट क्वचित् गुप्ती ।
ते ब्रह्मज्ञान जाणती । मूढलोक काय जाणे ॥ ७८ ॥
आणीक एक सांगेन तुज । विनोद झाला असे सहज ।
अनसूया अत्रीची भाज । पतिव्रताशिरोमणी ॥ ७९ ॥
तिचे घरीं जन्म जाहलें । त्रयमूर्ति अवतरले ।
कपटवेष धरोनि आले । पुत्र जाहले तियेचे ॥ ८० ॥
नामधारक पुसे सिद्धासी । विनोदकथा निरोपिलीसी ।
देव येती कपटवेषीं । पुत्र जाहले कवणेपरी ॥ ८१ ॥
अत्रिऋषि पूर्वी कवण । कवणापासूनि उत्पन्न ।
मूळपुरुष तो कवण । विस्तारोनि सांग मज ॥ ८२ ॥
म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकलाभीष्टें साधती ॥ ८३ ॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
अंबरीषव्रतनिरुपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
- Read Previous – Shri Guru Charitra Adhyay 2
- Read Next– Shri Guru Charitra Adhyay 4
- Read Sampurna Guru Charitra Prayan in Marathi.